অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'नॅनो' पवनचक्‍कीतून होतेय घरासाठी वीजनिर्मिती

जळगाव

भरमसाट येणारे वीजबिल व दिवसेंदिवस वाढणारे भारनियमन, यामुळे आज सर्वच जण त्रस्त आहेत. जळगावमधील शिक्षक आणि संशोधक असलेल्या सतीश पाटील यांनी यावर मात करत उपाय शोधून काढला आहे. त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर पवनचक्की तयार केली. यातून वीजनिर्मिती होऊन पाटील यांच्या घराचे वीजबिल निम्म्यावर आले आहे. त्यांनी ही पवनचक्की टाकाऊ वस्तूंपासून तयार केली आहे.
सतीश पाटील यांनी घरगुती पवनचक्की तयार करण्यासाठी सुरवातीला इंटरनेटमधून माहिती मिळविली. इलक्‍ट्रिकलचे थोडे ज्ञान असल्याने त्यांना हे शक्‍य वाटू लागले. मोठी अडचण होती ती सुट्या भागांची. यावरही मात करत त्यांनी पवनचक्कीला लागणारे पाते पीव्हीसी पाइप कापून बनवले; तर जनरेटरसह काही भाग मुंबई आणि जळगावच्या भंगार बाजारातून मिळविले.

अशी आहे रचना

तारेच्या वेटोळ्यात चुंबक फिरवल्यास त्यामध्ये विद्युत शक्ती निर्माण होते, हा सिद्धांत त्यांनी यात वापरला आहे. जळगाव जिल्ह्याचा वाऱ्याचा वर्षभराचा सरासरी वेग पाच ते दहा किलोमीटर एवढाच आहे. वाऱ्याने पवनचक्कीचे पाते फिरतात. त्यामुळे दोन चुंबकांमध्ये तारांचे वेटोळे फिरते. त्यामधून विजेचा "एसी' प्रवाह तयार होतो. तो "डीसी'मध्ये रूपांतरित केला जातो. हा प्रवाह बॅटरीमध्ये साठविला जातो. नंतर इन्व्हर्टरकडे दिला जातो.

दहा हजारांचा खर्च

दिवसभरात दीडशे अँपिअरची बॅटरी आठ तासांत पूर्ण चार्ज होते. पवनचक्कीतून येणारा प्रवाह एसी प्रकारचा १८ होल्टपासून ५० व्होल्टपर्यंत असतो. साधारण: एका तासात ३०० वॉट या दराने प्रवाह वाहतो. ही ऊर्जा २३० व्होल्टमध्ये रूपांतरित झाल्यानंतर त्यावर घरातील ट्यूब, पंखे, टीव्ही, मिक्‍सर अशी सर्व उपकरणे चालतात. यासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च आल्याचे पाटील यांनी सांगितले.

टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती

पवनचक्की आणि त्याला लागणारी उपकरणे प्रत्येकाला घरीच तयार करणे शक्‍य असल्याचे पाटील म्हणाले. त्यासाठी अडगळीत पडलेले पाइप चक्कीचे ब्लेड बनविण्यास वापरात येतात. भंगारमध्ये पडलेले अँगल सहज उपलब्ध होतात. जुने बंद पडलेले जनरेटर तांब्याच्या तारा आणि चुंबक वापरून सुरू करता येऊ शकते. या सर्वांची योग्य रीतीने जोडणी केली, तर पवनचक्की घरी तयार करू शकतो. ही साधने मिळाली, तर हा खर्च आणखी कमी करता येऊ शकतो.

पाटील यांचे यशस्वी प्रयोग

संशोधक वृत्ती असलेल्या सतीश पाटील यांनी आजवर अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी घशाच्या ऑपरेशनसाठी तयार केलेल्या "ब्रांकोस्कोप'ला पेटंटही मिळाले आहे. तसेच "इ-बॅग', जवानांसाठी विशिष्ट प्रकारचे हेल्मेट, इलेक्‍ट्रॉनिक जॅक, कैरी फोडण्याचा विशिष्ट प्रकारचा सुडा, पीव्हीसी पाइपचा तराफा असे प्रयोग यशस्वी करून दाखविले आहेत.

  • पवनचक्कीमुळे वीजबिल निम्म्यावर
  • आठ तासांत होते बॅटरी पूर्ण चार्ज
  • दहा हजारांत तयार होते पवनचक्की
  • टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती
  • विजेवर चालतात सर्व उपकरणे

संशोधक सतीश पाटील
भ्रमणध्वनी क्रमांक : 9422618324
ई-मेल : astrosatish@gmail.com


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate