कांता बऱ्याच दिवसानंतर आपल्या २ वर्षाच्या मुलीसोबत लग्नानिमित्त माहेरी आली. माहेरी सगळ्यांच्या भेटी होणार ह्या आनंदात ती होती. लग्नाच्या दिवशी कांताला तिची बालमैत्रीण लता तिच्या मुलीसोबत भेटली. तिची मुलगी इतकी गोंडस, चपळ आणि हसरी बघून कांताला आश्चर्य वाटले. कांताची मुलगी मात्र एका जागी शांत बसून होती. लताने कांताच्या मुलीला उचलून घेतले. ती फारच मरगळलेली होती. वजन पण कमी होते आणि पोट फुगून नगाऱ्यासारखे झाले होते. लताच्या लक्षात आले की कांताच्या मुलीचे कुपोषण झालेले आहे.
लता कांताला घेऊन जवळच्या झाडाच्या सावलीत बसली. तिने कांताला तिच्या मुलीचे कुपोषण झाल्याचे सांगितले. कुपोषण योग्य तो आहार न मिळाल्यामुळे झाले होते. पण त्याचबरोबर हेही सांगितले की लगेचच योग्य, पौष्टिक आहार सुरु केला तर कुपोषण आटोक्यात येऊ शकेल. तरी पण कांताच्या मनात शंका होतीच- तर मी तर काळजी घेतलीच मग असे कसे झाले ?
लताने लगेच आपण बाळंतपणापासून आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी कशी घेतली ते सांगितले. लता आणि तिच्या सासूबाई दोघीही साक्षर होत्या. त्या तिला गरोदरपणात कोणता आहार घ्यावा, कसा घ्यावा हे सांगत असत. तिच्या सासुबाई तिला नाचणी, सोयाबीन, गहू, तांदूळ, मका इ. वापरून तिखट, गोड पदार्थ पुस्तकात वाचून तयार करून खायला देत होत्या. तिच्या जेवणात आवर्जून असणारे पदार्थ म्हणजे पालेभाज्या, भाकरी, वरण, कोशिंबिरी, मोड आलेली कडधान्ये- जेव्हा शक्य होईल तेव्हा पेलाभर दूध घेतले आणि फळही खाल्ली. आहाराबरोबर डॉक्टरांनी सांगितलेल्या (रक्त, लघवीच्या) तपासण्या वेळोवेळी करून घेतल्या आणि लसीकरणही केले.
लता तिच्या सासुबाईसारखी बचत गटाची सदस्या होती, त्यामुळे छोटया मोठया खर्चासाठी तिला बचत गटातून कर्ज घेता आले.
लताचे गाव हे हागणदारीमुक्त गाव होते. सगळ्यांच्या घरी शौचालये बांधलेली होती. त्यामुळे गावातले वातावरण आरोग्यपूर्ण होते.
बाळंतपणात लताच्या घरच्यांनी घराजवळील जागेत सांडपाण्याचा वापर करून परसबाग लावली. त्यामुळे घरच्या पालेभाज्या आणि फळभाज्या भरपूर प्रमाणात खायला मिळाल्या.
बाळंतपणात लताच्या घरच्यांनी तिची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेतली. ज्या खोलीत ती राहात होती ती खोली स्वच्छ होती, भरपूर प्रकाश येत होता. तिच्या खाण्या- पिण्याची जास्त काळजी घेत होते. बाळाला लसीकरणाचे डोस दिले जात होते. लताच्या जेवणामध्ये भरपूर पौष्टिक आहार होता.
बाळ ६ महिन्याचे झाल्यानंतर लताने वरचे खाणे म्हणजे भाताची पेज, तांदळाची पेज, केळ दुधात कुस्करून, भाज्यांचे सार इ. ४/५ – वेळा स्तनपाना व्यतिरिक्त – थोडे थोडे बाळाला खायला देत होती. खाण्याबरोबर बाळाचे वजन वाढतेय की नाही हे पण तपासून पहात होती.
ह्या सगळ्याबरोबरच लता बाळाबरोबर भरपूर खेळत आणि बोलत होती. लताच्या बोलण्याला बाळ हुंकार देऊन उत्तर दयायचे, हसायचे, पाय हलवायचे. ह्यातून बाळाची मानसिक वाढ योग्य दिशेने होतेय की नाही हे काळात होते.
लताच्या गावात नाचणी, सोयाबीन, तांदूळ, मका जास्त पिकत होता. एकदा तिच्या वाचनात नाचणी आणि तांदूळ वापरून तयार करण्याचे काही सोपे आणि कमी खर्चाचे पदार्थ आले. तिने ते लगेच करून बघितले. घरच्या सगळ्यांना ते खूप आवडले. त्यानंतर लता आपल्या शेतात आणि परसबागेत उगवणारे धान्य आणि भाज्या वापरूनच पदार्थ करू लागली. अशा तऱ्हेने योग्य पौष्टिक आहार घेत असल्यामुळे लताच्या मुलाची शारीरिक आणि बौद्धीक वाढ योग्य रीतीने झाली. नेहमी ती व तिचे बाळ उत्साही व हसरे दिसू लागले.
स्त्रोत : चिमणचारा संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 1/29/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक...