অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे 'परिवर्तन'

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे 'परिवर्तन'

भारतात ऊर्जा क्षेत्रात प्रचंड सुधारणा करत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयामार्फत ऊर्जा संवर्धन कायदा आणि भारतीय विद्युत कायदा लागू करण्यात आल्यानंतर उर्जा क्षेत्रातील पारंपरीक संकल्पना पूर्णपणे बदलून या क्षेत्राला नवीन दिशा मिळाली. खाजगी वीज निर्मिती होऊन ऊर्जा क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली तसेच एनर्जी एक्सचेंजच्या माध्यमातून विद्युत खरेदी व विक्री सुरू झाली. या सुधारणा अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे त्रिभाजन करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत (MSEDCL), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादीत (MSETCL) व महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादीत (MSEGCL) या तीन स्वतंत्र कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि त्यावर नियंत्रणासाठी होल्डिंग कंपनीचीही स्थापना झाली.
महापारेषण कंपनीमध्ये पारदर्शकता व गतिमानता वाढवून उत्पादकतेत वाढ करण्याच्या उद्देशाने परिवर्तन प्रकल्प सुरु करण्यात आला. या अंतर्गत ईआरपी अर्थात Enterprise Resource Planning पद्धतीनूसार SAP तंत्रज्ञान वापरून आयबीएम या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मदतीने महापारेषण कंपनीने उच्चस्तरीय व्यवस्थापन मंडळ, विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी, नियामक प्राधिकरणे, संबंधित वित्तीय संस्था आणि पुरवठादार यांच्या उपयोगासाठी एक अद्ययावत संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. सदर प्रणाली सन 2012 पासून कार्यांवित करण्यात आलेली असून www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या प्रणालीचे मुख्यत: सात (7) भाग आहेत : सामग्री व्यवस्थापन (Material Management), प्रकल्प योजना (Project Scheme), वित्त आणि नियंत्रण (Finance and Control), मानव संसाधन (Human Resource), संयंत्र देखभाल (Plant Maintenance), गुणवत्ता व्यवस्थापन (Quality Management) आणि दस्तावेज व्यवस्थापन प्रणाली (Document Management System). वरील सर्व प्रणालीचे नियंत्रण व देखभाल करण्यासाठी सुसज्ज माहिती तंत्रज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली.
सामग्री व्यवस्थापनाच्या भागात दैनंदिन उपयोगी सामग्री व सेवा खरेदीचे, प्रकल्पसाठी लागणाऱ्या उपकरणांचे व सेवा खरेदीचे तसेच इतर खरेदीचे कार्यादेश ऑनलाईन पद्धतीने तयार केले जातात. कार्यादेशाप्रमाणे खरेदी केलेल्या साहित्याची नोंद ऑनलाईन ईन्व्हेंटरी सिस्टीम मध्ये केल्यामुळे नवीन खरेदीवर नियंत्रण ठेवले जाते.
'प्रकल्प योजना' या भागात कंपनीत सुरु असणारे विविध प्रकल्प, उपकेंद्र, वाहिन्या यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व तांत्रिक व अतांत्रिक माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रकल्प खर्चाबद्दलची अद्ययावत माहितीही या प्रणालीतून उपलब्ध होते.
'वित्त आणि नियंत्रण' या भागात सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे पगार, सर्व कंत्राटदार व पुरवठादार यांचे देणे, सर्व परिमंडळ कार्यालयांना देण्यात आलेल्या वार्षिक अंदाजपत्रकाचे नियंत्रण ऑनलाईन पद्धतीने केले जाते.
'मानव संसाधन' विभागात पारेषण कंपनीच्या सर्व (अंदाजे 13500) कर्मचाऱ्यांचे मासिक देयके, पगारपत्रके, आयकर आणि भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रे तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या रजेचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे व्यवस्थापन, बढती आणि बदलीचे व्यवस्थापन इत्यादी कामे या प्रणालीतून केली जातात.
महापारेषणच्या माध्यमातून सुरू असलेल्या 590 उपकेंद्रांची तसेच या सर्व उपकेंद्रातील सुमारे 1.5 लाख उपकरणांची तांत्रिक माहिती अद्ययावत ठेवून या सर्व उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती तसेच चाचणीबद्दलची अद्यावत माहिती 'संयंत्र देखभाल' या भागात करण्यात येते. या माहितीवरून तयार होणाऱ्या विविध अहवालांवरून विविध स्तराहून सर्व यंत्रणा चालू स्थितीत असल्याबाबत निर्णय घेणे सुलभ झाले आहे.
गुणवत्ता व्यवस्थापनाच्या विभागात विविध पुरवठादारांनी पुरवठा केलेल्या सर्व प्रकारच्या उपकरणांचे गुणवत्ता निरीक्षण आणि चाचणी विषयक प्रक्रियांचे व्यवस्थापन केले जाते. संबंधित माहिती सुलभ तक्त्याच्या स्वरूपात या प्रणालीत भरली जाते आणि त्याचे एकत्रीकरण करून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पडताळण्यास तात्काळ उपलब्ध होतो.
दस्तावेज व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून दैनंदिन कार्यालयीन कामकाजात कागदाचा वापर मर्यादित ठेवून जास्तीतजास्त काम ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
SAP पद्धतीची संपूर्ण माहिती होण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील विविध कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तसेच वापरकर्त्यांना दोन महिन्याचे प्रशिक्षण देऊन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने इन्हेंथाट्री प्रस्थापित केल्यामुळे तसेच विविध विद्युत उपकेंद्रांचे देखभाल नियंत्रण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्याने पारेषण कंपनीच्या कामात कामात प्रशासकीय गतिमानता आणि पारदर्शकता साध्य झाली आहे. विविध स्तरावर निर्णय प्रक्रियेत या प्रणालीचा उपयोग करण्यात येऊन कंपनीचा एकंदर दर्जा सुधारण्यास फार मोठी मदत ठरत आहे.

लेखक -सुनिल पोटेकर

 

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate