विंधन विहिरीला (हॅन्डपंप) सौर उर्जेवर जोडून पाणी पुरवठ्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यात चांगलाच यशस्वी झाला आहे. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात विविध 54 गावांमध्ये हा उपक्रम अतिशय उपयोगी ठरला असून यामुळे गावांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे झरी जामणी तालुक्यातील 21 गावांचा यात समावेश असून त्यातील बहुतांश गावे आदिवासीबहूल आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी काही गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. हा उपक्रम राबविल्यामुळे वीज नसली तरीही गावाला पाण्याची समस्या कधीच भेडसावत नाही, याचे समाधान गावातील लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसले.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. बहुतांश गावांमध्ये पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आल्या आहे. परंतु लोकसंख्या आणि आकारमानाने अतिशय लहान असलेली गावे, वस्त्या व ज्या गावांमध्ये नळ योजना काही कारणास्तव होऊ शकली नाही. अशा गावांमध्ये ही योजना प्रामुख्याने राबविण्यात आली. ज्या गावात तासी 2 हजार लिटर पाण्याचा उपसा होऊ शकणारी व बारमाही पाणी असेल अशा हॅन्डपंपवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली. हॅन्डपंपला सौर उर्जेचे युनीट जोडून सबमर्सीबल पंपाव्दारे या उर्जेच्या आधारावर पाणी काढण्यात येते. बाजूलाच दहा फुटाचे स्टॅन्ड उभारुन त्यावर पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे. सौर उर्जेच्या युनीटवर सूर्यकिरणे पडताच पंप सुरु होऊन पाण्याची टाकी आपोआप भरली जाते. टाकी भरल्यानंतर मोटर आपोआप बंद होते. ही यंत्रणा स्वयंचलित असल्यामुळे गावकऱ्यांना मोटर चालू बंद करण्यासाठी एखाद्याची नियुक्ती करण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा आपत्कालीन परिस्थितीत पंप सुरु बंद करण्याची वेगळी व्यवस्थाही या युनीटवर उपलब्ध आहे.
या टाकीवर गावात प्रमुख ठिकाणी सार्वजनिक नळ उभारण्यात आले असून त्याठिकाणी गावकरी केव्हाही पाणी भरु शकतात. विशेष म्हणजे टाकीतील पाणी संपल्यानंतर टाकी पुन्हा सौर उर्जेने आपोआप भरण्याची सोय या अंतर्गत आहे. प्रति युनीट 4 लाख 80 हजार इतका खर्च असून जिल्ह्यात 54 ठिकाणी या सौर उर्जेव्दारे गावांना पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. झरी तालुक्यातील दाभाडी बु., दाभाडी ल., दाभाडी बो., लालगुडा पोड, मुची, शेकापूर, खापरी, मांगली, बिहारी पोड, ऐसापूर, दिग्रस जु., चिचपोड, गारगोटी पोड, गुळ गव्हाण, भिमनाळ, खिराटोकी, चिखलहोड, कारेगाव गोंड, मजरा, येवती, बोपापूर या गावांमध्ये ही योजना अतिशय उपयुक्त ठरल्याचे गावकरी सांगतात. मारेगाव तालुक्यातील कुंभा धरमपोड यासारख्या अतिशय लहान गावात गावकऱ्यांना या योजनेमुळे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया येथील महिलांनी दिली आहे.
यावर्षी 104 गावांमध्ये ही योजना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हँन्डपंपवर सौर ऊर्जेचा मोटरपंप लावण्यात आला असला तरी हँन्डपंपला पंप मारुन पाणी भरण्याची सोय या योजनेत आहे. एखाद्या वेळी पाण्याची टाकी न भरल्यास हँन्डपंपवर पाणी भरता येऊ शकते, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. वालदे यांनी सांगितले. विविध प्रकारच्या शक्यता पडताळून आवश्यक सर्व सुविधा या उपक्रमात समाविष्ट करण्यात आल्याने हा उपक्रम अतिशय उपयोगी ठरत आहे, हे निश्चित.
- मंगेश वरकड, जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 5/28/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
उस शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजन...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...