অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मासिक पाळी


ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर टाकले जाण्याची क्रिया होय. ह्या सह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते. पौगंडावस्थेपच्याष सुरुवातीस (मेनार्क) मासिक पाळी चालू होते आणि रजोनिवृत्तीच्याे वयात (मेनोपॉज) कायमची संपते.

मासिक पाळीचे चक्र

मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्या ला पहिला दिवस म्हिणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्रा व चक्र साधारणपणे 25 ते 36 दिवसांचे असते. फक्त 10 ते 15 टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक 28 दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच मेनोपॉजच्या वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधीदेखील अधिकतम असतो.

मासिक पाळीमधील रक्तस्त्राव 3 ते 7 दिवस चालतो व सरासरी 5 दिवस राहतो. ह्या काळाच्या2 दरम्यान सुमारे 0.5 ते 2.5 औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टँपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार 1 औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळीमध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणार्यार रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्यासशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही.

मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या क्रियेस (ओव्ह्यूलेशन) चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनास सज्ज केले जाते.

मासिक पाळीच्या आवर्तनातील टप्पे

ह्या चक्रामध्ये 3 टप्पे असतात:

  1. फॉलिक्युलर (अंडे बाहेर सोडले जाण्याआधी)
  2. ओव्ह्यूलेटरी (अंडे बाहेर सोडले जाणे)
  3. ल्युटिल (अंडे बाहेर सोडल्यानंतर)
फॉलिक्युलर टप्पा

हा टप्पा रक्त वाहण्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो (दिवस 1) परंतु ह्या टप्प्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकलची विकास होणे.
फॉलिक्युलर टप्प्याच्या सुरुवातीला गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असे द्रव भरून फुगते. अंड्याचे फलन न झाल्यास एस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ह्याचा परिणाम म्हणून एंडोमेट्रियमचे वरचे थर बाहेर टाकले जातात आणि मासिक पाळीचे रक्त वाहण्यास सुरूवात होते. साधारण ह्याच वेळी पिट्युटरी ग्रंथींमधून फॉलिकलला उत्तेजित करणार्याा संप्रेरकांची निर्मिती जरा जास्त प्रमाणात केली जाते. ह्या संप्रेरकामार्फत साधारणतः 3 ते 10 फॉलिकल्स तयार केली जातात. प्रत्येकात एक अंडे असते. ह्याच टप्प्यात, ह्या संप्रेरकाचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर, ह्यांपैकी एकाच डॉमिनंट फॉलिकलची वाढ होत राहते. कालांतराने ते स्वतःच एस्ट्रोजेन तयार करू लागते आणि इतर फॉलिकल्स नष्ट होतात.

फॉलिक्युलर टप्पा सुमारे 13-14 दिवसांचा असतो. तिन्ही टप्प्यांपैकी ह्या टप्प्याच्या कालावधीत सर्वाधिक बदल होत राहतात. मेनोपॉजच्या वेळी हा टप्पा ही कमी दिवसांचा असतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकाचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा संपतो व परिणामी अंडे बाहेर सोडले जाते (ओव्ह्यूलेशन).

ओव्ह्यूलेटरी टप्पा

ल्युटिनायझिंग संप्रेरकाचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळून अखेरीस ते बीजांडकोशाच्या भिंतीतून बाहेर येते व अंडे बाहेर सोडले जाते. ह्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणार्या संप्रेरकांचे प्रमाण मंदपणे वाढते. फॉलिकलला उत्तेजित करणार्या संप्रेरकांचे प्रमाण वाढण्यामागील कारण अजून नीटसे समजलेले नाही.
हा टप्पा साधारणतः 16 ते 32 तास चालतो व अंडे बाहेर सोडण्याच्या क्रियेने ह्याची सांगता होते.

अंडे बाहेर सोडले गेल्यानंतर 12 ते 24 तासांनी, ल्युटिनायझिंग हार्मोनमधील वाढ लघवी तपासल्यानंतर दिसून येते. हे प्रमाण मोजल्याने एखादी स्त्री फलनक्षम आहे अथवा नाही हे समजते. अंडे सोडल्यानंतर अधिकतम 12 तासांपर्यंत त्याचे फलन होऊ शकते. अंडे बाहेर सोडले जाण्याआधी पुनरुत्पादक नलिकेत (रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक) शुक्रजंतू हजर असल्यास फलनाची शक्यता जास्त असते.
ओव्यूयालेशनचे वेळी काही स्त्रियांना ओटीपोटाच्या खालच्या एका बाजूस वेदना जाणवते, तिला मधली वेदना (शब्दाश:, मिडल पेन) म्हणतात. ही वेदना काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकते. ज्या बीजांडकोशातून अंडे बाहेर आलेले असते त्याच बाजूस दुखते मात्र ह्या दुखण्याचे कारण माहीत नाही. फॉलिकल फाटण्याआधी किंवा नंतर हे दुखणे जाणवते परंतु सर्वच आवर्तनांमध्ये दुखते असे नाही. दोन्ही बीजांडकोशांमधून आळीपाळीने अंडे बाहेर येईल असे नाही, ह्यासंबंधी काही ही नियम नाही. एक बीजांडकोश काढून टाकला तर राहिलेल्या बीजांडकोशातून दर महिन्यास एक अंडे बाहेर सोडले जाते.

ल्युटिल टप्पा

ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे 14 दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन तयार केले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे केले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे सर्व्हिक्स (ग्रीवा) मधील म्युकस (श्लेष्मा) घट्ट होऊन गर्भाशयात वीर्य किंवा इतर जीवाणूंच्या प्रवेशाची शक्यता कमी होते. प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या टप्प्यादरम्यान शरीराचे एकंदर तापमानही किंचित वाढते व पुढील मासिक पाळी चालू होईपर्यंत ते तसेच वाढलेले राहते. ह्या वाढीव तापमानावरूनही ओव्ह्यूढलेशनची शक्यता आजमावता येते. ह्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. एंडोमेट्रियम जाड बनवण्यामध्ये इस्ट्रोजेनचाही वाटा असतो.

इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात.

अंड्याचे फलन न झाल्यास 14 दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते. अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात. ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate