स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा असल्याने आणि स्तनपानात त्यांचे प्रत्यक्ष काम असल्याने निरनिराळे आजार होतात. स्तनाची रचना म्हणजे संत्र्याप्रमाणे अनेक कप्पे असून त्यात मुख्यतः चरबी व दूध निर्माण करणा-या ग्रंथी असतात. प्रत्येक कप्प्यात दूध बोंडाकडे आणणारे दुग्धवाहिन्यांचे जाळे असते. दूध निर्माण करण्याची क्रिया स्तनपानाच्या काळात अखंडपणे वर्ष-दीड वर्ष चालू असते. यात मुख्यतः तीन प्रकारचे आजार आहेत. (1) दुधाच्या गाठी व जंतुदोष-गळू, इ., (2) स्तनांमधल्या साध्या गाठी, (3) स्तनांचा कर्करोग.
बोंडाला चीर पडली असेल तर दुखरेपणामुळे त्या बाजूला कमी पाजले जाते. यामुळे दुधाची गाठ बनू शकते व त्यात जंतुदोष होऊ शकतो.
कधीकधी एखाद्या स्तनातले किंवा स्तनाच्या भागातले दूध बाहेर न पडता आतच राहते. इथे आधी दुधाची गाठ तयार होते. या दुधाच्या गाठी सुरुवातीला मऊ असतात,पण चार-पाच तासांतच फुगून घट्ट होतात. दुधाची गाठ असून स्तन पिळून दूध काढले नाही तर त्यात बाहेरून जंतू शिरून गळू तयार होते.
एकदा जंतुदोष झाला, की त्या बाजूचा स्तन आकाराने मोठा व कडक होतो. या स्तनावर गरमपणा व दुखरेपणा आढळतो. दोन-तीन दिवसांत गळवावरची त्वचा ताणली जाते आणि आतल्या पुवामुळे तिथे पांढरटपणा दिसतो, जर गळू आत खोलवर असेल तर मात्र असा पांढरटपणा कदाचित आढळणार नाही. एकदा पू झाल्यावर शस्त्रक्रिया करून पू बाहेर काढणे आवश्यक असते.
स्तनपान चालू असताना स्तनात अशा गाठी व जंतुदोष होऊ शकतो. दुधाची गाठ होणे ही थोडी टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. यासाठी दोन्ही बाजूंना पाजणे व राहिलेले दूध रोज पिळून काढणे आवश्यक असते.
अर्भक मृत्यू झाल्यास औषधाने दूध येण्याचे बंद करता येते. (स्टिलबेस्ट्रॉल गोळी सकाळी-सायंकाळी एकेक याप्रमाणे पाच दिवस ) अशा वेळीही उरलेल्या सर्व दुधाचा निचरा होणे आवश्यक असते.
या गाठी सहसा मध्यम वयात येतात. त्या आकाराने हळूहळू वाढतात. स्तनामध्ये ही गाठ बोटाने धरण्याचा प्रयत्न केल्यास ती हातातून सटकते. पण ही साधी गाठ आहे, की कर्करोगाची आहे हे ठरवणे अवघड असते. त्यासाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे चांगले. स्तनाच्या कर्करोगाचे निदान उशिरा झाले तर पुढे उपचार जास्त किचकट होतात.
हाताला टणक लागणारी आकाराने वेडीवाकडी असलेली व न दुखणारी गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असते. काही काळानंतर ही गाठस्तनाखालच्या स्नायूंपर्यंत पोचते. मग ती स्नायूंमध्ये मूळ धरते. कधीकधी वरच्या त्वचेलाही ही गाठ चिकटते. याबरोबरच त्या बाजूच्या काखेत कर्करोगाचे अवधाण येते. या गाठीही टणक लागतात. या अवस्थेत शस्त्रक्रिया करणे अवघड असते व तसे फायद्याचे नसते. कर्करोग नुसत्या गाठीच्या अवस्थेतच शोधणे आवश्यक असते. स्नायूंपर्यंत किंवा अवधाण येण्यापर्यंत वाढ झाल्यास जीवनाला आज ना उद्या धोका असतो. जवळजवळ निरुपाय होतो. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे शस्त्रक्रिया, रासायनिक औषधे, किरणोपचार करावे लागतात.
स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांसाठी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. पण वाईटात चांगले म्हणजे आपण तो लवकर शोधून काढू शकतो.
हा कॅन्सर स्त्रियांना 35-55 या वयात होण्याची शक्यता असते. याची कारणे पुढीलप्रमाणे - स्थूलता म्हणजे चरबी वाढणे, स्तनभार जास्त असणे, खाण्यामध्ये तेल-तूप जास्त असणे,संततीप्रतिबंधक गोळ्यांचा दीर्घ वापर, अपत्य नसणे. यात काही आनुवंशिक कारणेपण असतात.
ज्या स्त्रिया एकूणच स्तनपान कमी करतात त्यांना कर्करोगाचा धोका थोडा जास्त असतो.
स्तन-कर्करोगाचे उपचार
स्तन कर्करोगाचा प्रकार आणि प्रसार यावर उपचार अवलंबून असतात. आपले डॉक्टर याबद्दल योग्य तो सल्ला देतील. इथे याबद्दल थोडी माहिती घेऊ या.
सर्व स्त्रियांनी स्वत:च्या स्तनांची तपासणी करायला शिकायला पाहिजे. आपण आपली तपासणी पाळीनंतर चार-पाच दिवसांनी करावी. किंवा तपासणी महिन्याच्या ठरावीक तारखेला करावी. शंका आल्यास डॉक्टरांना भेटावे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/16/2020
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...