অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वर्षा ऋतु – गर्भसंस्कार

 

वर्षा ऋतु

निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:|
मास- श्रावण, भाद्रपद
इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
रास- सिंह
ऋतुलक्षण- वर्षा हा विसर्गकाळातील ऋतु आहे.
“आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो sऽ पि सीदति |
वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे ||
सतुषारेण मरुता सहसा शीतलेन च |
भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन च वारिणा ||
वन्हिनैव च मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु |
भजेत् साधारणं सर्व उष्णं तेजपनं च यत् ||”
वा. सु. ३

अग्नि- शिशिरादि इतर तीन विसर्ग काळातील ऋतुंच्या उष्णतेच्या योगाने शरीर निःसत्व होऊन त्यांचा अग्नि मंद झालेला असतो. अशा वेळी वर्षाऋतूत दोषांचा प्रकोप होतो व अग्नि अधिकच मंद होतो.
दोषावास्था- वर्षा ऋतूत बल व अग्नि क्षीण झाल्याने पित्ताचा संचय होण्यास सुरुवात होते.
रस- वर्षा ऋतुत अम्ल रसाची वृद्धि होते.

वर्षा ऋतुतील दोषस्थितीचा जननेंद्रियावर होणारा परिणाम

प्रजनन संस्थेतील सर्व अवयव हे अपान क्षेत्रात येतात. वर्षा ऋतूत वातप्रकोप होत असतो. सृष्टीतील शैत्याधिक व अम्लविपाकी जल यामुळे वात पित्त कफ ह्या तीनही दोषांवर त्याचा अधिक परिणाम होतो. सृष्टीतील क्लेदाधिक्यामुळे स्थानिक (जनेनेंद्रियांवर) जिवाणु विषाणूजन्य विकार उदा. Candidiasis, Trichomonas, इ. अनेक विकार होतात.
स्त्रियांच्या अनुषंगाने विचार केल्यास
“ न हि वातादृते योनि नारीणां संप्रदुष्यति ||”
च. चि. ३०

अनियमित रजस्त्राव, नष्टार्तव, अल्परजस्राव ३ विकार हे वाढतात. स्थानिक विकारांमध्ये आर्द्रतेमुळे व शैत्यामुळे योनिकण्डु, मुत्रादाह, श्वेतस्त्राव ३ विकार संभवतात. अम्लविपाकी जलामुळे पित्तसंचय होतो व पित्ताच्या आश्रयाने असणाऱ्या रक्त धातूची दुष्टी होते. त्यामुळे त्याचा परिणाम रजावर होतो.
पुरुष- अग्नि व बलं क्षीण झाल्याने मैथुन सामर्थ्य कमी होतो
वर्षा ऋतु-मैथुन कालावधि-
आचार्य सुश्रुत व वाग्भटांच्या नुसार १५ दिवसांच्या अंतराने मैथुन करावे व चरकानुसार वर्षा ऋतुत व्यवाय वर्ज्य करावा असे वर्णन आढळते.

वर्षाऋतू व गर्भाधान

“ उद्मन्थ दिवास्वप्न अवश्यायं नदीजलम |
व्यायाम आतपं चैव व्यवायं चात्र वर्जयेत् ||”
आचार्य चरक व सुश्रूतांनी वर्षा ऋतुमध्ये मैथुन वर्ज्य करावे असे म्हटले आहे याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वर्षाऋतुमध्ये आचार्यांना गर्भाधान अपेक्षित नाही.

गर्भोत्पत्तीस आवश्यक घटक

आचार्य सुश्रूतांनी खालील चार घटकांचा उल्लेख केला आहे.
“ध्रुवं चतुर्णां सानिध्यात गर्भा स्यात् विधीपूर्वकः |
ऋतु क्षेत्र अम्बु बिजाणां सामग्र्यात अंकुरो यथा ||”
“शुध्दे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रे ऽ निले हृदी |
वीर्यवंत सुतं सुते…. ||”
अ.हृ.शा १/१८.

वरील सर्व श्लोकांचा विचार केला असता शारीरिक व मानसिक दृष्टीने निरोगी असणाऱ्या स्त्री व पुरुषाने संपूर्ण वीर्यात आयु प्राप्त झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी मैथुन कर्म करावे असे वर्णन आढळते.
वरील प्रत्येक घटकाचा वर्षा ऋतुच्या अनुषंगाने विचार करूया-

ऋतु

वर्षा ऋतुमध्ये वातप्रकोप असतो. त्यामुळे अनियमित रजःस्राव, अल्प रजःस्राव, कष्टार्तव हे विकार दिसून येतात. गर्भात्पत्तीसाठी नियमित ऋतु चक्र असणे गरजेचे आहे.

क्षेत्र

आचार्य वाग्भटांच्या श्लोकांनुसार त्यांनी शुद्ध गर्भाशय व प्राकृत अनिल (अपान वायू) यांचाही गर्भसंभव सामग्रीमध्ये विचार केला आहे. पुरुष व स्त्री जननेंद्रिय अपान वायूच्या क्षेत्रात येतात. वर्षा ऋतुतील वातप्रकोप हा क्षेत्रदुष्टीसाठी व विकृत संतान उत्पत्ती साठी कारणीभूत ठरतो. तसेच सृष्टीतील शैत्य व आर्द्रतेच्या परिणामामुळे स्थानिक व्याधि निर्माण होऊ शकतात.

अम्बु (आहार पाकोत्पन्न रस)

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचे पोषण हे मातेकडून होत असते. गर्भधारणेवेळी असणाऱ्या मानसिक व शारिरीक स्थितींचाही गर्भावर परिणाम होत असतो. ह्याच अनुषंगाने आचार्य चरकांनी विमान स्थानामध्ये प्रकृतीचे वर्णन करताना मातु आहार, विहार, प्रकृति, काल, गर्भाशय प्रकृती असे वर्णन केले आहे.
वर्षाऋतु अग्निमांद्य असल्याने गर्भधारणा झाल्यास अग्नि अधिक मंद होऊ शकतो व गर्भाच्या पोषणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भोपघातकार भावांचा विचार केला असता मातेने वातप्रकोपक आहारविहार केल्यास विकृत संतान उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते.

बीज


उत्तम गर्भ प्राप्तीसाठी अदुष्ट शुक्र शोणिताची आवश्यकता असते. वर्षा ऋतूमध्ये जल अम्ल विपाकी असते. त्यामुळे पित्ताचा क्षय व रक्त दुष्टी होऊ शकते. सुश्रुतांनी ‘रक्तंलक्षम् आर्तवं गर्भाकृत् च’ असे आर्तवाचे वर्णन केले आहे. त्यामुळे प्राकृत बीजनिर्मितीवर वर्षा ऋतुचा प्रभाव होऊ शकतो.
अदुष्ट शुक्रबीजाचा विचार केला असता मैथुन सामर्थ्य व प्राकृत शुक्रनिर्मिती ही देहबलावर अवलंबून असते. त्यामुळे वर्षा ऋतुत देहबल कमी असल्याने त्याचा परिणाम शुक्रधातूच्या उत्पत्तीवर होतो.
वर्षा ऋतुत गर्भधारणा झाल्यास पुढे येणाऱ्या शरदातील पित्त प्रकोपामुळे गर्भपात, गर्भस्त्राव होऊ शकतात.
जन्मणाऱ्या बालकाच्या प्रकृतीवर व स्वास्थ्यावर वात दोषाधिक्य दिसू शकते. वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता आचार्यांनी वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य का सांगितला याची मीमांसा ध्यानात येते.
आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भोत्पादन हे शुक्राचे श्रेष्ठ कर्म आहे व व्यवायाचे प्रमुख उद्देश ‘प्रजोत्पादन” असल्याने वर्षा ऋतूत व्यवाय वर्ज्य म्हणजेच गर्भधारणा न होऊ देणे हे आयुर्वेदीय संहिताकारांना अपेक्षित असावे.

गर्भिणी व विशिष्ट आहाररस इच्छा-
ज्याप्रमाणे वर्षाऋतुमध्ये निसर्गात वनस्पतींचा निर्मिती होत असते. त्याप्रमाणे गर्भिणी मध्ये गर्भाची नवनिर्मिती होत असते.

वर्षाऋतुमध्ये सृष्टीची स्थिती-
‘ आद्भिः अम्लविपाकाभिः ओशाधीभिः समीरणाः |’ अशी असते. म्हणजेच अम्ल रसाची निर्मिती होते. याचप्रकारे गर्भिणीला अम्ल रसेच्छा होते.

वर्षा ऋतु

पथ्यकर आहार
पुराण शाली, लाल षष्टिक, गहू, भाजलेले धान्य, पुराण जव, कुलत्थ, मूग, उडीद, जीरक, हिंग, काळे मिरे, जडवळ, माठ, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, लसूण, कांदा, सुंठ, सुरण, कद्दू, बोर, ताक, दूध, उकळलेले पाणी (श्रृतशीत जल), सैंधव मीठ, मधु, निंबू, अजा मांस, दाडिम, अंगुर, गरम जेवण.

पथ्यकर विहार
चंदन, खस आदि चूर्णाचा अभ्यंग, स्वच्छ, कोरडे व लघु (हलके) रंगाचे कपडे घालणे, कोरड्या जागेवर बसणे, नेहमी पादत्राणे घालणे.

अपथ्य आहार
बाजरी, मका, नवीन तांदूळ, मसूर, हरभरा (अरहर), तुरीची डाळ, हिरवा वाटाणा, पालक, मेथी, कारली, फुलकोबी, बटाटा, काकडी, सिंगाडा, टरबुज, कवठ, म्हशीचे दूध, पनीर, श्रीखंड, मिठाई, थंड जल, नदी आणि विहिरीचे पाणी, शुष्क मांस, मासे, तळलेले पदार्थ, न झाकलेले पदार्थ, शिळे पदार्थ.

अपथ्य विहार
दिवास्वाप, अधिक परिश्रम, अत्याधिक व्यायाम, प्रवात सेवन.
वर्षा ऋतु – योगासने
वर्षा ऋतूत मनुष्याचे शारीरिक बल अत्यंत कमी असते आणि वात-पित्ताची दुष्टी असते. त्यामुळे शरीरास लाभदायक व दोष दुष्टी निवारक योगासने असावीत.

वर्षा ऋतूत उपयुक्त योगासने

1. पद्मासन

2. वज्रासन

3. हलासन

4. ताडासन

5. बद्धकोनासन

6. भुजंगासन

7. वृक्षासन

8. धनुरासन

9. सर्वांगासन

 

डॉ. सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
वरळी, मुंबई – ४०० ०१८
भ्रमणध्वनी +917738086299
Email – subhashmarlewar@gmail.com

स्त्रोत : मराठीसृष्टी


अंतिम सुधारित : 8/12/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate