पाणी अडवण्यासंबंधीच्या (वॉटरशेड) कार्यक्रमांमुळे पर्यावरणाचे संरक्षण तर साधतेच शिवाय संबंधित समाजाला त्याचा आर्थिक लाभही मिळतो. मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील भग्रोडा खेड्यामध्ये वॉटरशेड प्रकल्पाचे काम २००६ साली सुरू झाले. एकूण १२७५ हेक्टर क्षेत्र ह्याखाली आले आणि ह्यासाठी ६५.०३ लाख रुपये खर्च झाला. प्रकल्पाच्या चार वर्षांमध्ये, ४३ लाख रूपये खर्च करून, ६ पाझर तलाव, ५ तलाव, १० दगडी बंधारे आणि ६००० समपातळीतील चर (कांटूर ट्रेंचेस्) बांधले गेले तर ५७००० झाडे लावली गेली तसेच १० हेक्टर क्षेत्रावर चार्याची (गवत) लागवड केली गेली.
पाणी वाचवण्याच्या उपायांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे – २००५ साली ६५ मीटर खोल खणल्यावर लागणारे पाणी आता २०१० मध्ये ४३ मीटर खोलीवरच मिळते. जलसंधारण समितीमध्ये १२ सदस्य आहेत (त्यांपैकी ३ महिला आहेत). हे सदस्य ग्रामपंचायतीसोबत काम करून प्रकल्पातून निर्माण केलेल्या मालमत्तेची निगराणी करतात तसेच वेळोवेळी भेटून चालू कामाचा आढावा घेतात आणि भविष्यातील योजना ठरवतात. भग्रोडामध्ये असलेल्या १३ हातपंपांना आता वर्षभर पाणी असते – ह्यापूर्वी ४-५ हातपंप मार्चनंतर कोरडे पडायचे. खेड्यातील महिला आता आनंदाने सांगतात "ह्या भागातल्या जलसंधारण प्रकल्पामुळे मे-जून महिन्यांत २ किलोमीटर दूर असलेल्या विहिरीमधून पाणी आणण्याचा आमचा त्रास वाचला आहे".
जलसंधारण प्रकल्पाला हातभार लावण्याच्या उद्देशाने जुन्या तलावांची डागडुजी करण्यासाठी खेडुतांनी 'राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या'चा (नरेगा) (NREGA) आधार घेतला आहे. भग्रोडाजवळच्या सेम्रीखुर्द नावाच्या खेड्यामध्ये असाच एक जुना तलाव होता. त्या भागात वजन असलेल्या मुंगियाबाईने तो बांधला होता. कित्येक वर्षांच्या दुर्लक्षामुळे त्यामध्ये गाळ साठून तो निरुपयोगी बनला होता. ह्या वर्षाच्या सुरूवातीला ग्रामपंचायतीने त्यामध्ये सुधारणा करण्याचे ठरवले. कारण त्याचा वापर गुरांना पाणी पिण्यासाठी तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी होऊ शकत होता. नरेगा (NREGA) अंतर्गत मजुरी करून लोकांनी त्या तलावास त्याचे पूर्वीचे वैभव मिळवून दिले तर ग्रामपंचायतीने त्याआसपास झाडे लावण्याचा खर्च केला व अशा रीतीने जमिनीची संभाव्य धूप रोखली.
जलसंधारण समितीचे सदस्य असलेले श्री. बिजेश पटेल हे स्वतःही शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात भात (तांदूळ) लावला आहे. ते सांगतात "इतके दिवस, खरीप हंगामात, मी माझ्या शेतात सोयाबीन लावत असे आणि रब्बी हंगामात कडधान्ये – कारण मला पाणी कमी पडायचे. परंतु आता, माझ्या खेड्याच्या आसपास पाझर तलाव आणि बंधारे बांधल्यानंतर, माझ्याकडील बोअरवेल मधून वर्षभर पाणी मिळते. मी आता रब्बी हंगामात गहू लावतो आणि ह्यावर्षी अर्ध्या एकरात तांदूळही लावला आहे." बिजेशला अर्ध्या एकरातून १५ क्विटंल 'उषा बासमती'चे उत्पन्न मिळाले आहे. ह्याची बाजारातील किंमत ३०,००० रुपये आहे (२००० रु. प्रति क्विंटलप्रमाणे). आपले उत्पन्न वाढवण्यासाठी आणखी तांदूळ लावण्याचा त्यांचा विचार आहे.
स्रोत : http://www.cseindia.org
अंतिम सुधारित : 4/22/2020
औद्योगिक वातावरणविज्ञान हि वातावरण विज्ञानाची एक श...
बेभरवशाचा नि बेमोसमी पाऊस... पर्यावरणाचा बिघडत चाल...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
जलस्वराज्य आणि इतर वन्यप्राण्यांचा वाटा काढणारे र...