অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर उर्जेवर विंधनविहिरी वाडी-वस्त्या सुखावल्या

सौर उर्जेवर विंधनविहिरी वाडी-वस्त्या सुखावल्या

गावकऱ्यांना 12 महिने 24 तास शुद्ध आणि पुरेसं पाणी देण्याची किमया भू जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केली आहे. या यंत्रणेने विकसित केलेल्या सौर ऊर्जेवरआधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजनेने कोल्हापूरच्या लौकिकात भर घातली आहे. विनाखर्चात, विनासायास शाश्वत पाणी पुरवठ्याद्वारे गेल्या दोन वर्षात 100 हून अधिक सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजनेची कामे यशस्वी करुन वाडी-वस्त्यातील आया-बहिणींचा शासनाने दुवा घेतला आहे. देशातील काही राज्यात कोल्हापूरची ही नाविण्यपूर्ण योजना मार्गदर्शक ठरु लागली आहे.

कोल्हापूर जिल्हा सधन गणला जात असला तरी अलिकडील काही वर्षात गावापासून जवळच नव्याने वाडी-वस्त्या वसल्या आहेत. परंपरागत पद्धतीनुसार गावांसाठी पिण्याची नळ पाणी पुरवठा योजना कार्यरत असते, मात्र गावाच्या जवळच नव्याने वसलेल्या छोट्या-छोट्या वाड्या-वस्त्यांसाठी नव्याने पाणी पुरवठा योजना राबविणे तसे अडचणीचे ठरते. त्यामुळे अशा वाड्या-वस्त्यांवरील लोकांची पाण्याची गैरसोय होते. अशा परिस्थितीत वाड्या-वस्त्यांतील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था ही प्रामुख्याने विंधन विहिरीद्वारे (बोअरवेल) केली जाते. पण उन्हाळ्यात विंधन विहिरींची पाणी उपश्याची क्षमता अपुरी ठरते, अशावेळी विद्युतमोटार उपयुक्त ठरते, मात्र विद्युतमोटारीसाठी मोठा खर्च असतो तसेच लाईट असेल तरच ही योजना उपयोगी ठरते, मग पर्याय उरतो तो म्हणजे सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा येाजनेचाच !

नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यावरील लोकांना सहजासहजी पाण्याचा पुरवठा करण्याच्यादृष्टीने पुरेसं पाणी असलेल्या विंधन विहिरीवर सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन वाड्या-वस्त्यावरील लोकांना विनाखर्चात, विनासायास शुद्ध आणि पुरेसं पाणी देणारी नाविण्यपूर्ण योजना आखून जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन पाणी पुरवठ्यामध्ये नवा इतिहास नोंदविला आहे.

क !! बीडची तळेकर वस्ती सुखावली

सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना जिल्ह्यायातील अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये सुरु झाल्या आहेत, त्यामध्ये करवीर तालुक्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा जोपासणाऱ्या क!! बीडच्या तळेकर वस्तीवरील लोकांना या येाजनेतून नळाद्वारे पाणी मिळू लागल्याने महिला या योजनेवर जाम खुष असून वस्तीतील सर्वजणांनी समाधान व्यक्त केले आहे. क!! बीड म्हणजे सोन्याच्या नाण्यांचा आणि सुवर्णमुद्रांचा पाऊस पडतो, अशी ऐतिहासिक आणि पौराणिक ओळख या गावाला लाभली आहे.

तळेकर वस्ती ही तशी जेमतेम 15 घरांचीच वस्ती. क!! बीडचीच ही वस्ती, पण नळपाणी पुरवठा योजनेत समावेश नसल्याने पाण्यापासून वंचित होती. ऐन उन्हाळ्यात या वस्तीतील विंधन विहिरीचा हातपंपाद्वारे पाणी उपसा बंद व्हायचा, मग दीड किलोमिटरवर असलेल्या भोगावती नदीतून जीव मुठीत धरुन पाणी आणताना तळेकर कुटुंबातील महिलांची दमछाक व्हायची, महिला वर्गाचा सारा वेळ पाणी आणण्यात जायचा, त्यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होऊन शेती उत्पन्न कमी व्हायचे. पण शासनाच्या भू जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने विकसीत केलेल्या सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप योजना गेल्या दोन वर्षापूर्वी तळेकर वस्तीमधील विंधन विहिरीवर सुमारे 4 लाख 84 हजार रुपये खर्चून कार्यान्वित केली, त्यामुळे वस्तीवरील सर्व कुटुंबांना नळाद्वारे कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होऊ लागल्याने त्यांचे विशेषत: महिलांचे श्रम, कष्ट वाचले. या वस्तीतील मुक्ताबाई तळेकर, लता तळेकर आदि महिलांनी या योजनेमुळे ऐन उन्हाळ्यात दीड किलोमिटरहून आणाव्या लागणाऱ्या पाण्याचा फार मोठा त्रास बंद झाला असून तो वेळ आता शेतीकामाला येत आहे, या योजनेमुळे वेळेची, श्रमाची आणि खर्चाची बचत झाली असून घरातच नळाने पाणी मिळाल्याने आम्ही समाधानी असल्याच्या प्रतिक्रीया तळेकर वस्तीतील महिलांनी व्यक्त केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यात वीज पुरवठा उपलब्ध नसलेल्या अतिदुर्गम, डोंगरी भागातील वाडी-वस्त्यामध्ये सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना भू जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने गतिमान केली. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यु.एन. थोरात म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गंत ही योजना राबविली जात असून सन 2016-17 मध्ये 64 सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजनेची कामे मंजुर करण्यात आली असून आतापर्यंत 41 योजनेचा पाणी पुरवठा सौर पंपाद्वारे सुरु करण्यात आला आहे. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच 2017-18 मध्ये 40 ठिकाणी सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना मंजुर केली असून पुढील वर्षासाठी 203 ठिकाणी सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजना जिल्ह्याच्या दुर्गम भागातील वाडी-वस्त्यांमध्ये राबविण्याचा संकल्प आहे.

या योजनेच्या वैशिष्ट्यांमध्ये वाड्या वस्त्यावरील लोकांना या योजनेद्वारे 24X7 शाश्वत पाणी पुरवठा केला जातो, हातपंप आणि सौर उर्जेवर आधारित पाणबुडी पंपाची एकाच विंधण विहीरीवर उभारणी केली जाते, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने विकसित केलेल्या स्पेशल वॉटर चेंबरचा वापर केला आहे. सौर पंपासाठी बॅटरीची आवश्यकता नाही, विजेची गरज नसून पाच हजार लिटर्सच्या पाण्याच्या टाकीद्वारे घरोघरी नळाद्वारे तसेच सार्वजनिक नळकांड्याद्वारे वस्तीजवळ पाणी पुरवठा होतो. विनाखर्चाची, विनात्रासाची, विनाप्रदुषणाची अशी ही योजना असून जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी शासनाने ही एक पर्वणीच उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. आज कोल्हापूरची सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा येाजना राज्यातील एक रोल मॉडेल योजना म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. ही कोल्हापूरच्यादृष्टीने अभिमानाची आणि गौरवाची बाब मानावी लागेल.

- एस.आर.माने

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 2/28/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate