অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गरोदर स्त्रियांसाठी आहार

कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते. आपल्या शरीरात एक जीव वाढतो आहे. या गोष्टीवर प्रथम तीचा विश्वासच बसत नाही आणि मुलाला जन्म देणारी हि पहिलीवहिली स्त्री जणू आपणच आहोत. असे क्षणभर वाटण्याएवढा विशेष आनंद तीला होत असतो. आपल्या होणाऱ्या बाळाविषयी ती अनेक स्वप्न बघते, आणि त्या स्वप्नात ती रंगून जाते. परंतु क्वचित कधी बाळाच्या जन्मानंतर किंवा गरोदर  असतानाच तिच्या स्वप्नाचा चुरा होतो . जन्माला आलेले बाळ विकृत किंवा  आजारी असे जन्माला  येते . आणि आता एकविसाव्या शतकांत “एकच अपत्य आणि सुखी दांपत्य” अशी स्थिती  आहे. आता एकच  अपत्य म्हटले तर दाम्पत्याच्या सर्व आशा आकांक्षा  त्यावरच अवलंबून  असतात.

जन्मापूर्वीपासून संस्कार

“एक अपत्य सुखी दांपत्य” या सूत्राच्या सर्व दांपत्यानी अवलंब केलातर वणव्याप्रमाणे फोफावलेल्या लोकसंख्येला आळा बसेल शिवाय एकच अपत्य असल्यामुळे त्यावर सर्व लक्ष केंद्रित करून त्याला सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांगपरीपूर्ण बनविता येईल. यासाठी गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेनंतर म्हणजेच  सगर्भावस्थेत बालकाच्या जन्मापूर्वीपासून संस्कार करणे शक्य आहे. बाळाच्या निर्मितीसाठी माता-पिता हे कारणीभूत असतात. त्यामुळे माता-पित्यांची शारीरिक अवस्था आरोग्यपूर्ण, सुसंस्कारित व शुद्ध असावी लागते. शरीरशुद्धी व मन:शुद्धी यासाठी आहार-विहाराचा विचार आवश्यक आहे. पथ्थ्यकर आहार-विहाराने  बीजनिर्मिती उत्तम होऊ शकते व आरोग्यपूर्ण  बीजसंयोगातून मातेच्या उदरात जन्माला येणारा अंकुर हा परिपूर्ण असतो.

गर्भधारणेनंतर पित्याचा सहभाग संपतो. मग उरते फक्त माता. तीला नऊ महिने नऊ दिवस त्या अंकुराचे स्वत:च्या उदरात पोषण करावयाचे असते. तीच्या आहार-विहार, आचार-विचाराचा परिणाम बाळावर होत असतो. याचा प्रत्यय आपणास वारंवार येतोच. वैदिक कालापासून आजपर्यंत आपण वाचत असलेल्या कथांमधून हे आपणास जाणवत असते. गर्भिणी अवस्थेतील  आहार-विहाराचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. कारण हे जग वेगवेगळ्या ग्रहांवर जातेय, तेव्हा प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारया जगास हाताला हात धरून आणखी पुढे नेण्यासाठी आपल्या बाळाचे योगदान असावे अशी प्रत्येक मातेची मनोकामना असतेच.

बाळाच्या वाढीसाठी मातेचा आहार

बाळाच्या वाढीसाठी मातेचा आहार कसा असावा त्यापेक्षा तो कसा असू नये हा विचार मला जास्त महत्वाचा वाटतो. आजच्या युगात स्त्रिया सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करित आहेत. त्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत परंतु सर्व क्षेत्रामध्ये पुरुषाच्या  काही वाईट सवयीमध्येहि बायका त्यांचा खांद्याला खांदा लावू पहात आहेत. हि अत्यंत खेदाची बाब आहे. यात धृम्रपान, मद्यपान किंवा इतर मादक, उत्तेजक पदार्थांचे सेवन उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या स्त्रिया राजरोसपणे करीत आहेत. याचा वाईट  परिणाम त्यांच्या स्वत:च्या जीवनावर तर होतोच  परंतु त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या अपत्यावरही होतो. हे स्त्रियांना विसरून कसे चालेल? स्त्रीस्वातंत्र्याचा हा मिथ्यायोग म्हणता येईल.

एखादे व्यसन जडल्यावर मनुष्य स्वत:ला काबूत ठेवू शकत नाही. व हे खरे आहे परंतु व्यसनाच्या आधीन जाण्यापूर्वी आपण शंभर वेळा विचार करून स्वत: सावरलेले बरे  स्त्रियांवर संपूर्ण घर अवलंबून असते. तीचे विपरीत वागणे व्यसनाधीन होणे तिच्या स्वत:च्या घरालाच नव्हे तर समाजासाठी सुद्धा विघातक ठरते. कारण घरा-घरातून निर्माण होणारा समाज ह्या स्त्रियाच घडवत असतात. तेव्हा स्त्रियांनी संयमी असणे हि समाजाची  गरज आहे. याचा अर्थ असा नव्हे की पुरुषाने बेबेंद वागावे. स्त्री आणि पुरुष हि एकाच रथाची दोन चाके आहेत. बेबंद पुरुषाला आपल्या प्रेमशक्ती व संयमाने बांधून ठेवणे स्त्रियांसाठी सहज शक्य आहे.

अपत्ये हि अप्रत्यक्षपणे स्त्रियांवर अवलंबून असतात. परंतु विशेषत: सगर्भावस्थेतमधे व प्रसूतीनंतर काही काळ ते मातेवर पूर्णत: अवलंबून असतात. म्हणून या काळात स्त्रियांनी व्यसनपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे आवश्यक आहे. यात धूम्रपान करणे, तंबाखू खाणे, दातास मिश्री लावणे, मद्यपान करणे, ताडी-सिंधी पिणे व इतर घातक व मादक औषधीद्रव्यांचा वापर करणे याचा समावेश असू शकतो. याचा परिणाम बालकांच्या शरीरावर व बुद्धीवर प्रत्यक्ष होत असतो. याशिवाय या काळात आनंदी व प्रसन्न राहणे, वृत्ती सात्त्विक ठेवणे आवश्यक आहे. यासाठी प्राणायाम, ध्यान-योगासन यांची मदत होऊ शकते. आवड असणाऱ्यांनी पूजा-अर्चा करण्यास हरकत नाही. अलीकडच्या यंत्रयुगात मानवता तळाशी गेलेली असून हिंसाचार बोकाळलेला आहे. अश्या वेळी “सुसंस्कारित अपत्य निर्मिती” हि काळाची गरज आहे.

मातेच्या व्यसनाचा परिणाम बाळाच्या केवळ मानसिक विकासावर होतो असे नव्हे तर त्यामुळे बालकाचा शारीरिक विकासही खुंटतो. गर्भिणी अवस्थेमधे धृम्रपान करणारया स्त्रियांमधे बालकाचे वजन ३०० ग्रॅम ने कमी होते असे अलीकडे झालेल्या अभ्यासात सिद्ध झालेले आहे. ज्या गर्भिणी माता निर्व्यसनी आहेत, त्यांच्या बाळाचे वजन प्राकृत असते. यावरून व्यसनाधीन स्त्रियांनी  काय तो बोध घ्यावा. मद्यपान करणाऱ्या स्त्रियांच्या बालकामधे पोटाच्या तक्रारी आधिक असतात. त्यांच्या पाचनप्रक्रियेमधे  वारंवार बिघाड होतो. हे एका अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. याशिवाय आणखी इतर व्यसने असताना काय दुष्परिणाम होतील हे सांगायला नको! सामान्यपणे गर्भिणी स्त्रियांनी खालील गोष्टींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करू नये.

 1. चहा, कॉफी यांसारखी उत्तेजक पेय घेण्याचे टाळावे.
 2. मसाले, तिखट, आंबट, तिक्ष्ण-उष्ण, जास्त प्रमाणात मीठ अश्या पदार्थांचे सेवन करू नये.
 3. मांसाहार, मासे, पूर्णत: बंद करावेत.
 4. जेवताना रात्रीच्या जेवणात उरलेले, फ्रीजमधे साठवून ठेवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.
 5. आंबवलेले पदार्थ, वडापाव, इतर रुक्ष पदार्थ खाण्याचे टाळावे.
 6. गरोदरपणाच्या शेवटच्या काळात प्रवास शक्यतो टाळावा.
 7. साडी किंवा गाऊन सुती व सैल असावेत. अंगाला चिकटणाऱ्या व घट्ट प्रावरणाचा उपयोग टाळावा.

गर्भिणी अवस्थेमधे स्त्रीला स्वत: बरोबर आपल्या बाळाचेही पोषण करावयाचे असते. मातेने घेतलेल्या आहारापासून बाळाचे पोषण होते. गर्भ हा पूर्णत: मातेवरच अवलंबून असतो. त्यामुळे मातेचा आहार सकस, पूर्ण उष्मांक असलेला असणे आवश्यक आहे. सामान्य स्त्री पेक्षा गर्भिणी स्त्रीला आधिक उष्मांकाची गरज असते.

‘गर्भिणी स्त्री आहार घटक तालिका’

अ.क्र. आहार घटक सामान्य स्त्री गर्भिणी स्त्री स्तनपानकरणारी स्त्री
1 उष्मांकाची २२०० २५०० २५००
2 प्रोटीन ५०  मी.ग्रॅम ६० ग्रॅम ७० ग्रॅम
3 कॅल्शियम ५०० मी.ग्रॅम १००० मी.ग्रॅम १५०० मी.ग्रॅम
4 लोह १८ मी.ग्रॅम ४० मी.ग्रॅम ३० मी.ग्रॅम
5 जीवनसत्व –अ ५००० I U ६००० I U ८००० I U
6 जीवनसत्व –ड ४०० I U ४०० I U ४०० I U
7 थायमीन १.१ मी.ग्रॅम १.५ मी.ग्रॅम
8 निकोटिनिक अॅसिड १४ मी.ग्रॅम १५ मी.ग्रॅम
9 अस्कोर्बीक  अॅसिड ४५ मी.ग्रॅम ६० मी.ग्रॅम
10 जीवनसत्व ब१२ २  ug. २  ug.
11 फोलिक  अॅसिड ०.५ ग्रॅम १ ग्रॅम

प्रथम त्रैमासात गरोदर स्त्रीला वरील दर्शविलेल्या तक्त्याप्रमाणे फोलिक अॅसीड, प्रोटीन, थायमीन, इ अत्यंत आवश्यकता असते. हे आहारघटक मिळाल्यास योनिगत रक्तस्त्राव, गर्भपात होऊ शकतो किंवा गर्भधारणा पुढे चालू राहिल्यास बाळ वजनाने कमी जन्मास येते. काही वेळा तर अकाली प्रसव सुद्धा होतो. वरिल तक्त्यात दर्शविलेली  जीवनसत्वे आहारात न मिळाल्यास गर्भिणी पांडू  त्याच बरोबर गर्भिणी विषाक्तता (Toxiimia of pregnancy) होऊ शकते. तसेच प्रसवामधे रक्तस्त्राव  अपरा गर्भाशयास चिकटून राहणे. प्रसवास प्राकृत वेळेपेक्षा विलंब होणे या व इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. म्हणून आहारामध्ये गरोदर स्त्रियांनी खालील पदार्थ, हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश करावा. खालील तक्त्यावरून हे सहज लक्षात येईल.

अ.क्र जीवनसत्व प्राप्तीस्थान
जीवनसत्व-अ कोबी,गाजर,लाल-पिवळीफळे,दुध,पनीर,लोणी, सर्व हिरव्या पालेभाज्या
जीवनसत्व-ब अंडी, मासे, कडधान्ये, गव्हाचाकोंडा, गव्हांकुर, दुध,हिरव्या पालेभाज्या
जीवनसत्व-क सर्व आंबट-गोड फळे, टोमॅटो, कलिंगड, पेरू, कोबी, अननस, बटाटे, हिरव्या पालेभाज्या
जीवनसत्व-ड दुध, अंडी, मासे, याशिवाय, सूर्यप्रकाश
जीवनसत्व-इ सुकामेवा, अंडी, दुध, वनस्पतीतेल, इ.
जीवनसत्व-के गव्हाचा कोंडा, हिरव्यापालेभाज्या, टोमॅटो, फ्लावर, सोयाबीन, वनस्पतीतेल, प्राण्यांचे लिव्हर
कॅल्शियम दुध, दुधापासून बनवलेले पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजीर, द्राक्ष, बाजरी, तीळ, उडीद, शिंपल्यातील किडे
लोह मेथी, हिरव्यापालेभाज्या, चणे, मुग, उडीद, सोयाबीन, खजूर, तीळ, बाजरी, अंडी, मांस, प्राण्यांचे यकृत

जीवनसत्व ब हा एक जीवनसत्वाचा समूह आहे. यामधे ८ जीवनसत्वाचा समावेश असतो. ब -१ ,ब -२ ,ब -६ ,ब -१२, पेन्टॉथीनिक, अॅसिड, बायोटीन निएसीन इ.

वरिल तक्त्यावरून गर्भिणीस लागणाऱ्या आहार घटकाची कल्पना तुम्हाला आलेली आहेच. त्यामुळे त्याचा अभावी होणारे परिणाम पुढे वर्णन करित आहे.

 • जीवनसत्व अ – याच्या अभावी प्रथम त्रेमासात मळमळ व उलट्या होऊ शकतात. गर्भिणीच्या पायामध्ये गोळे येतात.
 • जीवनसत्व क – लोहाच्या शोषणासाठी याची आवशता आवश्यकता असते. याच्या आभावाने गर्भिणीच्या हिरड्यांना सुज येऊन ते स्पंजाप्रमाणे पोकळ होतात व रक्तस्त्राव होतो. “स्कर्वी” नावाचा रोग यामुळे होतो. याच्या अभावामुळे गर्भिणीला रक्तक्षय होण्याची शक्यता असते.
 • जीवनसत्व ड - सकाळच्या कोवळ्या उन्हातून ते मिळते . गर्भिणीच्या चयापचया   मध्ये या जीवनसत्वाचा महत्वाचा वाटा आहे.
 • जीवनसत्व के - याच्या अभावामुळे गर्भस्त्राव, गर्भपात, योनिगत रक्तस्त्राव होऊ शकतो.
 • जीवनसत्व इ - रक्तातील लाल कण या जीवनसत्वामुळे सुधृड बनतात. प्रजोत्पादनामधे या जीवनसत्वाचा महत्वाचा वाटा आहे. याच्या आभावाने काही स्त्रियांना वंध्यत्व येते.
 • लोह – लोहाच्या आभावाने गर्भिणीला पाण्डू होतो त्याचबरोबर प्रसवोत्तर रक्तस्त्रावाची शक्यता असते.

गर्भिणी अवस्थेत दुध, तूप, तांदूळ यांसारखे शुभ्र सात्विक पदार्थ स्त्रीने सेवन केल्यास होणारे बालक सुदृढ, गौरवर्णीय व कांतिमान होते. त्यामुळे आय्र्वेडत दुध, तूप, मध, लोणी, तूपभात इ. पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले आहे.

या प्रमाणे आहारयोजना  असल्यास पूर्णमास व प्राकृत प्रसव होते. प्रसवानंतर रक्तस्त्राव, राक्ताल्पता यांसारख्या गुंतागुंती निर्माण होत नाहीत. म्हणून गर्भिणी मातेने कुठल्याही परिस्थितीत परिपूर्ण आहार घेणे आवश्यक आहे.

 

डॉ. सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
वरळी, मुंबई – ४०० ०१८
भ्रमणध्वनी +917738086299
Email – subhashmarlewar@gmail.com

स्त्रोत : मराठीसृष्टी

 

अंतिम सुधारित : 8/8/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate