महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येते. गांधीलमाशी चावल्यावर जशी लालसर, गोलाकार मंडले त्वचेवर येतात, तशाच प्रकारच्या या गांधी उठतात. त्या वेळी प्रचंड खाज, आग होणे ही लक्षणे असतात.
मुख्य म्हणजे त्वचेवर आग होत असली तरी अंगात मात्र बारीक थंडी वाजत असते. ताप नसला तरी तोंडाला चव नसते. मळमळून उलटी देखील काही रुग्णांत होते. या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
साधारणपणे संक्रांतीनंतर वातावरणात थोडा बदल होतो. पहाटे गारवा आणि नंतर मात्र उष्ण वातावरण होते. या बदलत्या स्थितीत गारव्यामुळे कफ, वात यांची वाढ होते आणि शरीरातील पित्ताबरोबर वाढलेले कफ, वात थंडी, खाज ही लक्षणे निर्माण करतात. विशेषतः पित्तप्रधान प्रकृतीमध्ये हा त्रास लवकर वाढतो. म्हणून वातावरण बदलताना, थंडीच्या दिवसांत या लक्षणांत वाढ होते.
गांधी उठल्यावर किंवा आधी नेमकी काय काळजी घ्यायची याची कल्पना यावी म्हणून मी हे सर्व तुम्हाला सांगितले. यादृष्टीने कारणांचा विचार केला, तर घराच्या भिंतींना ओल असणे, शहाबादी थंड फरशीवर बसून काम करणे, थंड वाऱ्यात काम करताना अंगात गरम उबदार कपडे न घालणे, पाण्यात काम झाल्यावर साडी खूप ओली झाली तरी न बदलणे या कारणांनी कफ, वात यांचे संतुलन बिघडते.
अशा परिस्थितीत आपल्या नकळत आपण चुकीचा आहारही घेतो. तिखट चमचमित खाणे, ठेचा वापरणे, जागरण करणे आणि चहा पिणे, आंबट ताक- दही वारंवार खाणे यामुळे पित्तप्रकोप होतो आणि त्वचेवर लालसर रंगाची आग होणारी मंडले निर्माण करतो.
थोडक्यात म्हणजे, ही जी कारणे मी सांगितली, त्यांचा विचार करून सवयींमध्ये बदल करायला हवा.
अंगावर गांधी उठत असल्यास आणि त्रास वारंवार होत असल्यास खरं तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन नियमितपणे चिकित्सा करून घ्यावी. पण, त्या वेळी एवढी खाज आणि आग होत असते, की थोडा आराम पडावा याकरिता उपाय करणे जरुरीचे असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वेटर, सनकोट, शाल घेऊन शरीर झाकावे. हाता-पायांना गार वारा लागू देऊ नये. 3-4 आमसुले पाण्यात भिजत घालावीत व ते पाणी अंगाला लावावे.
खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून लावल्यासही फायदा होतो. हळदीपासून बनवलेले हरिद्राखंड हे औषध या गांधींवर उत्तम कार्य करते. दाह कमी करण्यासाठी आवळा पावडर, ज्येष्ठमध, गुळवेल, नागरमोथा समभाग एकत्र करून अर्धा चमचा पावडर पाण्याबरोबर किंवा मोरावळ्याबरोबर घ्यावी, त्यामुळे खाज कमी होते. आमसुलाचे सार, चटणी खावी. कोकम सरबत, आवळा सरबत घेतल्यास पित्त- कफ- वात यांचे संतुलन सुधारते.
सुतशेखर वटी, कामदुधा वटी यांसारखी अनेक औषधे उत्तम कार्य करतात; पण त्यांचा डोस व्यक्तीपरत्वे बदलतो. म्हणून मनाने औषधे घेऊ नयेत. वैद्यांचा सल्ला घेऊन औषधे सुरू करावीत.
कामाच्या व्यापात काही वेळा साध्या साध्या गरजाही भागवण्याचा आपण कंटाळा करतो. उदा. पाणी पिणे, लघवीला जाणे, वेळच्या वेळी पोट साफ होणे या गोष्टींत विलंब करू नये.
अंघोळीसाठी गरम पाणी वापरावे, त्यात कडुलिंबाची पाने घातली तर जंतुघ्न म्हणून कार्य होते. बाहेर जाताना विशेषतः पहाटे, रात्री स्वेटर घालून जावे. गार वारा खाज निर्माण करतो म्हणून स्वेटर / सनकोट घालून पूर्ण हात झाकावेत.
आपल्या घरातील नेहमीच्या वापरातील काही गोष्टींचे औषधी गुणधर्म महिलांना माहीत असतील. लक्षणांमध्ये वाढ होणे आपण स्वतःच रोखू शकतो. आपला आहार कसा असावा यासंबंधी प्रत्येक स्त्रीने जागरूक असायला हवे, कारण इतरांचे आरोग्य जपणे आणि स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवणे ही मोठी जबाबदारी तिला पेलायची असते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अन्नामध्ये काही काही वेळा जंतूंमुळे विष तयार होते,...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...