स्त्रियांचे आरोग्य आणि आजार हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या समाजातील स्त्रियांच्या उपेक्षेमुळे जन्माआधीपासूनच स्त्रीची परवड सुरु होते. आता लिंगनिदानावर बंदी आहे,तरीही स्त्रीगर्भ असला तर तो काढून टाकणे, मुलगा असेल तरच गर्भ वाढू देणे हे चालूच आहे. येथपासूनच स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला सुरुवात होते. मुलगा जन्माला आला तर ठीक, मुलगी झाली तर आईही तोंड फिरवते. मुलगी झाली हे नवराबायको अनिच्छेने सांगतात.
मुलगा झाला तर मात्र आनंदाने जगजाहीर करतात. जन्मानंतर मुलीची उपेक्षाच सुरु होते. खाण्यापिण्याकडे, आजारांकडे थोडे दुर्लक्ष व्हायला लागते. मुलाच्या ताटात साय तर मुलीकडे खालचे पातळ दूध अशी ही माया असते. शिक्षणात मुलांचा विचार आधी. घरकामाच्या वेळी मुलगा बसून तर मुलगी अवखळ वयातच घाण्यास जुंपली जाते. आईबापांच्या घरी सुरु झालेली ही उपेक्षा सासरी तर आणखी वाढत जाते. घरात कामाला सर्वात आधी उठणे, सर्वात नंतर झोपणे, सर्वांचे जेवून झाल्यावर उरलेले अन्न, शिळे अन्न वाढून घेणे, आजार अंगावर काढणे व पोराबाळांची काळजी ह्या सर्व गोष्टी सहजपणे स्त्रियांवर येऊन पडतात. दुर्दैवाने संसार मोडून माहेरी माघारी जायची पाळी आली तर माहेरी तसेच हाल होतात. स्त्री-पुरुषांच्या लग्नातील वयाच्या पाच-सहा वर्षाच्या अंतरामुळेच बायकोच्या आधी नवरा म्हातारा होतो, थकतो पण कष्टाने तेवढीच थकलेली बाई मात्र शेवटपर्यंत त्याची सेवा करीत राहते. थोडक्यात, ती शेवटी जेव्हा जाईल तेव्हाच सुटते.
अशी ही विषम सामाजिक परिस्थिती वैद्यकीय बाबतीतही लागू आहे. कुपोषणाने,उपेक्षेने स्त्रियांच्या आरोग्याचा दर्जा कमी राहतो. वजन, उंची हे तर कमी राहतातच, पण बहुतेक सर्व वयोगटांत स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. खरे तर शारीरिक स्नायू बळाचा अपवाद सोडला तर जीवशास्त्रीय दृष्टया स्त्रिया अधिक काटक असतात. परंतु अन्यायी समाजव्यवस्थेमुळे लोकसंख्येत पुरुषांच्या मानाने स्त्रियांची संख्या कमी असते, (भारतात दर हजार पुरुषांमागे फक्त 933 स्त्रिया असे प्रमाण आहे.)
औषधोपचाराच्या बाबतीत काही गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. एक तर नेहमीच्या आजारांच्या बाबतीत स्त्रिया डॉक्टरकडे पुरुषांच्या मानाने कमी जातात. अनेक कारणांनी स्त्रिया जास्त प्रमाणात दुखणी अंगावर काढतात. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचे आजार- जननसंस्थेचे आजार, गरोदरपण व बाळंतपणाशी संबंधित आजार- हे मोठया प्रमाणात आढळतात. तरीही चांगल्या सोयी तालुका पातळीवरही अभावानेच आहेत. तालुकापातळीवरच्या डॉक्टरांपैकी असला तर एखादाच या विषयाचा तज्ज्ञ असतो. मागास जिल्ह्यांमध्ये परिस्थिती जास्तच बिकट आहे. पाण्याच्या सोयीही अभावानेच आढळतात.
या सर्व परिस्थितीमुळे स्त्रियांच्या खास आजारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे आजार ओळखणे, पुरेसे योग्य उपचार आणि योग्य वेळी तज्ज्ञाकडे पाठवणे ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्त्रियांची ही दुखणी बहुधा स्त्रियांनाच सांगितली जातात. त्यामुळे प्रशिक्षित नर्स किंवा आरोग्यसेविका हे काम योग्य प्रकारे करू शकेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...