অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गरोदरपणातील सामान्य तक्रारी

मळमळ-उलटी-चक्कर

विशेषतः पहिल्या तीन-चार महिन्यांत ब-याच स्त्रियांना हा त्रास होतो. यावरूनच गरोदरपणाची पहिली सूचना मिळते. शरीरातील स्त्री-संप्रेरकांची (हार्मोन्स) पातळी वाढल्याने हा त्रास होतो. तीन-चार महिन्यांत हा त्रास आपोआप थांबतो.

या त्रासावरचा सोपा उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर थोडे कोरडे अन्न खाऊन घ्यावे. (उदा. भाकरी, बिस्किटे). चहा शक्यतो टाळावा. दिवसभरात थोडेथोडे तीन-चार वेळा खावे. यामुळे जठरातील आम्लता कमी होते व मळमळ होत नाही. जास्त त्रास असल्यास सूतशेखर वटी घेतल्यास उपयोग होतो. याशिवाय काही घरगुती उपाय पुढे दिले आहेत.

  • डाळिंबाचा रस किंवा फळाच्या सालीचा काढा साखर टाकून प्यायला द्यावा.
  • एक लिटर उकळलेले पाणी खाली उतरवून त्यात दोन पसे साळीच्या लाह्या टाकून झाकण ठेवावे. यात मीठ-साखर घालून नंतर प्यायला द्यावे.
  • एक वेलदोडा तव्यावर काळपट होईपर्यंत भाजून त्याची पूड करून मधातून चाटवावी. याने ताबडतोब आराम वाटतो.
  • शक्य असल्यास या बरोबर सूतशेखर एक गुंज मधातून सकाळी उठल्याबरोबर चाटण द्यावे. असे पाच-सात दिवस करावे.

यानेही मळमळ-उलटया थांबत नसतील व तीन-चार महिन्यांनंतरही त्रास चालूच असेल तर डॉक्टरांकडे पाठवावे.

होमिओपथी निवड

कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, लायकोपोडियम, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस,पल्सेटिला, सेपिया, सिलिशिया, सल्फर

पोटात जळजळ होणे

शरीरातल्या 'स्त्रीरसाच्या' (संप्रेरक) बदलांमुळे जठरात आम्लता वाढून हा त्रास होतो. हा त्रास शेवटच्या तीन-चार महिन्यांत जास्त होतो. कारण पोटात जागा कमी उरल्याने खाल्लेले अन्न व जठररस वर अन्ननलिकेत घुसतात. हा त्रास न थांबल्यास सूतशेखर किंवा ऍंटासिड गोळया घेतल्याने आराम वाटेल. तिखट, मसालायुक्त पदार्थ टाळणे फायद्याचे ठरते. याने त्रास थांबत नसल्यास डॉक्टरकडे पाठवावे.

वारंवार लघवी होणे

पहिल्या तिमाहीत गर्भाची पिशवी लघवीच्या पिशवीवर दाबली जाते. यामुळे लघवी वारंवार होते. दुस-या तिमाहीत गर्भाशय वाढून मूत्राशयाच्या वर गेले, की हा त्रास आपोआप थांबतो.

लघवी अडकणे

लघवीच्या मार्गावर गर्भाशयाचा दाब पडून जळजळ, लघवी अडकणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास तीन-चार महिन्यांनंतर थांबतो. फार त्रास होत असेल तर मात्र रुग्णालयात नेऊन मूत्रमार्गात नळी घालून लघवी मोकळी करावी लागते.

बध्दकोष्ठ

गर्भाशयाच्या दाबामुळे गुदाशयावर दाब देऊन मलविसर्जनाला अडथळा येतो. तसेच गर्भावस्थेत शरीरात जे संप्रेरक रस निर्माण झालेले असतात त्यांच्यामुळे आतडयाची हालचाल कमी होऊन बध्दकोष्ठाची प्रवृत्ती तयार होते. जेवणात भाजीपाला भरपूर असेल तर बध्दकोष्ठाची तक्रार सहसा निर्माण होत नाही. मात्र जुलाबाचे कोणतेही औषध गरोदरपणात घेऊ नये, त्यामुळे गर्भपाताची भीती असते. सौम्य रेचक (उदा. त्रिफळा चूर्ण) घेणे पुरेसे असते.

हिरडयांना सूज येणे

गरोदरपणात काही जणींच्या हिरडया सुजून लालसर दिसतात व दुखतात.

पायांवरच्या शिरा सुजणे

गर्भाशयाचे वजन पोटातल्या मुख्य रक्तवाहिन्यांवर (नीला) पडून पायावरच्या शिरांमधून रक्त साठते. याचमुळे गुदद्वाराच्या नीलाही फुगतात. रक्तप्रवाहात असा अडथळा विशेष करून उताणे झोपून राहिल्याच्या अवस्थेत होतो.

यावर उपचार म्हणजे झोपताना पायथ्याकडची बाजू उंच करणे. (उदा. पायाखाली उशी घेणे किंवा पलंग असल्यास पायाकडची बाजू विटा ठेवून उंच करणे). बहुतेक वेळा पायावरच्या शिरांची सूज बाळंतपणानंतर कमी होते.

मूळव्याध

गर्भाशयाचा दाब पोटातल्या नीलांवर आल्याने मूळव्याधीचे मोड दिसतात. हे मोड दुखत नाहीत व रक्तस्रावही होत नाही.

यासाठी तिखट मसालेदार पदार्थ टाळणे, पालेभाज्या खाणे, या उपायांबरोबर मूळव्याध मलमाचा वापर करणे फायद्याचे ठरते. मूळव्याध मलमाचे मुख्य काम म्हणजे गुदद्वाराची त्वचा मऊ करणे व घर्षण टाळणे.

रक्तपांढरी

हा आजार खूप मोठया प्रमाणावर आढळतो, पण गंभीर समजावा. बाळाच्या वाढीसाठी गर्भारपणात शरीराला लोह व कॅल्शियमच्या क्षारांची गरज जास्त असते. तसेच गर्भारपणात आईच्या शरीरातील पाण्याचा अंश वाढल्यामुळे रक्तद्रव्याचे प्रमाण कमी राहून (100 मि.ली. मध्ये 12 ग्रॅम इतके ) रक्त थोडे 'पातळ' होते.

आपल्या देशात स्त्रियांना काबाडकष्ट व निकृष्ट आहार हा दुहेरी त्रास असतो. त्यातही स्त्रियांना मिळणा-या दुय्यम दर्जामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल सर्वसाधारण हलगर्जीपणा आढळतो. जंत व मलेरिया हे आजारही खूप आढळतात. या अनेक कारणांमुळे स्त्रियांच्या रक्तात मुळातच रक्तद्रव्याचे प्रमाण कमी आढळते.

गर्भारपणात यावर अधिकच बोजा येऊन रक्तपांढरी खूप मोठया प्रमाणात आढळते.100 मि.लि. मध्ये 6 ग्रॅमपेक्षा कमी प्रमाण (तीव्र रक्तपांढरी) असेल तर बाळंतपण धोक्याचे ठरते. 6 ते 10 ग्रॅम (सौम्य रक्तपांढरी) असेल तर आधीपासूनच लोहाच्या गोळया घ्याव्या लागतात. बाळंतपणाच्या वेळेपर्यंत रक्तद्रव्याचे प्रमाण किमान दहा ग्रॅम हवे. गरोदरपणात जास्त फिकेपणा वाटत असेल व जास्त थकवा, छातीत धडधड, पायांवर सूज,इत्यादी जाणवत असतील तर नक्कीच रक्ततपासणी करून घ्यावी. सहा ग्रॅमपेक्षा कमी रक्तप्रमाण आढळल्यास रक्त भरावे लागते. असे बाळंतपणही रुग्णालयातच करावे.

प्राथमिक आरोग्यकेंद्रामार्फत गरोदर व प्रसूत स्त्रियांना फेरस (लोह) गोळया वाटल्या जातात. या गोळया रोज एक याप्रमाणे नियमित 100 दिवस घेतल्यास संभाव्य रक्तपांढरी टाळता येते. रोज दोन प्रमाणे एकूण दोनशे गोळया घेणे अधिक चांगले. याबरोबरच सकस आहार असणे आवश्यक आहे.

अंगावरून पांढरे जाणे

योनिमार्गातून नैसर्गिक पांढरा द्राव जाण्याचे प्रमाण गरोदरपणात वाढते. मात्र कधीकधी काही प्रकारच्या जंतूंचा प्रादुर्भाव होतो. असे झाल्यास खाज किंवा आग सुटते. यासाठी गरम पाण्याने स्वच्छता ठेवणे व योनिमार्गात औषधी गोळया ठेवणे किंवा जेंशन औषध लावणे हे उपाय आहेत.

लघवीला जळजळ होणे

गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढल्याने मूत्रनलिकेवर दाब येतो. तसेच स्त्रीसंप्रेरकांमुळे लघवीच्या पिशवीचे स्नायू ढिले पडतात. लघवी जर वरचेवर शरीराबाहेर टाकली गेली नाही तर त्यात जंतुदोष निर्माण होतो. यामुळे लघवीला चरचरण्याचा त्रास होतो. वेळीच उपचार झाले नाहीत तर मूत्रपिंडांमध्ये जंतुदोष निर्माण होऊन गंभीर आजार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी पाणी जास्त पिणे व वरचेवर लघवीला जाणे (लघवी तुंबणे टाळण्यासाठी) हे उपचार सुरू करावेत.

याने त्रास न थांबल्यास कोझालच्या गोळया पाच दिवस द्याव्यात. पाणी पिण्याचे प्रमाण जास्त ठेवावयास सांगावे. गरोदरपणात कोझालच्या गोळयांबरोबर फॉलिक ऍसिडच्या गोळया द्याव्यात.

अंग दुखण, कंबर दुखणे

गर्भारपणात निर्माण होणा-या स्त्रीसंप्रेरकामुळे स्नायुबंध ढिले पडतात. याशिवाय गरोदरपणात शरीराची कॅल्शियमची (चुना) गरज वाढलेली असते. ती पुरेशी भरून न आल्यास हा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी चौरस आहार व कॅल्शियमच्या गोळया द्याव्यात.

आयुर्वेद

कंबरदुखीसाठी शतावरी, अश्वगंधा, गोखरू यांची मिळून एक ग्रॅम पावडर पाण्याबरोबर दिवसातून तीन वेळा द्यावी. असे सात दिवस द्यावे.

याबरोबर लघुमालिनी वसंत एक गोळी विभागून एक तृतियांश गोळी रोज सकाळी द्यावी. अशक्तपणा असल्यास एक गोळी विभागून दिवसातून तीन वेळा द्यावी. लघुमालिनी वसंत ही गोळी गरोदरपणात कायम घेत राहिल्यास चांगले.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 8/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate