অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वंध्यत्व

वंध्यत्व

एखादे दांपत्य अपत्यहीन असण्याची दोन कारणे संभवतात: (१) गर्भधारणा न होणे व (२) वारंवार गर्भपात (किंवा मुदतपूर्व प्रसूती) होणे. यांपैकी वारंवार गर्भपात होण्याची कारणे व त्यांवरील उपचार मूलतः भिन्न आहेत [⟶गर्भपात]. गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात. कमी-अधिक प्रमाणानुसार व कारणीभूत गोष्टी उपचारांनी बऱ्या होण्याच्या शक्यतेनुसार त्याचे परिपूर्ण वंध्यत्व (अजननक्षमता), गर्भधारणा होण्याची पूर्ण अशक्यता आणि न्यून जननक्षमता असे विभाजन करता येईल कधीही गर्भधारणा न होण्याच्या (प्राथमिक वंधत्वाच्या) कारणांपेक्षा एखाद्या वेळी गर्भधारणा होऊन नंतर वंधत्वाची तक्रार सुरू होण्याची (द्वितीयक वंधत्वाची) काही मुख्य कारणे भिन्न असतात.

योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांपैकी सु. ८ ते १०% जोडप्यांत वंध्यत्व ही तक्रार आढळते आणि इतर १० ते १२% जोडप्यांना इच्छा असूनही एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत. सर्वसाधरण सुधारलेले आरोग्य आणि श्रोणिशोथ (स्त्री जननमार्गाची दाहयुक्त सूज), क्षयरोग व इतर वंधत्वाला कारणीभूत होऊ शकणाऱ्या आजारांवर योग्य उपचारांची उपलब्धता यांमुळे (वंधत्वाचे) हे प्रमाण सर्वसाधारणपणे कमी होत असण्याची शक्यता आहे; परंतु भारतात श्रोणिशोथ व जननेंद्रियाचा क्षयरोग ही अजूनही वंधत्वाची प्रमुख कारणे आहेत.

पतीच्या वंधत्वामुळे (अथवा पतीचा मृत्यू, असाध्य आजार इ. कारणांमुळे) एखादी स्त्री निपुत्रिक असेल, तर केवळ पुत्रप्राप्तीसाठी आपद्धर्म म्हणून अन्य पुरुषाशी विधिपूर्वक समागम करण्याची ‘नियोग’ ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे [⟶ नियोग]

कारणे

सर्वसाधारणपणे वंधत्वाचे प्रमुख कारण पुरूषांपेक्षा स्त्रियांत अधिक वेळा सापडत असले, तरी अशा जोडप्यांपैकी ४०% जोडप्यांत पुरुषाची जननक्षमता कमी असल्याचे आढळते. १०% जोडप्यांत वंधत्वाचे प्रमुख कारण पुरुषात सापडते व अंदाजे १% पुरुष वंध्य असतात. काळजीपूर्वक शोध घेतल्यास वंधत्वाचे कारण सापडू शकते; परंतु बहुतेक वेळा एका जोडप्यातील दोन्ही जोडीदारांत अनेक मोठी कारणे एकत्र आढळत असल्याने गुंतागुंत वाढते आणि कारणांचा शोध घेणे व उपचार करणे अवघड होते.

पुरुषांतील कारणे

(अ) गर्भधारणा करण्यास योग्य शुक्राणूंचे पुरेशा प्रमाणात उत्पादन करू न शकणे. वीर्यात शुक्राणूंचा पूर्ण अभाव असल्यास त्यास अशुक्राणुता व शुक्राणूचे प्रमाण कमी असल्यास त्यास अल्पशुक्राणुता असे म्हणतात. अनेक वेळा याची कारणे पूर्णपणे कळू शकत नाहीत; परंतु सिद्ध झालेली व सुचविली गेलेली कारणे पुढीलप्रमाणे असतात. लिंगगुणसूत्रांतील (लिंग निर्धारित करणाऱ्या व आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सूतासारख्या सूक्ष्म घटकांतील) किंवा इतर दोषांमुळे वृषणाची (पु-जनन ग्रंथीची) वाढ न होणे व शुक्राणूंचे उत्पादन न होणे; गुप्तवृषणता (एक वा दोन्ही वृषणे प्राकृत-सर्वसाधारण-रीतीने त्यांच्या मुष्कात म्हणजे बाह्य पिशवीत न उतरणे); गालगुंड व इतर तीव्र व्हायरसजन्य रोगांमुळे होणारा वृषणशोथ; अपघात, शस्त्रक्रिया किंवा क्ष-किरण प्रारणामुळे (तरंगरूपी ऊर्जेमुळे) वृषणाला किंवा त्याच्या रक्तपुरवठ्याला धक्का पोहोचणे; भट्टीजवळील काम, गरम पाण्याने वारंवार स्नान, घट्ट व कृत्रिम तंतूंची अंतर्वस्त्रे (आतील कपडे), वृषण नीला अपस्फीती (अपसामान्य सूज) इ. कारणांमुळे वृषणाचे तापमान जास्त राहणे; अर्बुदे (कोशिकांच्या-पेशींच्या-अत्यधिक वाढीमुळे मिर्माण होणाऱ्या गाठी), क्षय, ⇨उपदंश इ. वृषणाचे रोग; ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथीचे (मुख्यतः अधोथॅलॅमस व पोप ग्रंथीचे) रोग, सर्वसाधारण अनारोग्य, आहारातील मोठ्या प्रमाणातील कमतरता (उपासमार, ब१२ व फॉलिक अम्ल या जीवनसत्त्वांची कमतरता), औषधे व विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम इत्यादींमुळे वृषणाचे कार्य मंदावणे; वाढते वय आणि वृषण व शुक्राणू यांच्या विरूद्धची स्वयं-प्रतिपिंडे (शरीरात निर्माण होणारी प्रतिकारक प्रथिने) इत्यादी. (आ) अपघात, शस्त्रक्रिया, शोथ [मुख्यताः परमा; ⟶परमा] आणि जन्मजात अभाव किंवा कमी वाढ यांमुळे पुरुष जननमार्गात (अधिवृषण, रेतवाहिनी, स्खलनवाहिनी इ.) दोन्ही बाजूंना अडथळा असणे. (इ) खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणातील वीर्यद्रव, जास्त श्यानता (दाटपणा), कमी प्रमाणात फ्रुक्टोज, जास्त प्रमाणात ⇨ अष्ठीला ग्रंथीचा स्त्राव (प्रोस्टाग्लँडीन) इ. वीर्यद्रवातील दोष आणि (ई) शिश्नोत्थान असमर्थता, शिश्नाच्या रचनात्मक विकृती (निरूद्धमणी, अधश्छिद्रता इ.), अकाल वीर्यस्खलन, पश्व वीर्यस्खलन, कष्ट समागम व अज्ञानामुळे प्राकृत समागम होऊ न शकल्याने योनिमार्गात शुक्राणू सोडण्याची असमर्थता [⟶लैंगिक वैगुण्ये] ही पुरुषांत आढळणारी वंध्यत्वाची कारणे आहेत.

स्त्रियांतील कारणे

(अ) वारंवार व गर्भधारणेस योग्य अंड (स्त्रीबीज) तयार करण्याची असमर्थता. या गोष्टीबरोबरच सहसा मासिक पाळी न येणे (अनार्तव) किंवा दीर्घ कालानंतर, अनियामित व थोड्या प्रमाणात येणे (आर्तवन्यूनता) या तक्रारी आढळतात व त्यांची कारणे एकच असतात [⟶ऋतुस्त्राव व ऋतुविकार]. मासिक पाळी नियमित असताना सहसा अंड तयार होत असते. क्वचित होत नसल्यास त्याचे कारण नेहमीच्या परीक्षांनी निदान न होणारी ⇨ अविवृक्क ग्रंथीची निष्फलता किंवा ब१२ जीवनसत्त्वाची कमतरता हे असू शकते. (आ) श्रोणि-पर्युदरशोथ (गर्भाशय व अंडवाहिनी यांच्या भोवती असलेल्या उदरगुहेतील अस्तरासारख्या पटलाचा शोथ), आंत्रपुच्छशोथ (अँपेंडिसायटीस) किंवा गर्भपात वा प्रसूतीनंतर होणाऱ्या संसर्गामुळे श्रोणिसोथ होऊन परिणामी तयार होणाऱ्या बंधांमुळे अंड अंडाशयाकडून अंडवाहिनीत जाण्यास अडथळा येणे. (इ) परमा, गर्भपात व प्रसूतीनंतरच्या संसर्ग किंवा क्षयरोगजन्य अंडवाहिनीशेथय; अंडवाहिन्यांचे जन्मजात दोष (हे गर्भाशय विकृतींबरोबरच आढळतात) व गर्भाशय-अंडवाहिनी संधि-संकोच (हे सैद्धांतिक कारण) यांमुळे दोन्ही अंडवाहिन्या पूर्ण किंवा अर्धवट बंद असणे किंवा अकार्यक्षम असणे हे वंध्य असलेल्यांपैकी १०% जोडप्यांतील प्रमुख कारण असते. (ई) गर्भाशय नसणे, अपुरी वाढ व गर्भाशयाच्या मोठ्या विकृती व क्षयरोगजन्य गर्भाशयांतःस्तरशोथामुळे शुक्राणूंना अडथळा किंवा गर्भधारणा झालेले अंड स्वीकारून वाढविण्याची गर्भाशयाची असमर्थता. (उ) गर्भाशय-ग्रीवेचे (गर्भाशयाच्या मानेसारख्या भागाचे) रोग (उदा., दीर्घकालिक गर्भाशय ग्रीवाशोथ व क्षरण), प्रसूती, गर्भाशय-ग्रीवेवरील शस्त्रक्रिया (उदा., गर्भाशय-ग्रीवांगच्छेदन), गर्भाशय भ्रंश (नेहमीच्या स्थानापसून ढळलेले गर्भाशय), पश्चवक्री (नेहमीच्या अक्षाच्या मागील बाजूस झुकलेले) गर्भाशय व गर्भाशयातील इतर दोष आणि मांसवृद्धी (सुजलेल्या व अतिवृद्धी झालेल्या पटलाचा पुढे आलेला भाग) व अर्बुदे यांमुळे गर्भाशय-ग्रीवामार्ग चिंचोळा व वेडावाकडा होणे, त्याच्या रचनेत बदल होणे व त्यातील श्लेष्मलाच्या (बुळबुळीत द्रव्याच्या) गुणधर्मांत शुक्राणूंना पार करण्यास अवघड होण्यासारखे फरक पडणे यांमुळे शक्राणूंना गर्भाशय-ग्रीवेचा होणारा विरोध. (ऊ) योनिमार्गातील अर्बुदे, पापुद्रे, पडदे व बंध आणि जन्मजात दोषांमुळे समागमाला व शुक्राणू गर्भाशय-ग्रीवेपर्यंत पोहोचण्याला होणारा अडथळा. (ए) एरवी कारण समजू न शकणाऱ्या वंध्यत्वामध्ये शुक्राणूंना (किंवा अंडाला) शारीरिक विरोध हे कारण देण्यात येते. शुक्राणु किंवा अंड यांच्या विरूद्ध असणारे स्थानिक किंवा रक्तातील प्रतिपिंड हे त्यामागील कारण समजण्यात येते. (ऐ) तपासणीस आलेल्या जोडण्यांपैकी ३ ते ५% स्त्रियांत श्रोणीतील अर्बुदे (विशेषतः गर्भाशयातील स्नायु-अर्बुदे) व ५% स्त्रियांत गर्भाशयांतःस्तरीभवन (सामान्यतः अंतःस्तर जेथे नसतो तेथे कार्यकारी गर्भाशयांतःस्तर ऊतक म्हणजे कोशिका समूह आढळणे) हे वंध्यत्वाचे कारण असते.

समागमातील दोष

[⟶ लैंगिक वैगुण्ये]. यांतील काहींचा उल्लेख पुरुषांतील कारणे व स्त्रियांतील कारणे यांत वर आलाच आहे. त्याशिवाय समागमाच्या वेळी वंगण म्हणून वापरण्यात येणारे काही पदार्थ त्यांच्या अम्लतेमुळे किंवा तेलकटपणामूळे किंवा त्यातील रासायनिक द्रव्यांमूळे शुक्राणूमारक किंवा शुक्राणुस्थापक (शुक्राणूंची हालचाल थांबविणारे) असतात. त्याचप्रमाणे समागमाची कमी वारंवारता आणि समागम व अंडनिर्मितीचा काल यांची सांगड न जमणे या गोष्टीही वंध्यात्वाला कारण होऊ शकतात.

इतर कारणे

काही घराण्यांत जननक्षमता कमी किंवा जास्त आढळते; तसेच थोराड अंगकाठी, लठ्ठपणा, जास्त लव आणि कमी जननक्षमता असे एकत्रितपणे काही घराण्यांत आढळते. त्यामागे आनुवंशिक कारणे असू शकतात. खेड्यांत, अंगमेहनतीची कामे करणाऱ्यांत आणि खालच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक थरातील लोकांत जननक्षमता जास्त आढळत असली, तरी त्यामागे सरळ संबंध नसून अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत. मोठ्या प्रमाणात कमतरता असलेला व असंतुलित आहार सोडल्यास आहाराचा जननक्षमतेवर परिणाम होत नाही. गर्भनिरोधक साधनांमुळे सर्वसाधारणपणे एकूण जननक्षमता कमी होत नाही. तसेच मानसिक अस्वास्थ्य, स्त्रीस संतृप्ती न येणे व समागमानंतर वीर्य योनिमार्गातून काही प्रमाणात बाहेर पडणे ही वंध्यत्वाची कारणे असू शकत नाहीत.

वंध्यत्व तपासण्या व निदान

वंध्यत्वासाठी तपासण्या कधी सुरू कराव्यात या बाबतीत एकमत नाही. काहींच्या मते जोडप्याने वैद्यकीय सल्ला विचारताच तपासण्या सुरू कराव्यात, तर काहींच्या मते लग्नांतर तीन वर्षे (अंदाजाने निवडलेला कालावधी) मूल न झाल्यासच त्याला वंधत्व समजून तपासण्या सुरू कराव्यात. याबाबत निश्चित नियम नसून प्रत्येक जोडप्याच्या तक्रारीचे स्वरूप व तपासण्या करण्याची निकड लक्षात घेऊन तपासण्या सुरू केल्या जातात.

गर्भनिरोधक साधने न वापरता प्राकत व पुरेसा वारंवार समागम करणाऱ्या चांगल्या जननक्षम जोडप्यांतील बहुतेक स्त्रियांना ६ ते ७ महिन्यांपर्यंत गर्भधारमा होते व एक वर्षाच्या आत अशा अंदाजे ८०% स्त्रियांना गर्भधारणा होते. त्या दृष्टीने दृष्टीने लग्नानंतर साधारण २ वर्षे इच्छा असूनही गर्भधारणा न झालेल्या जोडप्यांची पूर्ण तपासणी सुरू करण्यास हरकत नाही. वाढते वय (उशीरा झालेले लग्न, दुसरे लग्न इ.) व तत्सम इतर कारणे असल्यास त्याआधीही तपासण्या सुरु करणे आवश्यक असते. एरवी जोडप्याची शारीरिक तपासणी करून ढोबळ दोष न आढळल्यास काही वाट बघणे शक्य असते. या तपासण्या विशिष्ट कारणे असल्याशिवाय लग्नाआधी केल्या जात नाहीत (कारण जननक्षमता विशिष्ट जोडप्याच्या संदर्भात असल्याने एकट्या व्यक्तीच्या संदर्भात ती अजमावणे म्हणजे तिचे मूल्यांकन करणे कठीण असते). तसेच गर्भधारणा अनुचित ठरविण्याइतक्या मोठ्या रोगाने [उदा., हृदय विकार, उच्च रक्तदाब, वृक्कशोथ (मूत्रपिंडाचा शोथ), काही सांसर्गिक रोग इ.] स्त्री ग्रस्त नाही याची तपासण्या सुरू करण्याआधी करून घेणे इष्ट असते.

जोडप्यातील दोघांचीही संपूर्ण वैद्यकीय तपासणी

दोघांनाही खाजगीत विचारलेल्या वैद्यकीय इतिहासात प्रामुख्याने एकत्र असण्याचा वा नसण्याचा कालावधी, समागम प्राकृत, वेदनारहित व पुरेसा वारंवार होतो का आणि ऋतुचक्राच्या कोणत्या कालावधीत होतो, स्त्रीचे ऋतुचक्र, जननेंद्रियांचे पूर्वीचे व सध्याचे रोग, इतर मोठे रोग, शस्त्रक्रिया व अपघात, कुटुंबातील आनुवंशिक किंवा क्षयासारखे सांसर्गिक रोग इ. गोष्टींची माहिती मिळविली जाते. शारीरिक तपासणीत इतर तंत्रांच्या (संस्थांच्या) सर्व तपासण्यांबरोबरच जननेंद्रियांच्या तपासणीवर मुख्य भर दिला जातो. खाली दिलेल्या पुरुषांच्या जननक्षमतेच्या तपासण्यांव्यतिरिक्त सर्वसाधारण रक्त तपासणी व जरूरीप्रमाणे इतर रक्त तपासण्या, मूत्र तपासणी, रक्तगट, उपदंशासाठी रक्त तपासणी, जरूरीप्रमाणे छातीचे क्ष-किरण छायाचित्र वगैरे तपासण्या वगैरे तपासण्या दोघांच्याही बाबतीत केल्या जातात.

पुरुषाच्या जननक्षमतेचे मूल्यमापन

पितृत्व हा जननक्षमतेचा पुरावा आहे. त्यामुळे वय व नंतर उद्भवलेल्या रोगांचा परिणाम सोडल्यास गर्भधारणेला कारणीभूत झालेला पुरूष पुरेसा जननक्षम समजण्यास हरकत नाही; परंतु अशा पुरुषांतही वीर्य तपासणीवरून कमी जननक्षमतेचे पुरुष आढळतात. तसेच वीर्य-तपासणी सोपी, बिनत्रासाची, कमी खर्चाची व वारंवार करता येण्यासारखी असते म्हणून वंधत्वाच्या सर्व जोडप्यांमध्ये प्रथम या तपाससणीवरून पुरुषाच्या जननक्षमतेचा अंदाज आल्याशिवाय स्त्रियांच्या तुलनेने अवघड, जास्त खर्चाच्या, बहुधा शस्त्रक्रियेची व भूल देण्याची आवश्यकता असलेल्या आणि म्हणून तुलनेने जास्त धोक्याच्या असलेल्या तपासण्या केल्या जात नाहीत.

वीर्य-तपासणी: कमीत कमी दोन दिवस समागम टाळल्यानंतर हस्तमैथुनाच्या साहाय्याने (किंवा खंडित समागमानंतर) स्वच्छ व कोरड्या काचपात्रात वीर्य मिळविले जाते आणि वातावरणीय तापमानात थोडा वेळ (अंदाजे अर्धा तासपर्यंत) ठेवून ते पातळ झाल्यावर लगेच, १ तासानंतर व २ तासानंतर असे तीनदा ते तपासले जाते. वीर्याच्या गुणधर्मांत व शुक्राणू संख्येत मोठ्या प्रमाणात आणि वारंवार बदल घडत असल्याने एका तपासणीचा निकाल कमी जननक्षमतादर्शक आल्यास तपासणी कमीत कमी दोन वेगवेगळ्या वेळी केली जाते. या तपासणीत एका वेळी मिळालेल्या एकूण वीर्याचे घनफळ प्रमाण, शुक्राणू संख्या, शुक्राणूंची हालचाल, त्यांची रचना व एकूण शुक्राणूंत पूर्ण वाढीच्या व प्राकृत रचनेच्या शुक्राणूंचे प्रमाण या गोष्टी पाहिल्या जातात. तसेच वीर्यातील फ्रुक्टोजाचे प्रमाण, वीर्याची श्यानता व पू कोशिकांचे शोथ-प्रक्रियानिदर्शक अस्तित्व याही गोष्टी पाहिल्या जातात. या सर्वांत शुक्राणू घनता (एक मिली. वीर्यातील शुक्राणूंची संख्या) जास्त महत्त्वाची ठरते (ती सहा ते दहा कोटींपर्यंत असल्यास चांगली समजली जाते; परंतु एक कोटी इतकी कमी असलेलीही पुरेशी ठरू शकते. त्यातील प्राकृत रचनेच्या व चांगली हालचाल असलेल्या शुक्राणूंचे प्रमाण ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत असणे पुरेसे समजले जाते). वीर्य-तपासणीच्या निकालाचा अन्वयार्थ सावधतेने लावावा लागतो व सर्वसाधारण ढोबळ मानानेच जोडप्यास सांगितला जातो.

वृषण जीवोतक परीक्षा : जीवोतक परीक्षा म्हणजे जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाने केलेली तपासणी). वारंवार केलेल्या वीर्य-तपासणीत शुक्राणू न आढळल्यास (किंवा अत्यल्प प्रमाणात आढळल्यास) ही तपासणी केली जाते. त्यावरून वीर्यातील शुक्राणूंच्या अभावाचे कारण समजण्यास मदत होते वृषणात शुक्राणू उत्पादन न आढळल्यास त्याचे कारण शुक्राणू उत्पादक नलिका प्राकृत असूनही (अंतःस्त्रावी ग्रंथींच्या व इतर दोषांमुळे) अनुत्तेजित आहेत का त्याच (वाढ न झाल्याने किंवा रोगग्रस्त असल्याने) अकार्यक्षम आहेत हे ठरविता येते. तसेच वृषणातील शुक्राणू उत्पादन प्राकृत आढळल्यास पुढील जननमार्गातील वाहिन्यांत अडथळा असल्याचे निदान करता येते.

इतर तपासण्या: वृषण जीवोतक परीक्षेत शुक्राणू उत्पादनाचा अभाव आढळल्यास गुणसूत्राचा अभ्यास, कवटीची क्ष-किरण प्रतिमा (पोष ग्रंथीचे स्थान असलेल्या खोगीरासारख्या खोलगट भागाची रचना पाहाण्यासाठी), लिंग हॉर्मोनांचे (उत्तेजक स्त्रावांचे) व इतर हॉर्मोनांचे रक्तातील प्रमाण पाहाणाऱ्या तपासण्या इ. तपासण्या केल्या जातात आणि त्या मुख्यतः त्या पुरुषाच्या वंध्यत्वापेक्षाही त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी केल्या जातात.

स्त्रीच्या जननक्षमतेचे मूल्यमापन:अंडवाहिन्यांचा खुलेपणा ठरविणाऱ्या तपासण्या: गर्भधारणा झालेल्या अंडास धक्का पोहोचू नये व अंतर्कीलनाची (रक्ताची गुठळी किंवा इतर बाह्य पदार्थ रोहिणीत वा नीलेत अकस्मात अडवून तेथील रक्तप्रवाह बंद पडण्याची) शक्यता उद्भवू नये यासाठी या प्रकारच्या तपासण्या मासिक पाळीच्या ७ ते १० दिवसांदरम्यान व गर्भाशयातून कोणताही रक्तस्त्राव होत नसताना केल्या जातात.

हवा भरणे : १९२० साली आय्. सी. रूबिन या अमेरिकन स्त्रीरोगवैज्ञानिकांनी या तपासणीचे प्रथम वर्णन केल्याने तिला रूबिन तपासणी असेही म्हणतात. या तपासणीत विशिष्ट साधनांच्या व उपकरणांच्या साहाय्याने गर्भाशय ग्रीवेतून गर्भाशयात हवा किंवा कार्बन-डाय-ऑक्साइड वायू भरला जातो. किमान एक किंवा दोन्ही अंडवाहिन्या मोकळ्या असल्यास ही हवा त्यांच्या दुसऱ्या तोंडातून उदरगुहेत शिरते. उपकरणातील हवेच्या दाबातील बदल, या दाबाचा आलेख, स्टेथॉस्कोपच्या साहाय्याने पोटावर श्रवण केल्यास हवा उदरगुहेत शिरताना येणारे बुडबुड्यांसारखे आवाज, मध्यपटलाचा (छाती व उदरगुहा यांचे विभाजन करणाऱ्या स्नायुमय पटलाचा) क्षोभ झाल्यामुळे जाणवणारी खांदेदुखी व मध्यपटलाखाली हवा वा वायू दर्शविणारी क्ष-किरण तपासणी यांवरून किमान एक अंडवाहिनी मोकळी असल्याचे निदान करता येते. ही तपासणी बाह्य रुग्ण विभागात व भूल दिल्याशिवाय करता येण्यासारखी असली, तरी शक्यतो भूल देऊन व संपूर्ण जंतुविरहित परिस्थितीत केली जाते; परंतु खुलेपणा दोन्ही अंडवाहिन्यांच्या बाबतीत असल्याचे ठरविणारी ही खात्रीशीर तपासणी नसल्याने गर्भाशय-अंडवाहिनी संधि-संकोचाचे निदान करता येऊ शकत नसल्याने, खोट्या नकारात्मक निकालांचे प्रमाण खूप असल्याने, अंडवाहिन्यांचा निरोगीपणा ठरविता येत नसल्याने व अंतर्कीलनासारख्या व इतर धोक्यांमुळे सध्या ही तपासणी सहसा केली जात नाही

गर्भाशय-अंडवाहिनी-दर्शन : या तपासणीत गर्भाशय-ग्रीवेतून गर्भाशयात क्षोभविरहित व क्ष-किरण अपारदर्शक द्रव भरून क्ष-किरण प्रतिमा मिळविल्या जातात (नवीन पद्धतीत प्रतिमा तीव्रता-वर्धक उपकरणाच्या साहाय्याने अनुस्फुरक–म्हणजे ज्यावर क्ष-किरण पडले असता दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन होते अशा–पडद्यावर क्ष-किरण अपारदर्शक द्रवाच्या गर्भाशयातून व अंडवाहिन्यांतून होणाऱ्या प्रवासाचे निरीक्षण करत हव्या त्या क्षणांची क्ष-किरण छायाचित्रे घेतली जातात). या तपासणीवरून गर्भाशयाच्या व अंडवाहिन्यांच्या पोकळीची छायाचित्रे मिळतात. त्यांवरून या अवयवांच्या अवस्था, अंतर्गत आकार, अंडवाहिन्यांचा खुलेपणा व बंद असल्यास अडथळ्याचे स्थान यांचे स्पष्ट निदान होते. तसेच रोगग्रस्त व अकार्यक्षम अंडवाहिन्या, अंडवाहिन्यांभोवतीचे बंध, गर्भाशयातील अर्बुदे व बंध, गर्भाशयाच्या विकृती इत्यादींचेही निदान होते. यामुळे कमी धोक्यामुळे व तपासणीचा पुरावा छायाचित्र रूपाने कायम राहात असल्याने ही हवा भरण्यापेक्षा चांगली तपासणी आहे आणि इतर नवीन तपासण्या उपलब्ध असल्याच्या सध्याच्या काळातही या तपासणीचे महत्त्व टिकून आहे.

प्रत्यक्ष पाहून तपासणी : अंतर्दर्शनाचा भाग म्हणून वरील प्रकारचे परंतु रंगीत द्रवाचा वापर करून द्रवाचा अंडवाहिन्यांतील प्रवास प्रत्यक्ष पाहाता येतो (प्रस्तुत नोंदीतील ‘उदरगुहांतर्दर्शन’ या शीर्षकाखालील माहिती पहावी).

गर्भाशय़-ग्रीवा विस्तारण व खरवडणे : ही क्रिया ऋतुचक्राच्या उत्तरार्धात (पुढील अपेक्षित मासिक पाळीच्या आधीच्या आठवड्यात) केली जाते. वंध्यत्वासाठी उपचार म्हणून ही उपयुक्त ठरत असली, तरी ती मुख्यत्वे तपासणी म्हणून केली जाते. गर्भाशयाचा अंतर्भाग खरवडून मिळणारे अंतःस्तरीय ऊतक सूक्ष्मशारीरविकृति-वैज्ञानिक व सूक्ष्मजंतुवैज्ञानिक परीक्षेसाठी पाठविले जाते. अंतःस्तराच्या वाढीच्या टप्प्यावरून किमान त्या ऋतुचक्रात अंडमोचन (अंडकोशातून परिपक्क अंड बाहेर पडण्याची क्रिया) झाले आहे किंवा नाही (व एरवीही बहुधा होत असणार किंवा नाही) हा निष्कर्ष काढता येतो. तसेच अंतःस्तर रोगग्रस्त (मुख्यतः क्षयरोगाने) आहे का नाही हेही पाहिले जाते (एरवी निरोगी भासणाऱ्या स्त्रियांत अंतःस्तराचा किंवा श्रोणीभागातील क्षयरोग हे वंध्यत्वाचे बऱ्याच वेळा आढळणारे कारण आहे).

अंडमोचनाची वेळ व वारंवारता तपासणे : नियमित ऋतुचक्र असलेल्या स्त्रियांतही अंडमोचन होत असण्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. ते होतच नसल्यास किंवा पुरेसे वारंवार होत नसल्यास त्याची कारणे शोधून त्यांवर व ते होण्यासाठी उपचार करता येतात. ते होण्याची वेळ समजल्यावर त्या दृष्टीने जोडप्यास समागमासंबंधी सूचना देता येतात. यासाठी अनेक तपासण्या करता येतात. (१) नियमित ऋतुचक्राच्या बाबतीत काही स्त्रियांत अंडमोचनाच्या सुमारास ओटीपोटात जाणवणारी अस्वस्थता किंवा वेदना, काहींत त्या सुमारास होणारा सौम्य रक्तस्त्राव तर काहींत पुढील पाळीपूर्वी स्तनांत जाणवणारा जडपणा किंवा वेदना, ही लक्षणे त्या ऋतुचक्रात (व बहुधा वारंवार) अंडमोचन झाल्याचे सुचवितात व अंडमोचन कधी याचाही अंदाज करता येऊ शकतो. (२) स्त्रीला स्वतःला जाणवणारे योनिमार्गातील स्त्रावाचे (ओलसरपणाचे) कमी अधिक प्रमाण व गुणधर्म, अंडमोचनाच्या सुमारास रोज गर्भाशय ग्रीवेतील स्त्राव काचपट्टीवर सुकवून त्याच्या गुणधर्मांची सूक्ष्मदर्शकाखाली केलेली तपासणी, तसेच त्या सुमारास रोज केलेले योनिमार्गातील स्त्रावातील कोशिकांचे परीक्षण यांवरून अंडमोचन झाल्याचे व कधी झाले याचे निदान होऊ शकते.(३) अंतःस्तराच्या सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक परीक्षेवरून अंडमोचन होत असल्याचे निदान करता येते. (४) रोजच्या शरीरतापमानातील बदलावरून अंडमोचन झाल्याचे समजू शकते (अंडमोचनाच्या सुमारास व त्यानंतर शरीराचे तापमान १ से. ने जास्त असते). ही तपासणी स्त्रीला स्वतःच्या घरच्या घरी करता येते. (५) रक्तातील किंवा मूत्रातील स्त्री हॉर्मोनांच्या पातळ्यांतील रोजच्या बदलांवरूनही हे निदान होऊ शकते (परंतु त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळेची जरूरी असते). (६) पोट उघडून करण्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा उदरगुहांतर्दर्शन करताना अंडमोचन होताना प्रत्यक्ष पाहाणे किंवा अंडमोचन झाल्याच्या विशिष्ट खुणा अंडकोशावर पाहाणे [अंडकोशावरील पीतपिंडे; ⟶अंडकोश] यांवरून अंडमोचनाचा प्रत्यक्ष पुरावा मिळतो. (७) अंडमोचनाच्या सुमारास रोज श्राव्यातील ध्वनि-प्रतिमादर्शन [⟶वैद्यकीय प्रतिमादर्शन] करून अंडकोशावर वाढणारे पुटक पाहाता येते. त्यावरून पुटकाची प्राकृत वाढ व ते फुटल्याचा (अंडमोचन झाल्याचा) दिवस नक्की करता येतो.

समागमोत्तर तपासण्या : गर्भाशय-ग्रीवेतील स्त्रावांत शुक्राणूंचा प्रवेश, त्यांचे तेथील संख्याबल व त्यांची या स्त्रावातील पुरोगामी प्रगतीवर हालचाल पाहाणे हे या तपासण्यांचे उद्दिष्टे असते. अंडमोचनाच्या सुमारास गर्भाशय-ग्रीवेतील स्त्राव शुक्राणुप्रवेशास जास्तीत जास्त अनुकूल असल्याने त्या सुमारास ही तपासणी केली जाते. त्यासाठी समागमोत्तर १ ते २४ तासांत गर्भाशय-ग्रीवेतील स्त्राव तपासला जातो. (तुलनेसाठी योगिर्मागाच्या गर्भाशय-ग्रीवा सन्निध भागातून योगिमार्गातील वीर्यमिश्रित स्त्राव तपासला जातो) किंवा गर्भाशय-ग्रीवेतील स्त्राव काचपट्टीवर माहीत असलेल्या जननक्षम वीर्याच्या शेजारी ठेवून ते मिसळताच शुक्राणूंची स्त्रावातील प्रवेश व हालचाल सूक्ष्मदर्शकाखाली तपासली जाते. या तपासण्यांच्या नकारात्मक निकालावरून गर्भाशय-ग्रीवा-विरोध हे निदान करता येऊ शकते आणि अशा स्त्रियांना पतीच्या वीर्याच्या कृत्रिम वीर्यसेचनाने गर्भधारणा होऊ शकते [⟶वीर्यसेचन, कृत्रिम]; परंतु काही तज्ञांच्या मते या तपासण्यांचे निकष नियमित केलेले नसल्याने निकाल संशयास्पद असतात व मुळात गर्भाशय-ग्रीवा-विरोध ही उपपत्तीच्या स्वरूपातील संकल्पातील संकल्पना आहे. त्यांमुळे या तपासण्यांची उपयुक्तता वादग्रस्त आहे.

उदरगुहांतर्दर्शन : वरील तपासण्यांवरून वंधत्वाचे कारण जेव्हा समजू शकत नाही, त्या वेळी ही तपासणी केली जाते. या तपासणीत एकाच वेळी वरील बहुतेक तपासण्यांतून मिळणारी माहिती एकत्र मिळत असल्याने, उदरगुहेतील जननेंद्रिये प्रत्यक्ष पाहाता येत असल्याने व तोलनिक सोपेपणामुळे सध्या ही तपासणी प्राथमिक म्हणूनही केली जाते. ती ऋतुचक्राच्या तिसऱ्या किंवा चवथ्या आठवड्यात (पुढील ऋतुचक्राच्या आधीच्या आठवड्यात) केली जाते. त्यात प्रथम उदरगुहेतील व मुख्यतः श्रोणीतील इंद्रिये पाहिली जातात आणि त्यावरून गर्भाशय, अंडवाहिन्या व अंडकोशातील जन्मजात दोष, विकृती व रोग यांचे निदान होते. अंडकोशावर अंडमोचन झाल्याच्या म्हणजे पुटक फुटल्याच्या जागा व पूर्वी होत असल्याच्या खुणा (उदा., पीतपिंडे) पाहाता येतात. विशिष्ट रंगीत द्रव गर्भाशयग्रीवेतून भरून (गर्भाशय-अंडवाहिनीदर्शनाप्रमाणे) तो दोन्ही बाजूंच्या नळ्यांतून वाहाताना व त्यांच्या मुखातून बाहेर पडताना प्रत्यक्ष पाहाता येतो. यावरून दोन्ही अंडवाहिन्यांचा खुलेपणा किंवा अडथळ्यांचे स्वरूप व नक्की स्थान पाहाता येते. तसेच या तपासणीचा भाग म्हणून गर्भाशय-ग्रीवा विस्तारण खरवडणे या क्रिया करून अंतःस्तर सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक परीक्षेसाठी पाठविला जातो. या परिक्षेच्या निकालाचा व प्रत्यक्ष दिसलेल्या गोष्टींचा तोंलनिक अभ्यास करून वंधत्वाच्या कारणांसंबंधी महत्त्वाचे निष्कर्ष काढता येतात. तपासणीच्या वेळीच काही स्वरूपाचे किरकोळ दोष शस्त्रक्रियेने दूर करता येतात किंवा पुढील मोठ्या शस्त्रक्रियेच्या उपचाराचे नियोजन करता येते.

जननेंद्रियात एरवी सर्वसाधारण दोष न सापडलेल्या स्त्रियांपैकी ३० ते ५० % स्त्रियांत वंधत्वाचे विशिष्ट कारण या तपासीमुळे सापडू शकते. अनपेक्षित अशा कारणांत परिअंडवाहिनी व परिअंडकोश बंध गर्भाशयांतःस्तरीभवन आणि आय्. एफ्. स्टाइन व एम्. एल्. लेव्हेंथाल या अमेरिकन स्त्रीरोगवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या स्टाइन-लेव्हेंथाल लक्षणसमूहात आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण, अंडोत्पादन न करमारे अंडकोश ही प्रमुख कारणे आहेत.

शरीरबाह्य फलनात आणि इतर नवीन संशोधनात व उपचार पद्धतींत तसेच अंडवाहिन्यांवर केल्या जाणाऱ्या सूक्ष्मशस्त्रक्रियांत उदर गुहांतदर्शनाचे महत्त्व व उपयुक्तता मोठी आहे.

हॉमोंन आमापन : अंतःस्त्रावी ग्रंथींच्या असंतुलित कार्यामुळे होणाऱ्या रोगांमुळे वंधत्व आलेले असल्यास त्या रोगांचे निदान व उपचार करण्यास त्या त्या हॉर्मोनांच्या रक्तातील पातळ्यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. तसेच अनार्तव व आर्तवन्यूनता रुग्णांत मासिक पाळी येत नसल्यास कमी प्रमाणात, दीर्घ कालावधीनंतर व अनियमित येत असल्यास आणि अंड तयार होत नसल्यास ऋतुचक्रनियमन करणाऱ्या अंतःस्त्रावी ग्रंथींच्या (अधोथॅलॅमस, पोष ग्रंथी व अंडकोश या ग्रंथींच्या) परस्परावलंबी गुंतागुंतीच्या साखळीत कोणत्या पातळीवर दोष आहे व कोणत्या प्रकारच्या हॉर्मोनांचा उपचार उपयुक्त ठरेल हे ठरविण्यासाठी त्या हॉर्मोनांच्या रक्तातील पातळ्यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

उपचार

वंध्यत्व हा व्यक्तिगत प्रश्न नसून जोडप्यांचा प्रश्न असतो व त्या जोडप्याच्या संदर्भात विशिष्ट असतो. त्यामुळे जोडप्यातील दोघांचा एकत्रित विचार करून, त्या जोडप्यासंदर्भात समजलेली वंध्यत्वाची कारणे एक-एक करून दूर करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने विशिष्ट उपचारांची आखणी केली जाते.

तपासणीत सहज आढळलेल्या इतर रोगांवर उपचार करून जोडप्याचे सर्वसाधारण आरोग्य प्रथम सुधारले जाते. त्यात मुख्यतः अतिश्रम, शारीरक व मानसिक ताण व अस्वास्थ्य, अतिस्थूलपणा, मद्यपान, धूम्रपान, शरीरातील पूतिकेंद्रे (पू उत्पन्न करणारे व इतर रोगकारक सजीव वा त्यांची विषे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असलेली स्थाने) इत्यादींकडे लक्ष पुरविले जाते व विशिष्ट उपचार त्यानंतर सुरू केले जातात.

कित्येक वेळा, विशेषतः वंधत्वाची तक्रार फार लवकर केली जात असल्यास व दोघांच्या शारीरिक तपासणीत दोष न आढळ्यास धीर देणे, गर्भधारणेमागील शरीरक्रियाविज्ञान प्राथमिक स्वरूपात समजावून देणे व प्राकृत जननक्षमता असलेल्या जोडप्यांतील गर्भधारणेच्या शक्यतेच्या सर्वसाधारण प्रमाणाची माहिती देणे उपयुक्त व पुरेसे असते.

वर वर्णन केलेल्या तपासण्यांचा बऱ्याच वेळा उपचार म्हणूनही उपयोग होत असल्याने प्रत्येक तपासणीनंतर काही काळ गर्भधारणा होण्याची वाट पाहणे (त्या तपासणीत वंधत्वाचे इतर कोणते विशिष्ट कारण सापडलेले नसल्यास) हितावह असते. एकूण सर्वच उपचार वैद्याने धीराने व कौशल्याने करावे लागतात आणि जोडप्यालाही धीर धरण्यास व आशादायक दृष्टिकोन ठेवण्यास सांगणे आवश्यक असते. तसेच उपचार करतात इतर गोष्टींबरोबरच जोडप्याच्या मानसिक, भावनिक, कौटुंबिक व सामाजिक आरोग्याचेही भान ठेवावे लागते.

समागमातील दोष किंवा अडचणी दूर करण्याबरोबरच ऋतुचक्राच्या (गर्भधारणेस योग्य अशा) कोणत्या कालावधीत व किती वारंवार समागम करावा यासंबंधी काही वेळा सूचना द्यावा लागतात. (२८ दिवसांच्या ऋतुचक्रात अंदाजे दहाव्या ते विसाव्या दिवसांदरम्यान साधारण दिवसाआड समागम करण्यास सांगितले जाते). समागमा नंतर १०-१५ मिनिटे स्त्रीने आडवे झोपून विश्रांती घेणे हितावह असते.

पतीवरील उपचार

(१) शिश्नोत्थान असमर्थता (नपुंसकत्व) व अकाल वीर्यस्खलन यांवरील उपचार प्रामुख्याने मानसिक स्वरूपाचे असतात [⟶लैंगिक वैगुण्ये].

(२) दोषास्पद किंवा कमी प्रमाणतील शुक्राणू उत्पादन आणि वीर्यात शुक्राणूंचा अभाव यांवरील उपचार सर्वसाधारणपणे फारसे समाधानकारण नसतात; परंतु सर्वसाधारण आरोग्य सुधारणे, अतिस्थूलपणा व व्यसनाधीनतेवर उपचार करणे आणि अष्ठीला ग्रंथी, मूत्रमार्ग व जननेंद्रिये यांच्या संसर्गावर उपचार करणे यांमुळे सुधारणा होते. वृषण थंड राहण्यासाठी घट्ट व कृत्रिम तंतूची अंतर्वस्त्रे न वापरणे, उष्ण वातावरणात सलग फार काळ काम न करणे, थंड पाण्याने स्नान करणे व वृषण थोडा वेळ थंड पाण्यात बुडवून ठेवणे हे उपचार उपयुक्त ठरतात. क्लोमिफेन या औषधाचा शुक्राणू उत्पादन वाढविण्यास उपयोग होऊ शकतो. वृषण प्राकृतपणे कार्य करणारे असून पोष ग्रंथी अधोथॅलॅमस पातळीवर स्पष्ट दोष आढळल्यास पोषक हॉर्मोने (उदा., पुटकोद्दिपक हॉर्मोन) उपयुक्त ठरतात. ब१२ व फॉलिक अम्ल ही जीवनसत्वे शुक्राणुंच्या परिक्कतेसाठी आवश्यक असल्याने त्यांच्या उपचारांचा उपयोग होत असावा. अनुभवात्मक ज्ञानावर आधारित ई जीवनसत्तव व लहान मात्रेमध्ये ⇨अवटू ग्रंथीच्या हॉर्मोनाचा (थायरॉक्सिनाचा) उपचार केला जातो; परंतु त्यांची व टेस्टोस्टेरोन या वृषणजन्य हॉर्मोनाची उपयुक्तता शास्त्रीय पायावर सिद्ध झालेली नाही. वरील वैद्यकीय उपचारांची उपयुक्तता ठरवणे अवघड आहे. कारण शुक्राणूच्या परिपक्कतेस सहा आठवडे लागत असल्याने औषधाने पडलेला फरक त्यानंतरच समजतो. तसेच वीर्याचा दर्जा एकाच व्यक्तीत वेळोवेळी अचानक बदलत असल्याने उपचार व शुक्राणू संख्येतील वाढ यांच्यातील स्पष्ट कार्य-कारणभाव सिद्ध करणे अवघड असते.

(३) वृषण नीला अपस्फीतीसाठी केलेली शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते; परंतु शस्त्रक्रिया करताना वृषणाच्या रक्तपुरवठ्याला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

(४) अधिवृषणातील किंवा रेतवाहिनीतील अडथळ्यामुळे वीर्यात शुक्राणूंचा अभाव असल्यास त्या क्षेत्रातील तज्ञ वैद्याने केलेली शाखांतरीय शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.

(५) गुप्तवृपणता आणि गालगुंड व इतर व्हायरसजन्य रोगांनी उद्भवणारा वृषणशोथ यांवर वेळीच उपचार केल्यास त्यामुळे पुढे वीर्यात शुक्राणूंचा अभाव निर्माण होण्याची शक्यता टळते.

पत्नीवरील उपचार

(१) स्त्रीचे सर्वसाधारण आरोग्य सुधारणे, जननेंद्रियांची स्वच्छता राखणे व जननेंद्रियांचे रोग: विशेषतः उपदंश, क्षय व इतर संसर्गजन्य रोग आढळले असल्यास त्यांवर पूर्ण उपचार करणे महत्त्वाचे असते. समागमापूर्वी खाण्याच्या सोड्याच्या विद्रावाने किंवा रिंगर लॅक्टेट विद्रावाने (मीठ, सोडियम लॅक्टेट, कॅल्शियम क्लोराइड व पोटॅशियम क्लोराइड यांच्या शुद्ध पाण्यातील आणि सिडनी रिंगर या इंग्लिश शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या विद्रावाने) योनीमार्ग आतून धुणे हा अनुभव सिद्ध उपचार उपयुक्त ठरू शकतो.

(२) हॉर्मोनांचे उपचार: अंडमोचन असमर्थता खात्रीपूर्वक सिद्ध झालेली असल्यास व अंडकोशात उद्दीपन देण्याजोगी अंडे असल्यासच या प्रकारचे उपचार आवश्यक व उपयुक्त ठरतात. अशा रुग्णांतच सहसा पाळी न येणे आणि अनियमित, जास्त कालावधीने किंवा कमी प्रमाणात पाळी येणे याही तक्रारी आढळतात. स्त्री-हॉर्मोनांचे (स्त्रीमदजन व प्रगर्भरक्षी) चक्रीय उपचार, क्लोमिफेन किंवा पोषक हॉर्मोनांचे उपचार हे ऋतुचक्राच्या हॉर्मोन संतुलनातील बिघाडाची नक्की पातळी शोधून त्याप्रमाणे करावे लागतात (पूर्ण तपासण्यांच्या अभावी अनुमानधपक्याने व अनियंत्रितपणे केलेले हॉर्मोनांचे उपचार अयोग्य, निरुपयोगी व प्रसंगी धोकादायक ठरतात.). अधोथॅलॅमस-पोष ग्रंथी तंत्राच्या बिघाडामुळे किंवा असंतुलित कार्यामुळे स्तनांतून अवेळी दुग्धस्त्राव होणे व ऋतुकाल न येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास ब्रोमीक्रिप्टीन या औषधाचा उपयोग होऊ शकतो (मात्र हा उपचार तज्ञ वैज्ञानेच करायचा असतो).

(३) शस्त्रक्रियेचे उपचा: (अ) तपासणी म्हणून केलेल्या शस्त्रक्रियांचा उपचार म्हणूनही उपयोग होऊ शकतो.

(आ) बंद अंडवाहिन्यांतील अडथळा दूर करणाऱ्या शस्त्रक्रिया : दोन्ही अंडवाहिन्या बंद असल्यास अडथळ्याची जागा, विस्तार व कारणीभूत रोग शोधून त्यांवरून त्या रोगावर उपचार व नंतर विशिष्ट शस्त्रक्रियांनी अडथळ्यांवर मात करणे शक्य असते. यातील क्षयाने व परम्याने खराब किंवा बंद झालेल्या अंडवाहिन्यांवरील शस्त्रक्रिया फारशा उपयुक्त ठरत नाहीत. श्रोणि-पर्युदरशोथ, आंत्रपुच्छशोथ, प्रसुतीनंतरचे संसर्ग, जलअंडवाहिनी (एका अगर दोन्ही अंडवाहिन्यांच्या आत द्रव साठल्याने आकारमानात अपसामान्य वाढ होणे), परिअंडवाहिनी बंध आणि अंडवाहिनीच्या अस्तराच्या श्लेष्मल पटलाचा स्थानिक शोथ किंवा शस्त्रक्रियेमुळे बंद झालेल्या अंडवाहिन्या यांवरील शस्त्रक्रिया उपयुक्त ठरू शकतात; परंतु या शस्त्रक्रियांमुळे रचनात्मक अडथळा दूर झाला, तरी कार्यात्मक सुधारणेची खात्री नसते. विकृतस्थानीय (गर्भाशयाबाहेर इतरत्र होणारी) गर्भधारणा व तीपासून उदभवणाऱ्या धोक्यांची शक्यता वाढते आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया मोठ्या असतात. त्यामुळे पतीची जननक्षमता उच्च प्रतीचा आढळल्यास, शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता व तीपासून निर्माण होऊ शकणारे धोके यांचा अंदाज घेतल्यावरच या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. अडथळ्याचे ठिकाण व त्याच्या स्वरूपानुसार निरनिराळ्या प्रकारच्या सस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

(इ) गर्भाशय स्थिती सुधारणाऱ्या शस्त्रक्रिया : श्रोणिशोथ, गर्भाशयांतःस्तरीभवन इत्यादींमुळे असलेला गर्भाशयाचा स्थिर पश्चवक्रीपणा वंध्यत्वाचे कारण असू शकतो. अशा वेळी मूल कारणांवर उपचार व नंतर श्रोणीतील बंध सोडविणाऱ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. शारीरिक ठेवण म्हणून असलेले चल पश्चवक्री गर्भाशय सहसा वंध्यत्वाचे कारण असत नाही; परंतु इतर सर्व कारणांच्या शक्यता दूर केल्यावर गर्भाशय स्थिती सुधारून बघण्यास हरकत नसते. त्यासाठी सहसा एच्. एल्. हॉज या अमेरिकन स्त्रीरोगवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारे हॉज आधारवलय (द्विवक्री लांबट साधन) वापरणे पुरेसे असते. क्वचितच पोट उघडून गर्भाशय पुरोवक्री अवस्थेत ठेवण्याच्या शस्त्रक्रियांची आवश्यकता असते.

(ई) वरील शस्त्रक्रियेबरोबरच किंवा एरवीही स्टाइन-लेव्हेंथाल लक्षणसमूहाचे अंडमोचनास असमर्थ असलेले अंडकोश आढळल्यास पाचरीसारखा तुकडा काढण्यासाठी अनुभवसिद्ध शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेच्या उपयुक्ततेबद्दल मतभेद असेल, तरी काढलेल्या तुकड्याच्या सूक्ष्मशारीरविकृतिवैज्ञानिक परीक्षेमुळे निदान निश्चितीसाठी उपयुक्त माहिती मिळू शकते.

(उ) अंडकोशाचे गर्भाशयात रोपण : अंडवाहिनी दुरूस्त करणे अशक्य असल्यास ती काढून टाकून अंडमोचन गर्भाशयात होऊ शकेल अशा पद्धतीने अंडकोश गर्भाशयभित्तीत शिवला जातो. या प्रकारच्या शस्त्रक्रियांची निष्पत्ती समाधानकारक नसल्याने त्या क्वचितच केल्या जातात.

(४) कृत्रिम वीर्यसेच: समागमाशिवाय इतर पद्धतींनी (बहुधा हस्तमैथुनाने) वीर्य जमा करणे व ते योनिमार्गात वरच्या म्हणजे गर्भाशय ग्रीवेभोवतालच्या भागात किंवा गर्भाशय ग्रीवेतून गर्भाशयात सोडणे अशी पद्धत वापरणे काही वेळा जरूर असते.

(अ) पतीच्या वीर्याने कृत्रिम सेचन : जेव्हा पुरुषातील शारीरिक वैगुण्यामुळे (उदा., अघश्छिद्रता), शिश्नोत्थान असमर्थतेमुळे किंवा इतर कारणांनी प्राकृती समागम अशक्य असतो त्या वेळी वीर्य बाहेर जमा करून ते योनीमार्गात सोडले जाते. [शिश्नोत्थान असमर्थतेच्या मानसिक स्वरूपामुळे काही व्यक्तींचे शिश्नोत्थान प्राकृत समागमाच्या वेळी होत नसले, तरी ते हस्तमैथुनाच्या वेळी किंवा स्वप्नावस्थेत होऊ शकते. अशा प्रकारे त्या व्यक्ती वीर्य उपलब्ध करून देऊ शकत असल्यास, बहुधा त्यांचे शुक्राणू उत्पादन प्राकृत पातळीपर्यंत असल्याने, कृत्रिम वीर्यसेचन शक्य होते; ⟶लैंगिक वैगुण्ये]. पश्चवीर्यस्खलनाच्या दोषात प्राकृत समागमानंतर विशिष्ट पद्धतींनी मूत्र जमा करून त्यातून शुक्राणू वेगळे करून ते योनीमार्गात सोडणे शक्य असते.

गर्भाशय-ग्रीवेच्या रोगांमुळे किंवा दोषांमुळे शुक्राणू गर्भाशयग्रीवेत प्रवेश करू शकत नसल्यास किंवा समागमोत्तर तपासणीवरून गर्भाशय-ग्रीवा विरोध हे कारण शक्य वाटत असल्यास (व वंध्यत्वाचे इतर कोणतेही कारण सापडलेले नसल्यास) वीर्य थोड्या प्रमाणात गर्भाशय-ग्रीवेत सोडले जाते.

वीर्य गोठवून अतिशय अवस्थेत टिकवून ठेवणे व नंतर गरजेनुसार कृत्रिम सेचनासाठी वापरणे आता शक्य झाल्याने अनेक प्रकारच्या भविष्यकालीन प्रतिकूल परिस्थितीत पतीचे टिकवलेले वीर्य वापरता येण्याची शक्यता झाली आहे.

(आ) दात्याकडून कृत्रिम वीर्यसेचन: जेव्हा स्त्री पूर्णपणे जननक्षम असून पती वंध्य (वीर्यात शुक्राणूंचा पूर्ण अभाव) असेल किंवा इतर काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितींत अज्ञात दात्याचे चांगल्या प्रतीचे वीर्य कृत्रिम सेचनासाठी वापरता येऊन त्यामुळे गर्भधारणा होऊ शकते. परंतु त्यामध्ये व्यक्तिगत पातळीवर मानसिक व भावनिक आणि सामाजिक पातळीवर नीतिमत्ता, धर्म व कायदा या संदर्भात अनेक प्रकारची गुंतागुंत असल्याने ते करण्याविषयी अनेक मतभेद आहेत. [⟶ वीर्यसेचन, कृत्रिम].

नवीन उपचार पद्धती व संशोधन

ज्या स्त्रियांच्या अंडवाहिन्या किंवा अंडकोश कार्यक्षम नाहीत त्यांच्यात चांगल्या व निरोगी अंडवाहिन्यांचे किंवा अंडकोशाचे रोपण करणे (पर-रोपण) तांत्रिक व रोगप्रतिकारक्षमतेमुळे येणाऱ्या अडचणींमुळे अजून शक्य झालेले नाही.

दोन्ही अंडवाहिन्या व्रण किंवा इतर अडथळ्यांमुळे बंद असलेल्या स्त्रियांसाठी अंडवाहिन्यांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. पुढे फुगा जोडलेली बारीक अरुंद नलिका अंडवाहिनीत सरकवून व पुढील फुगा फुगवून अंडवाहिनी मोकळी करता येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. अंडवाहिन्या बंद असलेल्या स्त्रियांरपैकी ३० टक्क्यांपर्यंत स्त्रियांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

अंडकोशातून पूर्ण वाढ झालेली अंडे मिळवून ती (हस्तमैथुनाने मिळवलेल्या वीर्यातील) शुक्राणूंबरोबर योग्य परिस्थितीत मिसळली जातात. तेथे शुक्राणूंबरोबर संयोग होऊन त्यांचे फलन होते. फलित अंडे योग्य कालवधीपर्यंत (२ दिवस-८ ते १६ कोशिकांची अवस्था) विशिष्ट परिस्थितीत शरीराबाहेर वाढविली जातात. याला शरीरबाह्य फलन (परीक्षा नलिका फलन; इन व्हिट्रोफर्टिलायझेशन; आय व्ही एफ) असे म्हणतात. विशिष्ट वाढीचे फलित अंड (आधीच स्त्रीला हॉर्मोने योग्य प्रमाणात देऊन गर्भधारणेस योग्य अवस्थेत आणलेल्या) गर्भाशयात सोडल्यावर तेथे ते रुजून गर्भ वाढू लागतो (स्व-रोपण).

ही पद्धत आनुवंशिकीविज्ञ रॉबर्ट एडवर्ड्स आणि स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ पॅट्रिक स्टेपटो यांनी संशोधन करून विकसित केली आणि या पद्घतीच्या यशस्वी उपयोगान्ती १९७८ साली प्रथम परीक्षानलिका बालक (टेस्ट-ट्यूब बेबी) लुईस ब्राउन जन्माला आले, दोन्ही अंडवाहिन्यांत दुरुस्त करता न येणारा किंवा मोठा अडथळा असल्यास ही पद्धत उपयुक्त ठरते व अंडवाहिन्यांवरील मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांची जरूर राहत नाही; परंतु ही पद्धत खर्चिक असून भावी काळातही खर्चिक राहील. कारण या पद्धतीसाठी अती कुशल व विशेष प्रशिक्षित स्त्रीरोगतज्ञ, हॉर्मोनतज्ञ व आनुवंशिकीविज्ञ यांच्या संघाची आणि विशेष प्रशिक्षित तंत्रज्ञांनी व उपकरणांनी विशेष तऱ्हेने सुसज्ज असलेल्या प्रयोगशाळेची जरूर असते. तसेच अनेक मुले या पद्धतीने जन्मली असली, तरी उत्तम प्रकारे चालवलेल्या केंद्रांतही ही पद्धत खूप वेळखाऊ असून अयशस्वी ठरण्याचे प्रमाण ७५% ते ८५% आहे. फलित अंड गर्भाशयात सोडण्याची क्रिया करताना गर्भाशयाच्या कार्यात्मक अखंडतेत हस्तक्षेप होतो व फलित अंड रुजण्यात अडथळे येतात हे त्याचे कारण आहे ही अडचण दूर करणाऱ्या दोन नवीन पद्धतींचे प्रयोग १९९० मध्ये यशस्वीपणे करण्यात आले. पहिल्या पद्धतीत गॅमीट इन्ट्रा-फॅलोपियन ट्रॅन्स्फर (जीआयएफटी); शुक्राणू व अंड अंडवाहिनीत एकापाठोपाठ सोडले जातात. तेथे अंडाचे फलन होऊन फलित अंड नैसर्गिक रीत्या गर्भाशयात उतरत असल्याने ते चांगल्या प्रकारे रुजू शकते; परंतु प्रत्येक प्रयत्नात अंड फलित होण्याची खात्री नसते. दुसऱ्या पद्धतीत (झायगोट इन्ट्रा-फॅलोपियन ट्रॅन्स्फर; झेडआयएफटी) शरीरबाह्य फलन करून विशिष्ट अवस्थेपर्यंत (१ दिवस-एक कोशिका अवस्था) वाढलेले फलित अंड अंडवाहिनीत सोडले जाते. या दोन्ही पद्धती स्त्रीच्या वंधत्वाच्या इतर काही कारणांसाठी (गर्भाशयातःस्तरीभवन व अनाकलनीय कारणांनी आलेल्या वंधत्वासाठी) वापरता येण्यासारख्या असल्या; तरी बंद, खराब किंवा रोगग्रस्त अंडवाहिन्यांमुळे वंध्यत्व असल्यास उपयुक्त नाहीत. प्राकृत व कार्यक्षम अंडवाहिन्या असल्यासच या पद्धती वापरता येतात.

ऋतुनिवृत्तीनंतर अंडाची निर्मिती बंद झाल्याने मूल होणे अशक्य समजले जात असे; परंतु अंडकोश अकार्यक्षम झाला असला, तरी गर्भाशय अजूनही कार्यक्षम असू शकते, असे नवीन संशोधन सुचविते. म्हणून अशा स्त्रीच्या पतीच्या शुक्राणूंनी फलित केलेले दुसऱ्या तरुण दात्री स्त्रीचे अंड पहिल्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवून तिला मूल होणे शक्य झाले आहे. ऋतुनिवृत्तीचा काळ जवळ आलेल्या वंध्य स्त्रियांनाही याचा फायदा होऊ शकेल.

याचप्रमाणे गर्भाशयाच्या दोषांमुळे स्त्रीस वंध्यत्व असल्यास (परंतु तिचे अंडकोश कार्यक्षम असल्यास) तिचे अंड शरीराबाहेर फलित करून गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढविणेही शक्य आहे.

अशा प्रकारच्या शरीरबाह्य फलन व रोपणाशी संबंधित असलेल्या प्रयोगांशी आणि यशस्वी प्रयोगांच्या उपयोगांशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या (उदा., वंध्य जोडपे, त्यातील एक किंवा दोन्ही व्यक्ती वंध्य असणे–वीर्यदाता पुरुष, अंडदात्री स्त्री व गर्भ वाढविणारी दुसरी स्त्री इ.) त्या त्या परिस्थितीतील उपयुक्ततेनुसार अनेक संबंधित शक्यता निर्माण होतात. उदा., एका स्त्रीच्या पतीच्या शुक्रणूंनी दुसऱ्या ( दात्री) स्त्रीचे अंड फलित करून निर्माण झालेला गर्भ पहिल्या स्त्रीने स्वतःच्या गर्भाशयात वाढवून मुलाला जन्म देणे किंवा एका स्त्रीचे तिच्या पतीच्या शुक्राणूंनी फलित केलेले अंड दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवून मूल होणे किंवा एका स्त्रीचे अंड दात्या पुरुषाच्या शुक्रणूंनी फलित करून दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढविणे वगैरे. त्यातून अशा प्रकारे होणाऱ्या मुलांचे भावनिक, कौटुंबिक, सामाजिक व कायदेशीर दृष्ट्या आई-वडील कोण? मूल कोणाचे? त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी कोणाची? सामाजिक व नैतिक दृष्ट्या या गोष्टी योग्य की अयोग्य? या उपचारांमुळे पुढील काळात त्या जोडप्याच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक ओरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची? आणि असे या उपचारांचाच परिणाम आहे हे कसे ठरवायचे? अशा प्रकारचे अनेक गुंतागुतीचे प्रश्न निर्माण होत आहेत व त्यांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. प्रत्येक नवीन प्रयोगाबरोबर समस्या निर्माण होत आहेत. शिवाय इतरही अनेक अंगांनी या प्रयोगांना आक्षेप घेतले जात आहेत. उदा., काही लोकांचा व धार्मिक गटांचा जननाच्या कोणत्याही कृत्रिम पद्घतीला, मानवी गर्भाच्या प्रायोगिक हाताळणीला व जननिक अभियांत्रिकी दृष्टिकोनाला विरोध आहे. हे सर्व प्रयोग स्त्रियांवर होणे अपरिहार्य असल्याने स्त्रीमुक्तिवादी गटांना हे प्रयोग म्हणजे स्त्रियांची शरीरे व भवितव्यावर ताबा मिळविण्याच्या पुरुषी प्रयत्नांचा आणखी एक मार्ग वाटतो. तसेच समाजाच्या मोठ्या भागाच्या मूलभूत व साध्या वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची आवश्यकता असताना व लोकसंख्यावाढीचा मोठा प्रश्न असताना मोजक्या लोकांच्या वैयक्तिक गरजेसाठी या विषयातील संशोधनावर प्रचंड खर्च करण्याची काही लोकांना जरूरी वाटत नाही वगैरे.

असे असूनही या प्रकारचे संशोधन होत राहणार कारण वंध्य जोडप्यांच्या वैयक्तिक दृष्टीने मूल होणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे आणि व्यापक दृष्टीने पाहता नवीन तंत्रे शोधताना व शोधण्यासाठी, जननक्रियेवर आणि इतर अनेक क्षेत्रांत मूलभूत व उपयुक्त संशोधन होत राहते, हा याचा फायदा आहे. वरील सर्व दृष्टींनी या प्रयोगांकडे व त्यांच्या उपयुक्ततेकडे पाहिले पाहिजे.

फलानुमान

कोणताही सल्ला दिला किंवा कोणत्याही प्रकाराने उपचार केले, तरी उपचारासाठी आलेल्यांपैकी काही जोडप्यांतील स्त्रियांना गर्भधारणा होते व ती निव्वळ योगायोगाने झालेली गोष्ट असते. त्यामुळे प्रकारच्या उपचारांचे (शास्त्रीय व अशास्त्रीय) समर्थन केले जात असले, तरी विशिष्ट उपचाराची खरी उपयुक्तता ठरविणे अवघड असते. तसेच एखाद्या जोडप्यास उपचारानंतर गर्भधारणा झाल्यास त्या जोडप्याची एकूण जननक्षमता उपचारांमुळे एकूणच व कायमची वाढली असा त्याचा अर्थ होत नाही.

कमी जननक्षमता असलेल्या स्त्रीला गर्भधारणा झाल्यास अंडवाहिनीतील (किंवा गर्भाशय सोडून इतरत्र) गर्भधारणा, गर्भपात, गर्भिणी विषबाधा [⟶गर्भारपणा], अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण, अवघड बाळंतपण, गर्भाचा जन्मपूर्व मृत्यू, जन्मतः मृत्यू व कदाचित जन्मजात विकृती असलेले मूल होणे या धोक्यांना तुलनात्मक दृष्ट्या खूप जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा गर्भारपणाची जास्त काळजी घ्यावी लागते.

वंधत्वासाठी तपासण्या व उपचार करण्यातील धोके

प्रत्येक तपासणी व उपचार बहुधा किरकोळ किंवा मोठ्या शस्त्रक्रियेच्या स्वरूपात असल्याने भूल व त्या त्या शस्त्रक्रिया यांचे धोके संभवतात. तसेच तपासण्या व उपचारांमुळे वंधत्वाचे मूळ कारण असलेला रोग वाढू शकतो किंवा शस्त्रक्रियेमुळे झालेली शोथ प्रक्रिया व बंध इत्यादींमुळे मूळ प्रश्न जास्त गुंतागुंतीचा व अवघड होऊ शकतो.

याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे जोडप्याचे सर्व लक्ष या एकाच प्रश्नाभोवती केंद्रित होऊन मूल नसण्याच्या तक्रारींचे, काहीही करून मूल हवेच, या ध्यासात हळूहळू रूपांतर होऊ शकते. जीवनाच्या निरनिराळ्या अंगांचे आणि मिळालेल्या गोष्टींचे तौलनिक महत्त्व जाणण्याची क्षमता कमी होऊन या एकाच गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व दिल्याने बहुधा दुःख व निराशा वाट्याला येऊ शकते.

यासाठी तपासण्या व उपचार कमीत कमी आवश्यक तितकेच करणे, आवश्यक तितक्या कालावधीपर्यंतच करणे आणि योग्य वेळी थांबणे आवश्यक असते. परंतु हे करतानाच योग्य, स्पष्ट परंतु आशावादी सल्ला देणेही महत्त्वाचे असते (वीर्यात शुक्राणूंचा अभाव व दोन्ही अंडवाहिन्या पूर्ण बंद असे तपासण्यांचे निकाल असलेल्या जोडप्यांतही हे महत्त्वाचे आहे कारण तपासण्यांचे निकाल चुकीचे असू शकतात, तसेच आत्मविश्वास व आत्मसन्मान गमावणे, निराशा व घटस्फोट इ. दुःखद शेवट निराशाजनक सल्ल्यामुळे विनाकारण होऊ शकतात). तसेच वस्तुस्थितीचे यथायोग्य विवेचन करताना जोडप्यातील एकाच्या दोषामुळे वंधत्व आहे या प्रकारची दोषारोप करणारी भाषा वैद्यांकडून वापरली जात नाही.

दत्तविधान

वंध्यत्वाच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मूल दत्तक घेण्याकडे सावधपणे पाहिले पाहिजे व त्याबाबत फार मोठी मतभिन्नता आहे. त्यामुळे विशिष्ट जोडप्याचा या बाबतीतील दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. मूल दत्तक घेण्याचा सल्ला वैद्याने देण्याचा नसून जोडप्याने स्वतःहून ही सूचना केल्यास त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांची तटस्थ चर्चा वैद्य करू शकतो. त्या जोडप्यास पुढे स्वतःचे मूल होण्याची शक्यता असते हा मुद्दा या चर्चेत सांगणेही महत्त्वाचे असते. एरवी मूल दत्तक घेणे हा जोडप्याचा वैयक्तिक निर्णय असतो व ती कायदेशीर बाब असून वैद्यकीय उपचारांच्या कक्षेबाहेरील गोष्ट आहे. [⟶दत्तक].

आर्युर्वेदीय वर्णन

जन्मतः स्त्री शुक्रधातूच्या दृष्टीने असार असली व तिच्या असारत्वाची चिकित्सा झाली नाही, तर योनीची व गर्भाशयाची वाढ नीट होत नाही. अशा स्त्रीला गर्भधारणा होत नाही. ती वांझ असते.

अशा स्त्रीचा असार शुक्रधातू बलवान व्हावा आणि त्याच्या वृद्धीने जननेंद्रियाची वाढ चांगली व्हावी ह्याकरिता शुक्रवृद्धीची (वाजीकरण) औषधे तिला द्यावीत [⟶वाजीकरण]. अर्थात आयुर्वेदाचा एक नियम ह्याही ठिकाणी लक्षात ठेवावा, योग्य तऱ्हेने शरीराची वामके, रेचके इ. देऊन शुद्धी करून दिली पाहिजे.

वात, पित्त व कफ ह्या प्रत्येक दोषाने, दोन दोन दोषांनी, तिन्ही दोषांनी आणि रक्त दृष्टीने दुष्ट असेल, तर स्त्रीबीज उत्पन्न होत नाही म्हणून ती वांझ असते. ह्यांपैकी एकेक दोषांनी दुष्ट व रक्ताने दुष्ट जे रज असते त्या स्त्रियांचे दोष नाहीसे होऊ शकतात. शरीर शुद्धी करून घेतल्यानंतर दोषांना अनुसरून योनी-धावने वापरावीत, त्याच प्रमाणे औषधांच्या चटण्या किंवा काढ्यांमध्ये भिजविलेले कापसाचे बोळे योनीत ठेवावेत, त्याचप्रमाणे त्याच औषधांचा बस्ती योनीमध्ये द्यावा.

योनिरोग : वीस तऱ्हेचे योनिरोग सांगितले आहेत, त्या रोगांनी पीडित स्त्रीला गर्भधारणा होत नाही, त्या रोगांची चिकत्सा दोष-दुष्यांना अनुसरून करावी. [⟶ स्त्रीरोग व कौमार भृत्य].

शुक्रधातूची चिकित्सा : वरील रजोविकारात व योनिविकारात शुक्रधातूही विकृत होतो तेव्हा शुक्र दोषहर ती ती औषधे द्यावीत. नंतर गर्भस्थापन औषधांचा उपयोग करावा. गोरखचिंच, ब्राम्ही, शतावरी, दुर्वा, लक्ष्मणा, गुळवेल, हिरडा, कुटकी, गव्हला व बला (चिकणा) ह्या वनस्पतींचा उपयोग नंतर करावा. वर सांगितल्याप्रमाणे गर्भाधान करणारे वाजीकर योग द्यावे.

आहार

वात दुष्ट रज असलेल्या स्त्रियांना साळीचा भात, मद्य, मांसरस द्यावे. कफ दुष्ट रज असलेल्या स्त्रियांना जव, मद्य ही द्यावीत, पित्त दुष्ट रज असलेल्या स्त्रियांना साळीचा भात, दूध साखर ह्यांचा आहार द्यावा.

---------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate