অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोलर प्रेग्नन्सी

मोलर प्रेग्नन्सी म्हणजे काय?

मोलर प्रेग्नन्सी ही गर्भधारणेतील दुर्मिळ अशी गुंतागुंतीची परिस्थिती आहे. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत जेव्हा गर्भधारणेच्या वेळी काही गडबड होते आणि नाळेपासून तयार होणा-या पेशींत काही बिघाड होते तेव्हा मोलर प्रेग्नन्सी होते. मोलर प्रेग्नन्सीलाच हायडेटीफॉर्म मोल म्हणतात. ही प्रेग्नन्सी गेस्टॅटीशनल ट्रोफोब्लास्टिक ट्युमर्स नावाच्या परिस्थितीसमूहाचा एक भाग आहे. या गाठी कर्करोगाच्या नसतात किंवा त्यापासून कर्करोग होत नाही. शिवाय जरी त्या गर्भाशयाच्यापलिकडे पसरल्या तरीही ब-या होतात.

सामान्य गर्भधारणेमध्ये, फलित अंड्यामध्ये आईची २३ आणि वडिलांची २३ जनुके असतात. पूर्णतः मोलर प्रेग्नन्सीमध्ये, फलित अंड्यामध्ये आईची जनुके अजिबात नसतात आणि वडिलांच्या शुक्राणूतील जनुकांचीच पुनरावृत्ती झालेली असते. म्हणजेच यात वडिलांच्या जनुकांच्या दोन प्रती असतात आणि आईकडील एकही जनुक नसते. अशा गर्भधारणेत भ्रूण नसतो, ऍमिनीओटिक सॅक नसते किंवा नाळेची कोणतीही सर्वसाधारण त-हेची ऊती नसते. याऐवजी नाळ गाठींचा एक समूह तयार करते जो द्राक्षांच्या घोसाप्रमाणे दिसतो. या गाठी अल्ट्रासाऊंड स्कॅनमधून पाहता येतात.

अंशतः मोलर प्रेग्नन्सीमध्ये, फलित अंड्यामध्ये आईची जनुके असतात मात्र वडिलांच्या जनुकांचे दोन संच तयार होतात आणि नेहमीच्या ४६ जनुकांऐवजी एकूण ६९ जनुके तयार होतात. (शुक्राणूंमधील जनुकांची पुनरावृत्ती झाल्यास किंवा दोन शुक्राणूंनी एकाच अंड्यास फलित केल्यास ही परिस्थिती उदभवू शकते.) अशावेळी विकृत ऊतींच्या समुहामध्ये नाळेच्या काही ऊतीदेखील असतात. त्यातील गर्भ वाढू लागलेला असतो त्यामुळे भ्रूण किंवा भ्रूणऊती वगैरे असू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरी या गर्भधारणेत भ्रूण असला तरी तो जनुकीयदृष्ट्या विकृत असतो आणि त्याचे मुलामध्ये रुपांतर होऊ शकत नाही.

गर्भधारणेचा शेवट अशा पद्धतीने होणे हे फारच धक्कादायक असू शकते. परंतु त्यावर शक्यतितके योग्य उपचार करा आणि काळजीपूर्वक पाठपुरावा केल्यास दीर्घकालीन शारीरिक परिणामांची शक्यताही फारच कमी असते.

मोलर प्रेग्नन्सीचे प्रमाण?

  • आशियाई महिलांमध्ये मोलर प्रेग्नन्सीचे प्रमाण जास्त आहे.
  • बी रक्तगट असणा-या महिलांमध्ये मोलर प्रेग्नन्सीची शक्यता अधिक असते.
  • भारतीय/ पाकिस्तानी महिलांमध्ये दुसरी मोलर प्रेग्नन्सी होंण्याचे प्रमाण वाढत आहे.

माझी प्रेग्नन्सी मोलर प्रेग्नन्सी आहे की नाही हे कसे ओळखायचे?

  • सुरुवातीला तुम्हाला गर्भधारणेची नेहमीचीच लक्षणे जाणवतील पण एका क्षणी रक्तस्त्राव होण्यास सुरूवात होईल. (गर्भधारणेमध्ये रक्तस्त्राव होणे हे नेहमीच गंभीर लक्षण नसते आणि फारच दुर्मिळ घटनांमध्ये मोलर प्रेग्नन्सीचे चिन्ह असते. त्यामुळे याविषयी डॉक्टरांशी संपर्क साधणे अतिउत्तम). रक्तस्त्राव लाल किंवा गडद तपकिरी, सतत किंवा अधूनमधून, कमी किंवा जास्त असू शकतो. रक्तस्त्राव गर्भधारणेपासून लवकरात लवकर ६ आठवड्यांनी किंवा उशीरात उशीरा १६ आठवड्यांनी सुरू होऊ शकतो.
  • तुम्हाला प्रचंड अस्वस्थता आणि मळमळदेखील (हायपरइमेसिस) जाणवू शकते तसेच ओटीपोटदेखील सुजू शकते (गर्भाशय नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाढू शकते). गरोदरपणाचा संप्रेरक ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रोफिन (एचसीजी) याच्या पातळीत सामन्यपेक्षा खूप जास्त वाढ होऊ शकते.
  • पूर्णतः मोलर प्रेग्नन्सी साधारणतः अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये दिसून येते आणि रक्ताची चाचणी करून एचसीजीचा स्तर मोजून तिचे निदानही करता येते. मात्र अंशतः मोलर प्रेग्नन्सीचे निदान करणे काहीवेळा जास्तच कठीण होऊ शकते.
  • जर मोलर प्रेग्नन्सीचे निदान होण्यापूर्वीच तुमचा गर्भपात झाला तर पॅथोलॉजिस्ट त्या गर्भाच्या ऊतींचे परीक्षण करून ती मोलर प्रेग्नन्सी होती अथवा नाही हे ठरवील.

मोलर प्रेग्नन्सीवर उपचार काय?

  • मोलर प्रेग्नन्सीचे निदान झाल्यास विकृत ऊती काढून टाकण्यासाठी डी ऍण्ड सी (डायलेशन ऍण्ड क्युरेटेज) नावाची छोटीशी शस्त्रक्रिया केली जाते किंवा ऊती शस्त्रक्रियेशिवाय गर्भपाताद्वारे काढून टाकण्यासाठी (मेडिकल मॅनेजमेंट) औषध दिले जाते. मात्र विकृत उती पूर्णपणे काढून टाकण्यासाठी क्वचित दुसऱयांदा डी ऍण्ड सी शस्त्रक्रिया करावी लागते.
  • डॉक्टर पाठपुराव्यासाठी आणखी काही चाचण्या करण्यास सांगतील आणि शस्त्रक्रियेनंतर एचसीजीची पातळी तपासण्यासाठी लघवी आणि रक्ताचे नमुने देण्यास सांगतील. जेव्हा शरीरातील सर्व विकृत ऊती नष्ट होतील तेव्हा एचसीजीची पातळी शून्य असेल

मोलर प्रेग्नन्सीचे दीर्घकालीन परिणाम कोणते?

  • निदान झाल्यानंतर किमान सहा महिने मोलर प्रेग्नन्सीवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. हा कालावधी विशिष्ट परिस्थितींवर अवलंबून असतो. कारण मोलर प्रेग्नन्सीचा छोटासा अंशदेखील लगेच वाढू तसेच पसरू शकतो आणि हे ब-याचदा उपचारांनंतर कित्येक महिन्यांनी होऊ शकते. जर एचसीजीची पातळी वाढू लागली किंवा उच्च राहिली तर याचे निदान होईल.
  • डी ऍण्ड सी च्या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी एखादा इन्व्हेसिव्ह मोल (आक्रमक मांस) तयार होऊ शकतो. इन्व्हेसिव्ह मोलर प्रेग्नन्सी म्हणजे मोलर टिश्यूंचा (ऊती) गर्भाशयावर मांसल थर तयार होणे. याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अनियमित किंवा सातत्याने होणारा रक्तस्त्राव.
  • इन्व्हेसिव्ह मोल त्रासदायक ठरू शकतात कारण एकदा त्यांचा गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये प्रवेश झाला की ते रक्तावाटे फुफ्फुस, यकृत आणि मेंदू अशा दूरवरच्या अवयवांमध्येही पसरू शकतो.
  • अंशतः मोलर प्रेग्नन्सीनंतर इन्व्हेसिव्ह मोलर प्रेग्नन्सी होण्याची शक्यता असते. मात्र ही शक्यता पूर्णतः मोलर प्रेग्नन्सी झाल्यावर अधिक असते.
  • काही वेळा ऊती काढल्यानंतर तिच्या काही पेशी शरीरात शिल्लक राहतात. याला पर्सिस्टण्ट जेस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीज म्हणतात. पूर्ण मोल असणा-या स्त्रियांपैकी केवळ १५ % स्त्रियांमध्ये आणि अंशतः मोल असणा-या स्त्रियांपैकी १% हूनही कमी स्त्रियांमध्येच हे घडते. जर असे घडले तर आजार गर्भाशयाच्याव्यतिरिक्त इतरत्र पसरू नये यासाठी औषधे (केमोथेरपी) घ्यावी लागतात. एचसीजी पातळी सामन्य स्तरावर येइपर्यंत हे उपचार चालू राहतात.

आजार पूर्णपणे बरा करणे शक्य आहे का?

  • योग्य आणि त्वरित उपचाराद्वारे हा आजार १००% बरा करता येतो (गर्भाशयाच्यापलिकडे पसरला नसल्यास). जिथे विकृत पेशी इतर अवयवांपर्यंत पसरलेल्या असतात अशा काही अत्यंत दुर्मिळ परिस्थितींतही हा आजार पूर्णपणे बरा करता येतो. उपचार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर वेळोवेळी एचसीजी पातळीवर देखरेख ठेवावी लागते.
  • काही अत्यंत दुर्मिळ घटनांमध्ये पूर्ण मोलर प्रेग्नन्सीचे रुपांतर कोरिओकार्सिनोमा या अतिशय दुर्मिळ परंतु ब-या होऊ शकणा-या कर्करोगात होते. यामध्ये नाळेत कर्करोगाच्या गाठी तयार होतात. ही घटना ३० हजार गरोदरपणांपैकी १ मध्ये घडते. हा कर्करोग मोलर प्रेग्नन्सीमुळे, सामान्य गरोदरपणामुळे किंवा गर्भपातामुळे होऊ शकतो.

परत गरोदर कधी व्हावे?

  • जर केमोथेरपी नसेल तर एचसीजी स्तर शून्य झाल्यानंतर ६ महिने थांबावे आणि मगच गरोदर राहण्याचा प्रयत्न करावा.
  • जर केमोथेरपी घेतली असेल तर दुस-या गर्भारपणासाठी किमान १२ महिने थांबण्याचा सल्ला दिला जातो. जर या काळाच्या आधीच गरोदर राहिल्यास एचसीजी स्तर वाढतो आणि विकृत ऊती परत वाढत आहेत की नाही हे सांगणे डॉक्टरांना कठीण जाते.
  • दुस-या गरोदरपणाच्यावेळीही मोलर प्रेग्नन्सी होण्याची शक्यता १-२ % असते. दुस-या वेळी आणि पुढील प्रत्येक वेळी गरोदर राहिल्यानंतर पहिल्या तिमाहीत अल्ट्रासाऊंड करून सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी.
  • खुशखबर अशी आहे की मोलर प्रेग्नन्सीमुळे किंवा अगदी केमोथेरपी घेतल्यामुळेदेखील स्त्रीच्या सामान्य गर्भधारणा करण्याच्या क्षमतेवर काहीच परिणाम होत नाही. यामुळे मृत अर्भक जन्माला येणे, अर्भकात जन्मजात दोष असणे, वेळेआधीच कळा सुरू होणे किंवा इतर गुंतागुंतीचा धोकादेखील वाढत नाही.

या घटनांमध्ये समुपदेशन

  • पुन्हा गरोदर राहण्यापूर्वी किमान ६ महिने तरी नियमित पाठपुरावा करणे आवश्यक असते. जर तुमचा आजार पुन्हापुन्हा उफाळून येत असेल तर केमोथेरपीचे उपचार थकवून टाकणारे असतात आणि त्यामुळे तुमचे पुढील गर्भारपण लांबणीवर पडू शकते.
  • पतीशी बोलत रहा आणि बोलून दुःख हलके करण्याचा प्रयत्न करा. जर त्यांच्यापैकी कोणालाही आपल्या भावना आवरणे कठीण जात असेल तर तुमच्या डॉक्टरांशी, घरच्यांशी, मित्रांशी किंवा एखाद्या प्रमाणित समुपदेशकाशी बोला.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate