অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्त्रीजननसंस्था आजार व आयुर्वेद

स्त्रीजननसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये आयुर्वेद उपयुक्त ठरतो. विशेषतः योनिदाह, श्वेतप्रदर,गर्भाशयमुखाची सूज,गर्भाशय बाहेर पडणे (प्रारंभीची अवस्था) या आजारांमध्ये आयुर्वेदिक उपचाराने चांगला गुण येतो असा अनुभव आहे.

आयुर्वेदातल्या त्रिदोष विचारपध्दतीचा वापर करून आजार नीट समजावून घेतले तर उपचार अधिक अचूक ठरतात. म्हणून जिथे सहज शक्य आहे तिथे आपण कफ-वात-पित्त दोषांचाही विचार करू.

स्त्रियांच्या विशेष आजारांपैकी इथे आपण योनिदाह, गर्भाशयमुखाची सूज, गर्भाशय उतरणे, लघवीस जळजळ, पाळी जास्त जाणे, इत्यादी आजारांचा विचार करीत आहोत.

आजारांवर उपचार करताना योनिधावन, स्नेहपिचू (तेलबोळा) या स्थानिक उपचारांबरोबरच पोटातून काही औषध देणे उपकारक असते. शक्य असेल तेव्हा पोटातून औषधे देण्यास विसरू नये. पण केवळ स्थानिक उपचारांनीही बराच फायदा होतो. योनिधावन व स्नेहपिचू या उपचारपध्दतीची प्रथम माहिती करून घेऊ या.

योनिधावन

योनिधावन म्हणजे योनिमार्ग धुणे. धुण्यासाठी औषधी काढे तयार करून घ्यावे लागतात. सोसवेल तितका गरम काढा गाळून घेऊन एनिमाच्या पध्दतीनुसार योनिद्वारातून योनिमार्गात सोडून धावन केले जाते. धावनाने स्वेदन होते, योनिमार्गाची स्वच्छता होते व शेकाने आराम वाटतो. योनिधावन आठवडयातून एक-दोन वेळा करावे व नंतर स्नेहपिचू (बोळा) बसवावा. योनिधावनासाठी लागणारे काढे निरनिराळया वृक्षांच्या आंतरसाली किंवा इतर काही वनस्पतींचा वापर करून बनवायचे असतात. निरनिराळया आजारांसाठी निरनिराळया वृक्ष-वनस्पती सुचविल्या आहेत.

स्नेहपिचू (तेलबोळा)

स्नेह म्हणजे तेल, आणि पिचू म्हणजे बोळा. स्वच्छ कापसाचा किंवा स्वच्छ मऊ फडक्याचा बोळा घेऊन तो तेलात पूर्णपणे भिजल्यावर आत ठेवावा. बोळा आत ठेवताना हात स्वच्छ धुतलेले असावेत. कापूस व तेलही बंद बाटलीतील असावे. तिळाचे तेल उत्तम. बलातेल किंवा सहचरतेलासारखे औषधी तेल असल्यास उत्तम. पण हे नसल्यास शेंगदाणा,मोहरी, सोयाबीन, खोबरेल कोणतेही तेल चालेल. उघडया भांडयात ठेवलेले तेल वापरु नये. बोळा लघवीनंतर ठेवावा. साधारण दोन ते तीन तास म्हणजे पुन्हा लघवी होईपर्यंत ठेवावा. त्यानंतर काढून फेकून द्यावा.

बस्ती

ओटीपोटाच्या अनेक दुखण्यांसाठी गुदाशयात तैलबस्ती उपयोगी पडते. गर्भाशय बाहेर पडण्याची प्रवृत्ती, पाळी न येणे, पाळीच्या अनेक तक्रारी, गर्भाशय मागे झुकल्यामुळे होणारा त्रास, इ. अनेक दुखण्यांमध्ये बस्तीचा चांगला उपयोग होतो. यासाठी बला तेल किंवा सहचर तेल किंवा तीळ तेल 25-50 मि.लि. दिले जाते. बाळंतपणाआधी महिनाभर तैलबस्ती दिल्यास बाळंतपण सोपे होते असा अनुभव आहे.

योनिदाह

योनिदाहाच्या लक्षणांप्रमाणे आयुर्वेदात प्रकार पाडलेले आहेत. वातज, पित्तज, कफज या प्रत्येक प्रकारासाठी वेगळे उपचार तक्त्यात दिले आहेत. योनिदाहाच्या तीव्रतेप्रमाणे योनिधावन व स्नेहपिचू रोज किंवा आठवडयातून एक-दोन वेळा करावे. पोटातून औषधे आठवडा किंवा पंधरा दिवसपर्यंत रोज घ्यावीत.

गर्भाशयाच्या तोंडावर सूज, लाली व खरबरीतपणा

धावन (स्थानिक चिकित्सा)

ज्येष्ठमध+अनंतमूळ दोन्ही प्रत्येकी दोन ग्रॅम जाडसर पूड घेऊन काढा करावा. याऐवजी जांभूळ+ आंबा+उंबर यांच्या आंतरसालीचा एकत्र काढाही चालेल. या काढयाने धावन करावे. आठवडयातून एकदा याप्रमाणे दहा आठवडे उपचार करावेत. प्रत्येक धावनानंतर (तीळ तेल + एरंड तेल, असल्यास बला तेल, सहचर तेल) स्नेहन करावे. याबरोबर पोटातून ज्येष्ठमध, अनंतमूळ, मंजिष्ठा वंगमिश्रण यांची प्रत्येकी एक गुंज एकत्र केलेली पूड वापरावी. ही पूड दिवसातून तीन वेळा (प्रत्येक वेळी चार गुंजा) रोज याप्रमाणे महिनाभर द्यावी. हे मिश्रण दुधाबरोबर द्यावे.

बला तेलामध्ये मुख्यतः बला (म्हणजे चिकणामूळ) ही वनस्पती असते. बला तेल तयार करणे जरा जिकिरीचे काम आहे पण ते शिकता येईल. पण हे शक्य नसल्यास चिकणमूळाची एक काडी-(ओली किंवा वाळलेली) उकळून काढा पोटातून द्यावा किंवा ज्येष्ठमधाबरोबर धावनासाठी वापरावा.

स्नेहनासाठी तीळ तेल + एरंड तेल समभाग घेऊन बोळा ठेवावा. पोटातून औषध घेण्याबरोबर स्थानिक (म्हणजे योनिमार्गाची) चिकित्सा आवश्यक असते.

पोटात घेण्यासाठी

  • शतावरी + अनंतमूळ + गोखरू चूर्ण (प्रत्येकी अर्धा चमचा पावडर) किंवा
  • गुळवेल सत्त्व + प्रवाळभस्म दूधसाखरेबरोबर (अर्धा चमचा प्रत्येकी) किंवा
  • ज्येष्ठमध व अनंतमूळ पावडर दोन चमचे प्रत्येकी (दूधसाखरेबरोबर) किंवा
  • तीन कप उकळत्या पाण्यात ज्येष्ठमध, शतावरी, अनंतमूळ पावडर टाकून झाकून ठेवावी, पाच-सात मिनिटांनी वरील निवळ पाणी दिवसभर थोडेथोडे घ्यावे.

गर्भाशय खाली उतरणे, अंग बाहेर पडणे

या आजाराच्या सुरुवातीची अवस्था (पहिली अवस्था किंवा तरुण वय असेल तर दुसरी अवस्थाही) उपचाराने बरी होऊ शकते. यापेक्षा जास्त आजार असेल तर शस्त्रक्रिया हाच उपाय असतो.

औषधी धावन, स्नेहन, आसने, व्यायाम व पोटातून औषधे असे एकत्रित करून अनेक स्त्रियांना आराम मिळतो असा अनुभव आहे.

धावन व स्नेहपिचू

धावनासाठी जांभूळसाल + उंबरसाल (आतली साल) वापरावी. गर्भाशय जास्त खाली उतरले असल्यास लोध्र व हळद प्रत्येकी तीन गुंज वस्त्रगाळ पावडर करावी. ही पूड स्वच्छ सुती फडक्यात बांधून तीळ-तेलात बुडवून योनिमार्गात बोळा ठेवावा. हा बोळा झोपताना ठेवावा व सकाळी काढून टाकण्यास सांगावा. याप्रमाणे 15 दिवस ते एक महिना रोज करावे.

आसने

या आजारावर दोन आसने उपयुक्त आहेत. एक (अवनतशिरस्कासन) म्हणजे कोपरे व गुढगे यावर टेकून कमरेचा भाग वर उचलून या स्थितीत दोन मिनिटे राहण्यास सांगावे. रोज सकाळी व सायंकाळी हे आसन नियमित आणि कायम केल्यास फायदा होतो. यानंतर वज्रासन करून गुदभाग आवळण्याचा व्यायाम सांगावा.

औषधोपचार

1. पोटातून अशोकाच्या आंतरसालीचा काढा व निकाढा सकाळ-सायंकाळ याप्रमाणे दोन महिने रोज द्यावा. किंवा

2. पोटातून जांभूळसालचूर्ण + लोध्रचूर्ण सकाळ-दुपार-संध्याकाळ द्यावे किंवा

3.आंबा, वड, जांभूळ, पिंपळ यांच्या आंतरसालीचे चूर्ण किंवा पानाचे चूर्ण करून द्यावे.

मूत्राशयदाह, लघवीस जळजळ होणे

1. वाळा, चंदन, नागरमोथा यांचे पाणी उकळून द्यावे.

2. जिरे उकळून (चहाप्रमाणे) ते पाणी साखर घालून थोडे थोडे घ्यायला सांगावे.

3. दुर्वांचा रस, एक चमचा खडीसाखर किंवा तूप टाकून द्यावा.

4. गोखरूचे कुटलेले काटे 5 ग्रॅम + पुनर्नवा (पूर्ण वनस्पती) पाच ग्रॅम एकत्र 6 कप पाण्यात उकळून अर्धा कप पाणी उरवावे. हा काढा सकाळी उठल्यावर द्यावा चोथा टाकून न देता संध्याकाळी उकळावा (निकाढा) व रात्री झोपताना द्यावा. याप्रमाणे 15 दिवस रोज करावे.

5. तांदुळाचे धुवण साखर घालून द्यावे.

6. अनंतमूळ, आवळकाठी, उसाची किंवा भाताची मुळे यांचा काढा साखर घालून द्यावा.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate