অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्याची आघाडी

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्याची आघाडी

प्रस्तावना

औद्योगिकीकरण आणि झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि विजेची वाढती मागणी तसेच पारंपरिक पध्दतीने वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या भूगर्भातील साठ्यात घट होत आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होत असल्याने अपारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती अशा अपारंपरीक पध्दतीने वीज निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील आघाडीवर असलेले राज्य आहे.

पारंपरीक पध्दतीने वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक इंधन साठ्यात घट होत आहे. तसेच या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होतोय. या पार्श्वभूमीवर अपारंपरीक पध्दतीने विद्युत निर्मिती करण्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.

सूर्याच्या उष्णतेपासून निर्माण करण्यात येणारी सौर ऊर्जा, वायूच्या गतीच्या सहाय्याने निर्माण करण्यात येणारी पवन ऊर्जा,  औद्योगिक कचऱ्यापासून निर्माण करण्यात येणारी ऊर्जा  तसेच समुद्राच्या लाटा, उसाच्या चिपाडापासून निर्माण करण्यात येणारी ऊर्जा आदी स्त्रोतांपासून निर्माण करण्यात येणाऱ्या ऊर्जेला अपारंपरीक ऊर्जा म्हटले जाते. राज्यात एकूण वीज निर्मितीच्या  10 टक्के इतकी ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा मार्फत निर्माण करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात सन 2009-2010 मध्ये 203.85 मेगा वॅट क्षमतेचे, 2010-11 मध्ये 510.175 मे.वॅ. क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही कामगिरी जवळपास दीड पटीने जास्त आहे. सन 2011-12 मध्ये 721.75 मे.वॅ. एवढी भरीव अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ झाली असून त्यात पवन ऊर्जा 407.35 मे.वॅ. उसाच्या चिपाडावर आधारीत सहवीज प्रकल्प निर्मिती 772.90 मे.वॅ. औद्योगिक कचऱ्यापासून वीज निर्मितीची प्रकल्प 4.00 मे.वॅ. सौर ऊर्जा प्रकल्प 19 मे.वॅ. आणि लघुजल प्रकल्प 18.5 मे.वॅ.  एवढ्या क्षमतेचे आहेत.

वाऱ्याच्या गतीच्या सहाय्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पवन ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्रात एकूण 2194.26 मे.वॅ. क्षमतेचे प्रकल्प 21 ठिकाणी उभारण्यात आले आहेत.  शासनाच्या आकर्षक धोरणामुळे खासगी गुंतवणुकदारांनी पवन ऊर्जेच्या क्षेत्रात 11 हजार कोटीची थेट गुंतवणूक केली आहे. तर सुमारे 16 हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी वाव आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा 545 मेगावॅटच्या पवनऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यात ब्राम्हणवेल येथे विकसित करण्यात आला आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात 785 मे.वॅ. इतकी क्षमता स्थापित करण्यात आली असून मार्च 2012 अखेर एकूण 2717 मे.वॅ. इतकी स्थापित क्षमता आहे.

अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार सन 2015 पर्यंत एकूण वीज निर्मितीच्या 10 टक्के वीज निर्मिती अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून करण्याचे धोरण आहे. या नुसार अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट दरवर्षी 1 टक्क्याने वाढवून सन 2014-15 मध्ये 10 टक्के अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न महा ऊर्जामार्फत करण्यात येणार आहेत. यासाठी 1500 मे.वॅ. क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प, 150 मे.वॅ. क्षमतेचे बायोमास ऊर्जा प्रकल्प, 300 मे.वॅ. क्षमतेचे ऊसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मितीचे प्रकल्प, 450 मे.वॅ. क्षमतेचे घनकचरा व औद्योगिक कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प, 50 मे.वॅ. क्षमतेचे लघुजल विद्युत निर्मिती प्रकल्प आणि 250 मे.वॅ. क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प असे एकूण 2700 मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

पवन-सौर संकरित ऊर्जा

वायूपासून निर्माण करण्यात येणारी पवन ऊर्जा आणि सूर्याच्या उष्णतेवर निर्माण करण्यात येणाऱ्या सौर ऊर्जेपासून एकत्रितपणे निर्माण करण्यात येणाऱ्या प्रकल्पांना पवन सौर संकरित ऊर्जा प्रकल्प म्हटले जाते. देशात सर्वात जास्त 1353 किलो वॅट क्षमतेचे पवन-सौर संकरित ऊर्जा सयंत्राची स्थापना राज्यात झाली असून 474 कि.वॅ. क्षमतेची सयंत्री आस्थापित करण्याचे काम प्रगती पथावर आहे. तसेच 894 कि.वॅ. क्षमतेचे सयंत्रे आस्थापित करण्यासंबंधीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेले आहेत. पवन-सौर ऊर्जा संकरित यंत्रे उभी करणारी संस्था म्हणून महाऊर्जा या संस्थेस पारितोषिक मिळाले आहे. या प्रकल्पामुळे सूर्याची उष्णता उपलब्ध नसल्यास पवन ऊर्जेमार्फत ऊर्जा निर्मिती करण्यात येते. तर वाऱ्याचा वेग कमी असल्यास सूर्याच्या उष्णतेमार्फत ऊर्जा निर्मिती करण्यात येते. यामुळे अखंडीतपणे विद्युत पुरवठा होण्यास मदत होते.

डोंगराळ तसेच दुर्गम भागात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून मागील तीन वर्षाच्या कालावधीत 131 खेड्या-पाड्यांमध्ये अपारंपरिक साधनांमधून विद्युतीकरण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. ग्रामपंचायतीमध्ये पथ दिव्यांसाठी 49,198 ऊर्जा कार्यक्षम पथ दिवे बसविण्यात आले असून यामुळे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात लक्षणीय ऊर्जा बचत झालेली आहे. 10,731 गावांतील सार्वजनिक ठिकाणी सौर अभ्यासिका योजना हाती घेतली आहे.

पारेषण संलग्न अपारंपरिक ऊर्जा

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने (महाऊर्जा)  पारेषण संलग्न अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात 31 मार्च 2012 अखेर पर्यंत 4021.08 मे.वॅ. क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात आले आहेत. त्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प  2717.11 मे.वॅ. उसाच्या चिपाडावर आधारीत सहवीज निर्मिती प्रकल्प 849.4 मे.वॅ., कृषी अवशेषवर आधारीत प्रकल्प , 155 मे.वॅ. औद्योगिक कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प 14.851 मे.वॅ.,  सौर ऊर्जा प्रकल्प 20 मे.वॅ. आणि लघु जल विद्युत निर्मिती प्रकल्प 264.725 मे.वॅ. आस्थापित करण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य अपारंपरिक ऊर्जा निर्मिती स्थापित क्षमतेत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ऊर्जा बचत ही काळाची गरज असल्याने तसेच ऊर्जा बचत म्हणजेच ऊर्जा निर्मिती असल्याने महाऊर्जाने ऊर्जा बचत कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यक्रमांतर्गत शासकीय निमशासकीय इमारती, संस्था ऊर्जा संवर्धन कार्यक्रम राबविण्यास महाऊर्जामार्फत अर्थसहाय्य देण्यात येते. नव-नवीन प्रकल्प राबविण्यासाठी सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या संस्थेशी करार करण्यात आला आहे. नव-नवीन प्रकल्प राबवून अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून 2015 पर्यंत एकूण वीज निर्मितीच्या 10 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जाच्या माध्यमातून निर्माण करण्याचे लक्ष आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विजेची वाढती गरज भागविण्यास नक्कीच मदत होईल.

 

 

लेखक : विष्णू काकडे, सहाय्यक संचालक (माहिती)

स्त्रोत : माहिती व जनसंपर्क संचलनालय, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 9/30/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate