অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महताबेरा न्हाले भविष्याच्या प्रकाशात

महताबेरा न्हाले भविष्याच्या प्रकाशात

प्रस्तावना

महातबेरा हे भारताच्या झारखंड राज्यातील एक छोटेसे गाव आहे. झारखंडमधील बहुसंख्य लोकसंख्या आदिवासी आहे आणि शेती, पशुपालन हे त्यांचे प्रमुख व्यवसाय आहेत. अगरबत्त्या बनविणे, पत्रावळ्या बनविणे, जंगलातून वनौषधी गोळा करणे असे व्यवसायदेखील येथील लोक करतात.

महताबेरामध्ये अजून वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे येथील सामाजिक-आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. गावातील स्त्रियांना हस्तकलेच्या वस्तू बनविणे, अगरबत्त्या बनविणे, पत्रावळ्या बनविणे, वनौषधी गोळा करणे आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र त्यांची दिवसभराची कामे आटोपतानाच संध्याकाळ होते त्यामुळे त्यांना रात्रीचे मंद प्रकाशात काम करावे लागल्याने उत्पादकता कमी होते.

नवी पहाट

‘लाखो आयुष्ये उजळवूया’ ही योजना गावात जुलै, २००८ मध्ये राबविण्यात आली. सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास संघटना (SEEDS) या तळागाळात काम करणा-या संस्थेच्या मदतीने ही योजना राबविली गेली. ह्या संघटनेला ग्रामीण व्यवस्थापन, क्षेत्रीय विकासयोजना बनवणे, सामाजिक सेव, मानवी संसाधन व्यवस्थापन इ. क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव आहे.

गावात सौरदिवे आणताच गावाचा चेहरामोहराच बदलून गेला. गावातीलच एक तरूण गृहिणी सावरी तुडू तर या दिव्यांच्या प्रकाशाने हरखूनच गेली. तिला दररोज सकाळी ४ वाजता उठून नव-यासाठी जेवण बनवावे लागते कारण त्याला ५ वाजता शेजारच्या गावातील कारखान्यात काम करायला जावयाचे असते. एरवी तिला पहाटेच्या अंधुक प्रकाशात आपण पाट्यावर काय वाटतो आहोत हेदेखील दिसणे कठीण असायचे. त्यांच्या घरात एकच केरोसिनचा दिवा होत जो तिचा नवरा त्याच्या तयारीसाठी वापरत असे. तिला मात्र अंधारातच सारी कामे करावी लागत. ती म्हणते, “ अंधारात जेवण करणे खूपच धोक्याचे असते कारण तुम्ही जेवणात काय घालत आहात किंवा त्यात काही पडले आहे का हे तुम्हाला कळत नाही.” पण आता सौरदिव्याच्या उजेडात तिचे काम लवकर आणि व्यवस्थित होते आणि तिचा नवरादेखील वेळेवर घराबाहेर पडू शकतो.

उद्योजकतेचा प्रकाश

'बेजी मुर्मुने ऑल ट्रायबल बाहा' या स्वयंमदत गटातील सर्व स्त्रियांच्या साहाय्याने एक नवा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांना लाह्या, डाळी, शेंगदाणे यासारखे तयार खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सौर दिवे आल्याने त्या आता त्यांचा संध्याकाळचा वेळदेखील सत्कारणी लावू शकतात. त्यांना आजूबाजूच्या गावातून लग्नाच्यावेळी कुरमुरे बनविण्याच्या मोठ्या मागण्या येत आहेत याशिवाय कांडरा आणि गमोरिया येथील दररोजच्या बाजारातही त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. आता त्यांच्या प्रगतीत अंधाराचा अडथळा मुळीच येत नाही.

इथल्याच आदिवासींमधील एक मुलगा गणेश तुर्डू एक उपजत कलाकार आहे. तो तिथल्या शाळेत शिकतो आणि फावल्या वेळेत आणि रात्री चित्रे काढतो, मूर्त्या बनवितो, थर्माकॉलपासून शोभेच्या वस्तूदेखील बनवितो. त्याला हे सर्व शक्य झाले आहे ते सौरदिव्यामुळेच. त्याला आता आजूबाजूच्या गावांतून कलाकृती बनविण्याची कंत्राटेदेखील मिळू लागली आहेत. त्याने बनविलेल्या वस्तूंना पर्यटकांकडुन खूप चांगली किंमत मिळत आहे. गणेश आता खूप खूष आहे कारण तो त्याचे कॉलेज-शिक्षणही करू शकतो आणि पैसेही कमावू शकतो. सौरदिव्याने त्याच्या आयुष्यात एक नवी पहाट आणली आहे.

स्त्रोत : http://labl.teriin.org

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate