অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भारपणा


गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या काळाला गर्भारपणा किंवा गर्भिणी-अवस्था असे म्हणतात. मानवात ही कालमर्यादा एकूण २८० दिवसांची असते. शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून नऊ महिने मोजून त्यांत सात दिवस मिळविले की ती सर्वसाधारणपणे प्रसूतीची तारीख असते (उदा., पाळीचा पहिला दिवस १ ऑगस्टला असेल तर प्रसूतीची तारीख ८ मे). काही वेळेला प्रसूतीच्या या तारखेत १०-१२ दिवसांचा फरक पडतो. यापेक्षा जास्त दिवस गेले तर कधी कधी प्रसूती अवघड होण्याचा संभव असतो व मग अशा वेळी प्रसूती लवकर होण्यासाठी कृत्रिम उपाय योजावे लागतात.

गर्भधारणा होणे हे पूर्ण वाढ झालेल्या (वयात आलेल्या) स्त्रीच्या आयुष्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा चौफेर दृष्टींनी एक अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर आहे. ऋतुप्राप्ती होणे आणि त्यानंतर नियमित मासिक पाळी येणे हे स्त्रीच्या पूर्ण वाढीचे प्रमुख लक्षण आहे. वय १३ ते १५ (क्वचित १७ वर्षे) ही निरोगी स्त्रीच्या पूर्ण वाढीची मर्यादा असते. प्रथम गर्भधारणा होण्याचे योग्य वय १८ ते २० वर्षाच्या दरम्यानचे मानले जाते. ऋतुप्राप्तिकालापासून ऋतुनिवृत्तिकालापर्यंतच्या दरम्यानचा काळ म्हणजे वय १४ ते ४० पर्यंतचा (ही वयोमर्यादा क्वचित मागे-पुढे होऊ शकते) मधला काळ हा गर्भधारणेचा खरा काळ असतो. त्यांतही वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंतचा काळ गर्भधारणेस विशेष अनुकूल असतो.

मासिक पाळी चुकली म्हणजे गर्भधारणाच झाली असे मात्र नाही. अनियमित मासिक पाळी अन्य कारणांमुळेही होऊ शकते [→ऋतुस्त्राव व ऋतुविकार]

लक्षणे

गर्भधारणेमुळे मासिक पाळी चुकली की, प्रथम विशिष्ट भावना होऊ लागतात. मळमळणे, उलट्या होणे, डोहाळे लागणे (म्हणजे विशिष्ट पदार्थांवर वासना जाणे आणि विशिष्ट पदार्थांवरची वांच्छा उडणे), वरचेवर लघवी होणे, मलावरोध होणे या सुरुवातीच्या भावना आणि लक्षणे असतात. काहींना डोहाळे अजिबात लागत नाहीत. दुसरा महिना सरत आला की, स्तने घट्ट वाटू लागतात. ती ठुसठुसू लागतात. स्तनाग्रे फुगीर होऊन पुढे येतात. स्तनाग्रांच्या भोवतालची जागा (कुचपरिमंडल) काळसर होऊन त्यावर बारीक बारीक ठिपके दिसू लागतात. काही स्त्रियांत डोळ्यांखालची जागाही काळसर दिसू लागते. तिसरा महिना संपत आला की, मळमळ, उलट्या होतात. डोहाळे कमी होतात. क्वचित चौथ्या महिन्यापर्यंत उलट्या थांबतात. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी स्तने दाबल्यास त्यांतून किंचित पाण्यासारखा स्राव निघतो. ही सगळी लक्षणे आणि भावना काही वेळा गर्भधारणा नसूनसुद्धा काही मानसिक विकृतीत आणि विशिष्ट शारीरिक रोगात दिसून येतात. अशा वेळी गर्भधारणेचे निश्चित निदान (१) अ‍ॅशेम झॉण्डेक, (२) फ्रिडमन किंवा (३) हॉगबेन यांपैकी कुठल्याही पद्धतीच्या जैव परीक्षेने करता येते. आणखीही अनेक पद्धती प्रचलित आहेत. उदा., प्रतिरक्षा-परीक्षा (प्रतिकारशक्तीनिदर्शक रक्तरसातील ग्‍लोब्युलिनाची म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या पण लवण विद्रावात विरघळणाऱ्या एक प्रकारच्या प्रथिनाची परीक्षा) व हॅम्‍नोन-परीक्षा. अ‍ॅशेम झॉण्डेक परीक्षेमध्ये संशयित गर्भवतीचे मूत्र मादी उंदरास टोचल्यानंतर त्याच्या अंडाशयात होणाऱ्या विशिष्ट फरकावरून गर्भधारणा, दृश्य चिन्हे दिसण्यापूर्वी दीडमहिन्यातच निश्चित ओळखता येते. फ्रीडमन परीक्षेमध्ये हेच मूत्र सशास टोचतात. हॉगबेन परीक्षेमध्ये ते बेडकात टोचतात.

तिसऱ्या महिन्याच्या शेवटी पोट तपासल्यास विस्तारित (वाढलेले) गर्भाशय हाताला जाणवण्यास सुरुवात होते. वाढत्या गर्भाबरोबर गर्भाशयाची वाढ होत राहिल्याने पोटही हळूहळू मोठे होऊ लागते. साडेचार महिन्यांच्या सुमारास गर्भवतीला आतील गर्भाची हालचाल समजू लागते. पाचव्या महिन्यात गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. यावेळी ते अतिशय जलद, अस्पष्ट आणि अनियमित असतात. सहाव्या महिन्यात गर्भाचे अवयव हाताला लागण्यास सुरुवात होते. महिन्यागणिक वाढत्या गर्भाबरोबर गर्भाशयाचा आकारही वाढत जातो. सहाव्या महिन्यात तो बेंबीच्या पातळीला येऊन पोहोचतो. या महिन्यात (डोहाळे, उलट्या यांखेरीज पूर्वीची इतर लक्षणे असतातच) गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे पोटावरती त्वचा ताणत जाते व त्यावर काळसर चकचकीत उभ्या रेषा उमटतात. सातव्या महिन्यात गर्भाची हालचाल विशेष जाणवते. गर्भाशयाची पातळी बेंबीच्या वर जाते. आठव्या महिन्यात वरील सर्व लक्षणे असतात आणि गर्भाशयाची पातळी उरोस्थीच्या (छातीच्या मध्यरेषेवरच्या चपट्या हाडाच्या) खाली सु. ५ सेंमी. असते. नवव्या महिन्यात ही पातळी उरोस्थीच्या खालच्या टोकाला जाऊन भिडते.

पूर्ण दिवस भरत आले की, एक दिवस अचानक गर्भाचे डोके खाली कटिर भागात उतरते. गर्भाशयाचा आकार लहान होतो, त्याची पातळी पुन्हा खाली येते आणि गर्भवतीला एकदम हलके वाटू लागते. ही क्रिया पहिलटकरणीत नवव्या महिन्याच्या मध्यावर (प्रसूतीच्या आधी तीन आठवडे) घडते. त्यानंतरच्या सगळ्या खेपांच्या वेळी ही क्रिया प्रसूतिवेदना सुरू झाल्यावर घडते.

विशेष काळजी

गर्भारपणी निरोगी स्त्रीच्या शरीरातील अंतःस्त्रावी (ज्यांचा स्त्राव नलिकेवाटे अगर छिद्रातून न स्त्रवता सरळ रक्तात मिसळला जातो अशा) ग्रंथी व इतर इंद्रिये आपआपली कामे जास्त वेगाने करीत असतात. त्यामुळे या अवस्थेत गरोदर स्त्री अधिक टवटवीत दिसते. तरीसुद्धा सर्वसामान्यपणे आहार, व्यायाम, विश्रांती इ. बाबतींत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. रोजच्या आहारात प्रथिने, वसामय (स्‍निग्ध) पदार्थ, पिष्ठ, लवणे, जीवनसत्त्वे इ. आवश्यक घटक भरपूर प्रमाणात पाहिजेत. अन्न साधे, सहज पचेल असे, पण पौष्टिक असावे. पालेभाज्या, मोड आलेल्या कडधान्यांच्या (वाफलेल्या) उसळी, कच्च्या कोशिंबिरी, फळे इ. भरपूर प्रमाणात घ्यावीत.तेलकट, तळकट, गरम मसाला आणि झणझणीत तिखट जेवणात असू नये. कडक चहा अगर कॉफीसारखी उत्तेजक पेये फार घेऊ नयेत. यांखेरीज गर्भाच्या वाढीसाठी लोह, कॅल्शियम (विशेषत: पहिल्या सात महिन्यांपर्यंत) आणि जीवनसत्त्वे ही जास्त प्रमाणात लागतात. आहारातून याचा योग्य तो पुरवठा होत नसेल, तर हे घटक असलेल्या गोळ्या घ्याव्यात. मांसाहारी गर्भवतीने डॉक्टरच्या सल्‍ल्याने त्या आहाराचे प्रमाण ठरवावे. अतिरिक्त (वाजवीपेक्षा जास्त) प्रमाणात मांसाहार घेतल्यास मूत्रपिंडांवर ताण पडून लघवीत दोष निर्माण होण्याचा धोका असतो. योग्य आहार आणि भरपूर पाणी घेतल्याने गर्भारपणी होणारे मलावरोध, पांडुरोग (अ‍ॅनिमिया), सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा आणि त्यातून निर्माण होणारे अस्थिमार्दवासारखे रोग, मूत्रपिंडाचे रोग इ. अनेक व्याधी टाळता येतात.

गर्भवतीने आपली नित्याची कामे करण्यास हरकत नाही. पण जड वजन उचलणे आणि फार शारीरिक श्रम होतील अशी कामे टाळावीत. विशेषत: पूर्वी जर गर्भपात झाले असतील, तर अशा गर्भवतीने फार काळजी घ्यावी. सायकलवर बसणे; उड्या मारणे; टेनिस, बॅडमिंटन खेळणे; शिवणाच्या पायमशिनवर फार वेळ बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. रोज सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जावे. गर्भवतीला रोज रात्री कमीत कमी आठ तास तरी शांत झोप मिळाली पाहिजे. दुपारीही एक तासभर तिने स्वस्थ पडून रहावे. पुष्कळ वेळा पायांच्या पोटर्‍यांत गोळे येण्याने, अगर गर्भाच्या वाजवीपेक्षा जास्त हालचालीने झोपेत अडथळा येतो.

गर्भारपणी–विशषतः शेवटच्या दोन महिन्यांत-स्तनांची काळजी घेणे आवश्यक आहे. स्तनाग्रे रोज साबणाने स्वच्छ धुवावीत, हलक्या हाताने पुढे ओढावीत व त्यांना व्हॅसलीन लावून ठेवावे. असे केल्याने प्रसूतीनंतर मुलाला अंगावर पिणे सुलभ जाते आणि त्या काळात स्तनांना चिरा पडत नाहीत.

गर्भवतीचे वजन गर्भाच्या वाढीबरोबर नियमित वाढत राहिले पाहिजे. पण नऊ महिन्यांच्या काळात ते १० किग्रॅ. वर वाढूनही उपयोगी नाही. एकाएकी वजन वाढणे ही (१) उल्बद्रव (गर्भाभोवतील एका पातळ आवरणात असणारा द्रव) वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात वाढणे, (२)जुळे गर्भ, (३) मूत्रपिंडाचे विकार यांची संभाव्य लक्षणे होत.

गर्भारपणी लैंगिक संबंध शक्यतो टाळावेत. विशेषत: शेवटचे तीन महिने पृथक्‌शय्या असावी.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate