बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणात आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो व दर हजार प्रसूतीमागे ३-४ माता मृत्युमुखी पडतात व अनेक आजारी होतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आई व बाळासाठी बाळंतपण निर्धोक करणे हे महत्त्वाचे आहे. बाळंतपण व्यवस्थित पार पडेल याची काळजी गरोदरपणापासूनच घ्यावी लागते.
बाळंतपण कसे होते याची माहिती घेऊ या.
साधारणपणे दिवस पूर्ण भरले की बाळंतपण होते. बाळंतपण सुरु झाल्याचे खालील चिन्हांवरून ओळखता येते.
१. पोटात नियमित कळा येणे -: या कळा बरगड्यांच्या खाली पाठीवरून चालू होतात व ओटीपोटाकडे येतात. ठरावीक वेळाने त्या येतात व ओटीपोटात संपतात. पोटातल्या इतर दुखण्यांपासून त्यावेगळ्या आहेत हे कळते. शंका असेल तर एनिमा देतात. बाळंतपणाच्या खऱ्या एनिमानंतरही चालूच राहतात.
२. अंगावरून पांढरा द्राव (चिकटा) जाणे -: बाळंतपणाच्या सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडावरचा चिकट पांढरा भाग (चिकटा) सुटून बाहेर येतो आणि कधीकधी त्यात किंचित रक्ताचा अंश असतो. ही बाळंतपण सुरु झाल्याची महत्त्वाची खुण आहे.
३. गर्भाशयाचे तोंड उघडणे -: आतून तपासणी केली असता गर्भाशयाचे तोंड उघडले आहे किंवा बंद हे कळते. पहिलटकरणीत हे तोंड फक्त बाळंतपणाच्या वेळी उघडते. मात्र पुढच्या खेपेच्या मातांच्या बाबतीत हाताचे एक बोट जाईल इतका सैलपणा नेहमीच असतो. बाळंतपण चालू असेल तर गर्भपिशवीचे तोंड उघडायला लागते.
जर बाळंतपण काही कारणांमुळे घरीच करावे लागणार असेल तर नर्सबाई, प्रशिक्षित दाई कडूनच बाळंतपण करून घ्यावे.
बाळंतपणाच्या वेळी दवाखान्यात जाताना आहाराबद्दल काळजी घ्यावी. पोटभर मुळीच जेवू नये. अगदी थोडा, हलका-फुलका आहार घ्यावा. फळे, खीर, रसाहार घ्यावा. तेलकट, तुपकट काही खाऊ नये. कळा येण्याच्या वेळी उलटी होण्याची शक्यता असू शकते. भूल देण्याचा प्रसंग आला तर जेवण घेतलेले असल्यास त्रास होतो, हेही लक्षात असू दयावे.
बाळ आईचं गर्भाशय सोडायला लागले की, आईचे शरीर बाळाला बाहेर ढकलू लागते. या नैसर्गिक प्रक्रियेतूनच कळा निर्माण होतात. या कळा पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून येतात. कळा येत गेल्या की, गर्भाशयाचा वरचा भाग कठीण होत जातो व गर्भाशयाचे तोंड उघडले जाते.
बाळंतपणाच्या कला या बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास सुरु होतात. त्या सुरुवातीला १० ते १५ मिनिटाच्या अंतरा-अंतराने व पुढे पुढे लवकर लवकर येऊ लागतात. त्या पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून आतून येतात. पोटदुखीच्या वेळी जे पोट दुखते ते वेगळे असते. त्याच्या कळा अंतराअंतराने येत नाही. तसेच त्या वेदना पोटाच्या बाजूला असतात. हा फरक नीट लक्षात घ्यावा.
लघवी करताना त्रास होणे, अंगात जास्त ताप असणे, बेशुद्ध पडणे किंवा आकडी येणे, वर बाहेर पडण्यापूर्वी रक्तस्त्राव होणे, बाळंतपणाचा काळ १२ तासापेक्षा अधिक लांबणे. अशावेळी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काहीवेळा वरीलप्रमाणे त्रास होऊ शकतो.
स्त्रोत : बाळंतपण, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/18/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...