অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाठीवरचा ऊर्जास्त्रोत

सोलर बॅकपॅक

येत्या काही वर्षामध्ये जगातील ऊर्जास्त्रोत मानवाला अपुरे पडतील असं भाकीत अनेक तज्ज्ञ-शास्त्रज्ञांनी खूप आधीच करून ठेवलं आहे. तसं घडतानाही दिसत आहे. त्यामुळेच ऊर्जास्त्रोतांना वाचवण्यासाठी, नसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा अधिकाधिक वापर करून अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांची बचत करण्याचे दिवस आले आहेत. याकामी आपल्याला मोठा आधार आहे तो सौरऊर्जेचा. म्हणूनच सौरऊर्जेवर चालणा-या अनेक उपकरणांनी बाजारात प्रवेश केला आहे. त्यातलं सध्याचं लक्ष वेधून घेणारं उत्पादन आहे सोलर बॅकपॅक.

नेहा वाइल्ड लाइफ रिसर्चर आहे. अनेकदा फील्डवर्कसाठी तिला कित्येक दिवस-रात्री जंगलात काढाव्या लागतात. अशा वेळी मोठी समस्या असते ती उपकरणांच्या चार्जिगची. परंतु सोलर बॅकपॅकने तिची ही अडचण सोडवली. वारंवार ट्रेकिंग व सहलींना जाणा-या विशाललादेखील नेहमी कितीतरी वेगवेगळे चार्जर जवळ बाळगावे लागायचे, ज्याचा त्याला खूप कंटाळा यायचा आणि ओझंही वाढायचं. आजकाल मिळणारी सोलर बॅकपॅक त्याला जणू वरदानच ठरली. सोलर बॅकपॅकहा एक स्मार्ट प्रकार अलीकडे विशेषत: तरुणांमध्ये खास लोकप्रिय झाला आहे. परदेशात तर या सोलर बॅकपॅक म्हणजे पाठीवर घेण्याच्या बॅग खूपच प्रसिद्ध आहेत. त्या आता भारतातही मिळू लागल्या आहेत. ल्युमोससारख्या काही कंपन्या स्वत: या सोलर बॅकपॅक बनवून इथं व परदेशातही विकत आहेत. काही परदेशी कंपन्यांच्या सोलर बॅकपॅक या ऑनलाइन विकत घेता येतात. यातलं तंत्रज्ञान अगदी सोपं असतं. सोलर फॅब्रिकची आणि सोलर पॅनेल बसवलेली ही सॅक (sack) असते, ज्यात लिथिअम-इऑनची बॅटरी (battery) असते, जी सोलर पॅनेल (panel) द्वारे चार्ज होते. शिवाय काही सोलर बॅकपॅक्समध्ये एसी ट्रॅव्हल चार्जर, यूएसबी चार्जर आणि कार चार्जरही असतो. म्हणजे या गोष्टीही चार्ज करून ठेवल्या जाऊ शकतात. शिवाय अतिरिक्त स्टोअरेजसाठी काही सोलर बॅकपॅक्समध्ये ही बॅटरी नेहमीप्रमाणे विजेने चार्ज करण्याची (भारित करण्याची) देखील सोय असते. सोलर बॅकपॅकद्वारे मोबाइल, कॅमेरा, लॅपटॉप, संगीत ऐकण्याची उपकरणं वगरे चार्ज केले जाऊ शकतात.

सोलर बॅकपॅकचा सर्वात मोठा उपयोग प्रवासात, तर होतोच शिवाय विजेवर चार्ज करताना होणारं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाणही कमी होतं. म्हणजे पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त. शिवाय दर वेळी चार्जर बिघडला की नवीन घ्यायचाही त्रास नाही आणि ऊर्जा बचत होते ती वेगळीच. या चार्जरच्या किमती ५ ते २५ हजारांपर्यंत आहेत. वास्तविक या किमती बॅगच्या आकारावर व त्यातील बॅटरीच्या वॉट्सवर अवलंबून असतात. खेरीज त्यात चार्जिगचे किती विविध प्रकार उपलब्ध आहेत त्यावरही दर अवलंबून असतात. उदाहरणार्थ ४ ते १५ वॉट असे यातील बॅटरीचे प्रकार असतात. त्यात लॅपटॉप चार्जिगसारख्या काही सोयी असतील तर किंमत आणखीच वाढते.

आता प्रश्न उपस्थित होतो की शहरातच राहणा-या व नोकरी करणा-या लोकांनी अशी बॅकपॅक घ्यावी की नाही, तर होय.. जरूर घ्यावी. ही एक गुंतवणूक आहे. तुम्ही २०-२५ मिनिटं उन्हात रोज चालत असाल किंवा सूर्यप्रकाश भरपूर आहे अशा ठिकाणी काम करत असाल तर सहजच या सोलर बॅकपॅकद्वारे तुम्ही तुमची उपकरणं चार्ज करू शकता व ऊर्जा-बचत करू शकता. तसं बाजारात सोलर चार्जरही मिळतात पण अख्खी बॅगच अशी असली आणि तेही अनेक फीचर्ससह तर आणखीच सोयीस्कर.

आजकाल प्रचलित असलेल्या वेअरेबल टेक्नॉलॉजी प्रकारातल्या या सोलर बॅकपॅक तरुणांना निश्चितच आवडतील अशा आणि ऊर्जा बचत करणा-या आहेत. काही सोलर बॅकपॅकमधील सोलर पॅनेल हे बॅग (bag) पासून वेगळं करता येण्यासारखं असतं, जे कधीही चार्ज करता येऊ शकतं. शिवाय हे पॅनेल दुस-या कोणत्याही बॅगला जोडतादेखील येऊ शकतं. काही बॅगांमध्ये अतिरिक्त ऊर्जादेखील साठवता येते आणि बाहेर नेली नाही तरी घरीदेखील ऊर्जा बचतीसाठी अशा बॅग्जचा वापर केला जाऊ शकतो.

तेव्हा तुम्हीसुद्धा या सोलर बॅकपॅकचा विचार करा. नवीन तंत्रज्ञान आणि विजेची बचत करणाऱ्या या बॅकपॅकमुळे निश्चितच आपल्या पर्यावरणाचंसुद्धा एक प्रकारे रक्षण करण्यास मदत होणार आहे. सध्या जरी याची किंमत थोडी जास्त असली तरी पर्यावरणाचा विचार करता ही रक्कम तशी फार नाही. ज्यांना कोणालाही बॅग घेणं शक्य आहे त्यांनी जरूर या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जीवनात करायला हवा. या अशा पद्धतीच्या संशोधनाची मानवी आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे आणि त्याची गरजही आहे, नाही का?

सोलर बॅकपॅक खरेदी करताना

  • तुमची सोलर बॅकपॅक कोणत्या कंपनीच्या मोबाइल व लॅपटॉपना चार्ज करू शकते, हे आधीच पाहून घ्या.
  • शक्यतो सोलर पॅनेल स्वतंत्र करता येऊ शकेल अशीच बॅग घ्या.
  • चार्जिगची गरज असणा-या उपकरणांचा आकार व संख्या यावर किती वॉटसची गरज लागेल ते ठरवून तशी बॅग घ्या.
  • वेगळा सोलर चार्जर नेहमी हाताशी ठेवा.
  • वॉटस आणि बॅगच्या आकारावर तिची किंमत ठरेल.

बाजारात उपलब्ध सोलर बॅगपॅक्स व त्यांच्या किमती

  • ल्युमोस अनप्लग बॅकपॅक : ५,००० रुपये
  • सॅमसोनाइट टोरस बॅकपॅक (Samsonite toras backpack) : १०, ००० रुपये
  • सनटेक सोलर लॅपटॉप बॅग : ७,०९० रुपये
  • वी थ्री सोलर बॅगपॅक्स : १,४९९ रुपये

 

स्त्रोत : प्रहार

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 10/7/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate