অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भारपणातील मधुमेह

गर्भारपणातील मधुमेह

आई बनण्याची इच्छा असणा-या स्त्रियांसाठी मधुमेह म्हणजे धोकाच. मातृत्व म्हणजे जणू आनंदाचा मुकूट परिधान करणं, स्त्रीत्त्वाचा सर्वात मोठा सन्मान असं चित्र रंगवलं जात. हे मातृत्त्व त्याच्या काही समस्यांसोबतच येतं, ज्यामुळे नव्याने आई झालेल्या स्त्रीला अपयश आल्याप्रमाणे नराश्य येऊ शकतं आणि तिच्या क्षमता आणि निर्णयांविषयी तिला असुरक्षित वाटू शकतं. आपल्या गर्भात एका बाळाची वाढ होणे, हा स्त्रीला येणा-या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्कृष्ट आणि अमूल्य असा अनुभव असला तरी काही वेळा यानंतर ती स्त्री आणि तिच्या बाळाला आयुष्यभर काही आजार साथ करतात.

दरवर्षी संपूर्ण भारतात एक लाखांहून अधिक गर्भवती स्त्रियांमध्ये प्रजनन काळातील मधुमेहाची समस्या निर्माण होते. अद्याप अनाकलनीय असलेल्या काही कारणांमुळे मातेच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत असतं, मात्र त्याचा पुरेपूर किंवा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. त्यामुळे तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात ग्लुकोज किंवा साखर जमा होते. या परिस्थितीला ‘हायपरग्लिशेमिया’ म्हणतात. हा त्रास फक्त स्त्री गर्भवती असतानाच होतो. गर्भवती स्त्रियांना होणा-या त्रासांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच, २४ आणि २८ आठवडे या काळात हा त्रास निर्माण होतो. याच काळात मातेच्या इन्शुलिन वापरण्याच्या क्षमतेवर तिच्या संप्रेरकांचा परिणाम होतो.

गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह दोन प्रकारचे असतात

एक प्रजनन काळातील मधुमेह, ज्याचं निदान गर्भारपणात होतं आणि दुसरा प्रजनन पूर्व किंवा आधीपासून असलेला मधुमेह (टाइप १ आणि २) याचं निदान गर्भ राहण्यापूर्वीच करता येतं.

गर्भवती स्त्रियांना मधुमेह होण्याचं प्रमाण दर २० स्त्रियांमागे एक इतकं आहे. साधारणपणे गर्भारपणाच्या तेराव्या आठवड्यापासून २८ व्या आठवड्यापर्यंत हा त्रास असतो आणि त्यानंतर गर्भारपणाबरोबरच संपतो. संप्रेरकांमधील बदल आणि वजन वाढणं ही निरोगी गर्भारपणाची लक्षणं आहेत, मात्र काही वेळा हीच लक्षणं आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तुम्हाला गर्भ राहण्यापूर्वीच मधुमेह असेल तर त्याला ‘प्रसूतिपूर्व मधुमेह’ असं म्हणतात.

गर्भवती स्त्री मधुमेह रुग्ण असेल किंवा तिला संप्रेरकांमधील बदलांमुळे मधुमेह झाला तर बाळालाही मधुमेहाची लागण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ते बाळ काही वैगुण्यांसह जन्माला येण्याची शक्यता असते.

गर्भवती स्त्रियांमधील मधुमेह तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी अनेक प्रकारची गुंतागुंत तयार करू शकतो.

मातेवर परिणाम करणा-या काही बाबी

उच्च रक्तदाबामुळे प्री-एक्लप्मेशिया हा आजार उद्भवणे

गर्भाशयात बाळाच्या भोवती असलेल्या द्रावणाच्या पातळीत वाढ होणे

प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वीच, अगदी ३७ आठवड्यातही मूदतपूर्व प्रसूती

सिझर होण्याची आणि त्यातून आणखी गुंतागुंत होण्याची शक्यता

त्यानंतरच्या गर्भारपणातही प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्यता

उर्वरित आयुष्यात टाइप २ प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता

बाळांवर होणारे संभाव्य परिणाम

जन्मानंतर काही दिवस बाळाच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी असण्याची (हायपोग्लिशेमिया) शक्यता असते.

मातेच्या रक्तात गर्भारपणात अतिरिक्त साखर असल्यास मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. त्यामुळे बाळाच्या फुफ्फुसांची वाढ होण्याची संधीच मिळत नाही. यातून बाळाला श्वसनाचे विकार होण्याची शक्यता फारच जास्त असते.

ते बाळ भविष्यात स्थूल होण्याची शक्यता फारच जास्त असते.

ते बाळ वयस्क झाल्यानंतर त्यालाही मधुमेहाचा त्रास होणे साहजिकच असते.

गर्भारपणात स्वत:ची काळजी कशी घ्याल?

प्रजनन काळातील मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू न देणे. यासाठीची तयारी तुम्ही गर्भार राहण्याआधीपासून करायला हवी. मात्र, तुम्हाला हा त्रास असेल तर त्याच्याशी सामना करण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी काही

महत्त्वाच्या बाबी

गर्भारपणाचा आराखडा तयार करा : गर्भ राहण्याआधीच शक्यतो तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गर्भ राहण्याआधीपासूनच तुमचे वजन योग्य असेल, याकडे लक्ष द्या.

तुमच्या रक्तातील साखरेची चाचणी करून घ्या : रक्तातील साखरेचं प्रमाण धोकादायक पातळीवर नाही ना हे पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना सांगून त्याची तपासणी करू शकता. तुम्ही गर्भार राहण्याच्या किमान तीन महिने आधीच रक्तातील साखर योग्य प्रमाणात आहे की नाही, हे तपासून घ्या. दर आठवड्याला किमान अडीच तास व्यायाम करा. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तातील साखरेचं प्रमाण नियमितपणे तपासण्यासाठी ‘ब्लड ग्लुकोज मीटर’चा वापर करा.

आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या

योग्य आहारपद्धती अवलंबा. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहते तसंच तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते.

व्यायाम

या काळात योग्य आणि सुरक्षित व्यायाम करण्यासाठी तुमच्या फिटनेस एक्स्पर्ट्सशी चर्चा करा. योग्य तपासणीचा निर्णय : गर्भारपणातील मधुमेह इन्शुलीनच्या साहाय्याने आटोक्यात ठेवता येतो. ओएचए वादग्रस्त आहे. इन्शुलिन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य पातळीवर ठेवल्याने तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. तसंच त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात रोखले जातात आणि गर्भारपणातून चांगले परिणाम साधण्यास तुम्हाला मदत होते. २४ तासांच्या अंतराने इन्शुलिन पम्प घेतल्याने मधुमेह आटोक्यात ठेवण्यास साहाय्य मिळते. पम्प अधिक परिणामकारक आहेत. कारण, ही इन्शुलिन देण्याची योग्य, अचूक आणि लवचिक पद्धत आहे आणि रक्तातील साखरेचं अतिशय अचूक प्रमाण राखलं जातं. त्यामुळे, माता आणि बाळ दोघांनाही गुंतागुंतीपासून सुरक्षा मिळते. सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्हाला प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्यता अगदीच कमी असेल तरीही तुम्ही तुमच्या गर्भारपणाची नीट आखणी करायला हवी, तुमच्या डॉक्टरांशी यासंदर्भात बोला, डॉक्टरांकडे जाताना प्रत्येक वेळी तुमची सर्व औषधं सोबत बाळगा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि गर्भारपणात वजन अधिक वाढवू नका. या प्रकारची काळजी घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाईल आणि प्रजनन काळातील मधुमेहापासून तुमचे संरक्षण होऊ शकेल.

 

डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

स्त्रोत : प्रहार

संकलन : छाया निक्रड

 

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate