गर्भारपणाच्या काळात गर्भवती व गर्भ या दोघांच्याही आरोग्यकडे लक्ष पुरवून प्रसूती शक्यतो निर्धोक होण्याची काळजी घेण्याच्या प्रतिबंधात्मक परिचर्येला ‘प्रसवपूर्व परिचर्या’म्हणतात. जन्मणारे मूल पूर्णपणे निरोगी कसे जन्मेल या विषयीचा विचार व निगा यातच समाविष्ट असते.
एडिंबरो येथील रॉयल मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये १८९९ साली ‘लॉटिस्टन प्रीनेटल होम’ नावाचा विभाग उघडण्यात आला. त्यामध्ये हेग फर्ग्युसन या डॉक्टरांच्या देखरेखीखाली अविवाहित गभर्वती प्रसूतीपर्यंत ठेवण्यात येत असत. या रुग्णांना मिळालेला फायदा,रुग्णालयात न राहिलेल्या गर्भवतींपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे फर्ग्युसन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णालयात येणाऱ्या सर्वच गर्भवतींची देखभाल करणे हितावह ठरेल, अशी सूचना केली. एडिंबरो येथील जे. डब्ल्यू. बॅलन्टाइन या डॉक्टरांनी ‘प्रसवपूर्व रुग्णालय’ या विषयावर एक प्रबंध छापला. त्यात गर्भारपणाच्या शरीरक्रियात्मक व विकृतिविज्ञानविषयक अज्ञानासंबंधी उल्लेख करून प्रसवपूर्व रुग्णालयातून गर्भारपणाचा सांगोपांग अभ्यास करावा असे सुचविले. या काळापर्यंत गर्भवतींकरिता रुग्णालयातून स्वतंत्र व्यवस्था नव्हती. त्यांना सर्वसाधारण रुग्ण विभागातूनच ठेवण्यात येई. त्यांची देखरेख करणारे डॉक्टरही गर्भारपणातील विशिष्ट आजारांकडे विशेष लक्ष पुरवीत नसत.
अमेरिकेत याच काळापर्यंत बरीच प्रगती झाली होती. १९०१ पासून बॉस्टन येथील इन्स्ट्रक्टिव्ह नर्सिंग ॲसोसिएशनने बॉस्टन लाइंग-इन हॉस्पिटलच्या बाह्य-रुग्ण विभागात येणाऱ्या गर्भवतींना घरी जाऊन तपासण्याचा उपक्रम सुरू केला. १९१२ च्या सुमारास या संस्थेकडून गर्भारपणाच्या काळात गर्भवतींची प्रसवपूर्व तपासणी कमीत कमी तीन वेळा होऊ लागली. गर्भवतीच्या घरी जाऊन मूत्र तपासणी व इतर प्रसवपूर्व तपासण्या करून प्रसूतीसंबंधीचा योग्य तो सल्ला देण्यात येई. तपासणीत धोकादायक असे काही आढळल्यास रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबद्दल कळविले जाई. ऑस्ट्रेलियामध्ये १९१२ च्या सुमारास न्यू साऊथ वेल्समधील सिडनी येथे पहिले प्रसवपूर्व बाह्य-रुग्णालय उघडण्यात आले. ब्रिटनमध्ये १९१५ साली एडिंबरोमधील सर्व प्रसूती रुग्णालयांनी असे विभाग सुरू केले. १९३५ च्या सुमारास इंग्लंड व वेल्स या भागांत राज्याश्रयाखालील १,४०० प्रसवपूर्व बाह्य-रुग्णालये होती. यूरोपात गर्भारपणामध्ये योजावयाच्या प्रतिबंधात्मक देखरेखीची संकल्पना एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास सुचली होती. १८९२ मध्ये पी. सी. ब्यूदीन या फ्रेंच स्त्रीरोगतज्ञांनी शारी रुग्णालयात प्रसवपूर्व परिचर्या विभाग सुरू केला होता. त्यांचा मुख्य उद्देश जन्म प्रमाणातील घट थोपविण्याचा होता. आज सर्व सुधारलेल्या देशांतून प्रसवपूर्व परिचर्या हा प्रसूतीविज्ञानाचा अविभाज्य घटक बनला असून त्यात दिवसेंदिवस प्रगती होत आहे.
भारतात चरक-सुश्रुतांच्या काळापासून गर्भवती-परिचर्या या विषयाकडे लक्ष पुरविले जात होते. या महान आयुर्वेदाचार्यांनी हा विषय विस्ताराने उल्लेखिला आहे. इष्टापत्यप्राप्तीकरिता त्यांनी काही विधी सुचविले आहेत. गर्भवतीने मिताहारविहारी असावे, वृत्ती स्वच्छ व प्रसन्न ठेवावी वगैरे सूचना आयुर्वेदात केल्या आहेत. भाज्या, फळे, दूध, तूप, तेल इ. पदार्थ गर्भवतीच्या आहारात असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. गर्भारपणाच्या प्रत्येक महिन्यात कोणकोणता आहार असावा, हेही विषद केले आहे.
आधुनिक काळात प्रसवपूर्व परिचर्या भारतात १९३० च्या सुमारास मोठ्या शहरांतून प्रथम सुरू करण्यात आली.
सुधारलेल्या देशांतून विशेषेकरून आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या देशांतून प्रसवपूर्व परिचर्येचा भर गर्भिणी विषबाधेची [⟶ गर्भारपणा] पूर्वावस्था आणि अप्राकृत गर्भदर्शन (प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाच्या मुखाशी गर्भाचा ठराविक भाग–उदा., डोके–न येणे) यांसारख्या अपसामान्य विकृती ओळखण्यावरच दिला जातो. कारण तेथील बहुसंख्य गर्भवतींचे आरोग्य उत्तम असते. उष्ण प्रदेशीय आणि विकसनशील देशांतून गर्भवतीचे सार्वदेहिक आरोग्य सुधारण्यावर अधिक भर द्यावा लागतो. प्रामुख्याने अयोग्य पोषण आणि प्रदेशनिष्ठ रोगांकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागतात. पुष्कळ वेळा प्रसवपूर्व परिचर्येची गरज व महत्त्व पटवून द्यावे लागते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...