অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गर्भाशय


अंड्यांचे निषेचन (फलन) ज्यांच्या शरीराच्या आत होते अशा बहुतेक प्राण्यांत अंडवाहिनीचा ( स्त्री-बीजांड वाहून नेणार्‍या नलिकेचा ) एक भाग रूपांतरित होऊन विकास पावणार्‍या भ्रूणाचे रक्षण करण्याकरिता भ्रूणकोष्ठ अथवा गर्भाशय तयार होतो. ही सरंचना यंत्रणा ( गर्भाशय ) अंडवाहिनीचा वरचा भाग ( याला फॅलोपिअस या शास्त्रज्ञांच्या नावावरून फॅलोपिअन नलिका म्हणतात ) आणि योनी यांच्या मधे असते.

खालच्या प्रतीच्या पृष्ठवंशी ( पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांमध्ये आढळणारा गर्भाशय सामान्यत: दुहेरी असतो. प्रत्येक अंडवाहिनीचा खालचा भाग रूपांतरित होऊन दोन गर्भाशय तयार होतात. परंतु स्तनिवर्गात अंडवाहिन्यांची एकत्रित होण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे गर्भाशय प्रदेशाच्या थोड्या भागाचे किंवा सगळ्या गर्भाशय प्रदेशाचे एकीकरण झालेले आढळते.गर्भाशयाचे प्रकार यामुळे दोन गर्भाशय आणि एक गर्भाशय यांच्यामध्ये असणार्‍या सर्व अवस्था सस्तन प्राण्यात आढळून येतात.

अशा प्रकारे अंडजस्तनींमध्ये ( अंडी घालणार्‍या स्तनिप्राण्यांमध्ये ) दोन स्पष्ट गर्भाशय ( दोन योनिमार्ग नसलेले ) असतात व शिशुधान स्तनींमध्ये ( पिल्‍लू बाळगण्यासाठी पिशवी असलेल्या प्राण्यांमध्ये ) दोन गर्भाशय आणि दोन वेगळे योनिमार्ग असतात. अशा गर्भाशयाला द्वि-गर्भाशय (यूटेरस ड्युप्लेक्स) म्हणतात. अपरास्तनींमध्ये (वार असणार्‍या स्तनी प्राण्यांमध्ये) उंदीर,ससा, बीव्हर यांच्यासारखे कृंतक (कुरतडून खाणारे) प्राणी, त्याचप्रमाणे हत्ती, काही वटवाघुळे आणि दक्षिण आफ्रिकेतील आर्डव्हॉर्क या सर्व प्राण्यांना एकाच योनिमार्गात उघडणारा द्वि-गर्भाशय असतो. डुकरे,गुरे, कित्येक कृंतक प्राणी, काही वटवाघुळे व मांसाहारी प्राणी यांत दोन्ही गर्भाशयांच्या एकीकरणाला सुरूवात झालेली दिसून येते. अशा गर्भाशयाला द्विभक्त गर्भाशय (यूरेटस बायपार्टायटस) म्हणतात. खुरी प्राणिगण, तिमिगण (सागरातील मोठ्या प्राण्यांचा वर्ग) व कीटकभक्षिगण या गणांतील प्राण्यांत व काही मांसाहारी गणांतील प्राण्यांत शिंगासारखे दोन प्रवर्ध (फाटे) असलेला गर्भाशय असतो. अशा गर्भाशयाला द्वि-शृंगी (दोन शिंगे असलेला) गर्भाशय म्हणतात आणि अखेरीस कपी व माणूस यांत दोन फॅलोपिअन नलिका असलेला गर्भाशय असतो, त्याला एक गर्भाशय किंवा साधा गर्भाशय (यूरेटस सिंप्लेक्स) असे म्हणतात.

मानवी गर्भाशय

स्रीच्या जनन तंत्रात (प्रजोत्पादन यंत्रणेत) जाड, स्नायुमय, पिशवीसारखा गर्भाशय असतो. त्याचा आकार उलट्या धरलेल्या पेरूसारखा किंवा नासपतीच्या फळासारखा असतो. गर्भाशयाचे निमुळते तोंड खालच्या बाजूस असून ते योनिमार्गात उघडते. गर्भाशयाची लांबी ७.५ सेंमी.; घुमटाकार भागाची रूंदी ५ सेंमी. आणि जाडी २.५ सेंमी. असते.

रचना

रचनात्मक दृष्ट्या गर्भाशयाचे दोन भाग होतात. वरचा रूंद गोल घुमटकार आणि जाड भाग, याला बुध्‍न म्हणतात; खालचा अरूंद, लांबट आणि निमुळता भाग, याला ग्रीवा म्हणतात. ग्रीवेचे वरचे तोंड गर्भाशयाच्या पोकळीशी जोडलेले असून त्याला ग्रीवेचे अंतर्मुख आणि खालच्या योनिमार्गात उघडणार्‍या तोंडाला बहिर्मुख असे म्हणतात. बुध्‍नाच्या दोन्ही बाजूंना कोपर्‍यात लांब नलिका जोडलेल्या असून त्यांना अंडवाहिन्या असे म्हणतात. अंडवाहिनीचे बाहेरचे टोक झालरीसारखे असते व ते अंडाशयावर लोंबत असून अंडाशयाला चिकटलेले असते. अंडाशयाच्या मागच्या बाजूला रूंद असा एक तंतूमय बंध असून त्या बंधाला विस्तृत बंध असे नाव आहे. अंडाशयाच्या मध्यवर्ती टोकापासून गर्भाशय बुध्‍नाच्या कोपर्‍यापर्यंत जाणार्‍या बंधाला गोल बंध असे म्हणतात. या दोन बंधांमुळे गर्भाशय जागच्याजागी कायम राहतो.

गर्भाशयाचे स्‍नायू खूप जाड असून आतील पोकळी अरूंद आणि त्रिकोणी फटीसारखी असते. गर्भाशयाला एकूण तीन थर असतात. सर्वांत बाहेरचे आवरण पर्युदराचे (उदरातील इंद्रियांवरील पडद्यासारख्या आवरणाचे) बनलेले असते. मधले आवरण स्‍नायूंचे असून ते सर्वांत जाड असते. या आवरणाला रक्तवाहिन्या आणि तंत्रिका (मज्‍जा) यांचा भरपूर पुरवठा असतो. गर्भाशयात गर्भधारणा झाली म्हणजे हे स्‍नायू हलके हलके लांबत जातात व गर्भाशय पोकळी त्यामुळे मोठी होत जातात. सगळ्यात आतले आवरण अंत:स्तराचे असून तो स्तर गर्भाशयाच्या आतल्या पृष्ठभागावर पसरलेले असतो. हा अंत:स्तर ग्रीवेच्या अंत:स्तराशी व योनिपोकळीतील अंत:स्तराशी अखंड असतो.

गर्भाशयाचा अंत:स्तर हा श्लेष्मकलेचा (बुळबुळीत पातळ अस्तराचा) बनलेला असून तो सु. २ मिमी. जाड असतो. अंडकोशिकेची (स्त्रीबीजांडाची) वाढ होत असताना या अंत:स्तराची जाडी वाढते आणि त्यात रक्तवाहिन्या व ग्रंथींची वाढ होत असते.

अंडकोशिकेचे निषेचन न झाल्यास गर्भाशयाचा अंत:स्तर अपकर्षित होऊन (आकारमान पूर्ववत होऊन) रक्तासह विसर्जित केला जातो. या प्रकारालाच ‘मासिक पाळी’ असे म्हणतात. हे ऋतुचक २८ ते ३० दिवसांचे असते [→ऋतुस्त्राव व ऋतुविकार].

गर्भाशय हे कटीरपोकळीत दोन्ही बाजूंचे अंडाशय व अंडनलिका यांच्यामध्ये असून त्याच्या पुढील बाजूला मूत्राशय व मागील बाजूला गुदांत्र (आतड्याचा शेवटचा भाग) असते.

गर्भाशय व जननेंद्रिये यांची वाढ म्यूलेरियन नलिकेपासून (अंडवाहिनीच्या शेजारून जाणार्‍या व म्यूलर या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या नलिकेपासून) होऊन दोन्ही बाजूंचे गर्भाशयार्घ एकमेकांस मिळून त्यांचा गर्भाशय बनतो.

गर्भाशयाचे विकार: गर्भाशयाच्या विकारांचे चार प्रकार कल्पिलेले आहेत:

(१) जन्मजात,

(२) शौथज,

(३) अर्बुद व

(४) क्रियात्मक.

(१)जन्मजात: भ्रूणावस्थेमध्ये गर्भाशयाची नीट वाढ झाली नाही, तर द्विखंड गर्भाशय दिसून येतो. यात प्रत्येक बाजूला एकएक गर्भाशय, अंडशय व अंडवाहिनी स्वतंत्र असते . क्वचित प्रसंगी बाहेरून जरी गर्भाशय एकच दिसला, तरी आत एका पडद्यामुळे गर्भाशयाचे दोन भाग झालेले असतात. हा पडदा पूर्ण वा अपूर्ण असतो. गर्भाशयाचे दोन भाग असले, तरी त्यांतील एकच भाग चांगला वाढलेला असतो. क्वचित प्रसंगी दोन्ही भागांमध्ये गर्भधारणा होते, परंतु त्यांपैकी एकाच गर्भाची वाढ पूर्ण होऊ शकते. अपूर्ण वाढ झालेल्या गर्भाशयात गर्भधारणा झाली असता गर्भाशय पूर्ण वाढलेला नसल्यामुळे गर्भ अंडवाहिनीतच वाढतो व त्यामुळे नलिकागर्भाची सर्व लक्षणे दिसतात.

(२)शोथज विकार: ( दाहयुक्त सूजेमुळे होणारे विकार). आघात, बाळतपण अथवा गर्भपात यांमुळे जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयाच्या अंत:स्तराला सूज येते. गर्भाशय ग्रीवेमधील अंत:स्तरात हा विकार अधिक प्रमाणात दिसतो. उपदंश (गरमी), क्षय, पूयप्रमेह (परमा) वगैर रोगांच्या जंतूंचा संसर्ग झाल्यासही गर्भाशय- अंत:स्तरशोध होतो.

(३) अर्बुद : (नव्या पेशींच्या वाढीमुळे निर्माण होणारी आणि शरीरक्रियेस निरूपयोगी असणारी गाठ ). गर्भाशयातील अंत:स्तरापासून मोड, तंत्वार्बुद वगैरे सौम्य अर्बुदे पुष्कळ प्रमाणात दिसतात. मारक अर्बुद (कर्करोग) ग्रीवेमध्ये अधिक प्रमाणात दिसते. त्यामानाने गर्भाशयकायेमध्ये त्याचे प्रमाण कमी असते.

(४) क्रियात्मक विकारांत ऋतुविकार मोडतात [→ऋतुस्त्राव व ऋतुविकार].

 

क्षेत्रमाडे, सुमति

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate