गरोदरपणाची तयारी कशी करावी हा प्रश्न अनेक नवविवाहीत जोडप्यांचा प्रश्न असतो. योग्य आहार वैद्यकीय तपासण्या केल्या आणि गर्भाच्या वाढीला हानीकारक गोष्टी टाळल्या तर बाळाची वाढ योग्य होते.
गरोदरपणात बाळाची संपूर्ण वाढ ही आईच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे गरोदरपणात आई पूर्णपणे निरोगी असणे जरुरीचे आहे. गरोदरपणात पूर्वी पासूनच आहारात योग्य पोषणमूल्य असावीत. प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट जीवनसत्व यांचे योग्य प्रमाण असलेला आहार असावा. आईचे पोषण जर योग्य असेल तर बाळाची मानसिक तसेच शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते.
योग्य आहारामुळे गरोदरपणातील मधुमेह उच्चरक्तदाब यासारख्या आजारापासुनही संरक्षण मिळू शकते. गरोदरपणाबद्दल सविस्तर माहिती यापुढे आपण घेऊ.
मासिकपाळी चुकली म्हणजे गरोदरपणाची चाहूल लागते. त्यानंतर सकाळी मळमळणे व उलटया सुरु होतात. एखादया वेळी चक्करही येते. पहिल्या गरोदरपणी हा त्रास जास्त होतो. पहिले तीन महिने हा त्रास होऊ शकतो. काही स्त्रियांना हा त्रास कमी होतो तर काहींना जास्त होतो. या काळात वारंवार लघवीला जावेसे वाटते. स्तनांची वाढ होऊ लागते आणि ओटी पोटात दुखते, मासिक पाळी चुकल्यानंतर काही दिवसांत वरील लक्षणे दिसू लागल्यास ती स्त्री गरोदर आहे असे ओळखावे.
गर्भाशयाची योनीमार्गातून तपासणी केली तर गरोदर स्त्रीचे गर्भाशय अतिशय मऊ झालेले दिसते व गर्भाशयाचा आकार मोठा झालेला आढळतो. या शिवाय स्त्रीच्या लघवीची तपासणी केली असता स्त्री गरोदर आहे किंवा नाही हे जवळपास खात्रीशीरपणे कळू शकते. या तपासणीत स्त्रीची मासिकपाळीची तारीख चुकल्यानंतर ५-६ दिवसानंतर लगेचच तपासणी केली तर स्त्री गरोदर आहे की नाही ते कळू शकते. गरोदर असल्याची शंका मनात येत असेल व ते गरोदरपण नको असेल तर जास्त दिवस न घालवता ही तपासणी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
बाळंतपण सुखरूप होऊन आई व बाळ यांची तब्येत नीट व्हावी म्हणून दवाखान्यात जाने आवश्यक असते. त्यामुळे गर्भाची वाढ नीट होत आहे की नाही हे पाहता येते. गरोदर मातेस काही आजार आहे का? हे कळते. तसेच गरोदरपण जोखमीचे आहे का? ते कळते व तसे असल्यास अधिक काळजी घेता येते.
वय, बाळंतपणाची खेप, पूर्वीच्या बाळंतपणाची सविस्तर माहिती, शेवटच्या मासिक पाळीची तारीख, सध्या काही त्रास आहे काय, तसेच क्षयरोग, गुप्तरोग, हृदयरोग, रक्तदाब, दमा, झटके येणे, पोटाचे विकार या आजारांची माहितीही विचारतात.
गरोदर स्त्रीने दर महिन्याला तपासणीसाठी दवाखान्यात जावे पण शक्य नसल्यास पहिल्या ३ महिन्यात एकदा, ७ व्या व ८ व्या महिन्यात किमान एकदा अशा तीन तरी तपासण्या डॉक्टरांकडून अथवा नर्स कडून करून घ्याव्यात. ७ व्या महिन्यातून दर पंधरा दिवसांनी दाखवावे व शेवटच्या महिन्यात ८ दिवसांनी दाखवावे हे अतिशय चांगले. पण शक्य नसल्यास गर्भाच्या वाढीवरून आईच्या तब्येतीकडे लक्ष ठेवावे.
वजन, उंची, रक्त, लघवी, रक्तदाब याची तपासणी करतात. तसेच शारीरिक व पोटाची तपासणी करतात.
गरोदरपणात वजन योग्य प्रकारे वाढले पाहिजे. यामुळे गर्भाची वाढ नीटपणे होत आहे की नाही हे कळते. ९ महिन्यात एकूण १० ते ११ किलो वजन वाढले पाहिजे. शेवटच्या महिन्यात अचानक वजन वाढणे हे चांगले नसते. म्हणून प्रत्येक तपासणीच्या वेळी वजन करतात.
प्रत्येक भेटीच्या वेळी लघवीची तपासणी करतात, त्यामुळे लघवीत साखर आणि मीठाचे प्रमाण आहेत की काय ते समजते त्यामुळे मधुमेह आहे की नाही हे कळते. तसेच इतर जंतूचा संसर्गही समजू शकतो आणि योग्य ती काळजी घेता येते.
गरोदर मातेची उंची ४ फुट १० इंचापेक्षा कमी असेल तर बाळंतपणाचा मार्ग हा अरुंद असण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळंतपण अवघड होऊ शकते. अशावेळी बाळंतपणात अधिक दक्षता घ्यावी लागते.
रक्तात लोहाचे प्रमाण योग्य आहे की नाही हे कळते. मधुमेह आहे की नाही हे कळते. दुसऱ्या कोणत्या आजाराचा संसर्ग असल्यास तेही समजते. रक्तगट समजते. आईचा रक्तगट आर.एच. निगेटिव्ह असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. लैंगिक आजार, एड्स, रक्तकावीळ समजण्यासाठी देखील रक्ताची वेगळी तपसणी केली जाते.
तपासणीच्या वेळी रक्तदाब पाहतात व योग्य नोंद करून ठेवतात. रक्तदाब वाढल्यामुळे बाळाच्या आणि आईच्या दोघांच्याही जीवाला धोका होऊ शक्रो. त्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. अनियंत्रित रक्तदाबात झटके येऊन आई व बाळ या दोघांचा मृत्यू ओढवू शकतो.
गर्भाची वाढ नीट होत आहे की नाही हे समजते. चौथ्या महिन्यापासून गर्भाची हालचाल समजते व सातव्या महिन्यापासून गर्भाचे अवयव आणि स्थिती पोटावरून हाताला लागू शकते. तसेच हृदयाचे ठोके नीटपणे पडतात की नाही हे पाहता येते आणि त्यामुळेच योग्य ती काळजी अगोदरपासुनच घेता येते.
मायांगाची तपासणी केल्यामुळे बाळाचा जन्ममार्ग पुरेसा रुंद आहे की नाही हे पाहता येते आणि तसे नसेल तर मग शस्त्रक्रिया करावी लागेल की काय हे अगोदरच ठरवता येते. मुदतपूर्व प्रसुतीची शक्यता समजते व वेळीच उपचार करता येतात.
रोज गरम पाण्याने अंग चोळून आंघोळ करावी. केस स्वच्छ करावेत. स्तनाग्रे स्वच्छ धुवावीत. मायांगाची स्वच्छता नीट करावी. आतले बाहेरचे कपडे स्वच्छ वापरावेत. दात सकाळी उठल्यानंतर स्वच्छ करावेत. रात्रीही झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.
स्त्रोत : गरोदरपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 4/23/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...