অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)

प्रस्तावना

यापूर्वी मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, तिचे पारेषण व वितरण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून केले जात होते. परंतु विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

ग्राहकाधार 

महावितरण कंपनी मुंबई शहराचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील प्रवर्गातील सुमारे १ कोटी ८६ लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी, १३ लाख ४६ हजार वाणिज्यिक व २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यातून महावितरणला सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो.

विजेचे स्त्रोत:

पायाभूत आराखडा

महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखड्यात ३३ कि. व्हो. , २२ कि. व्हो. व ११ कि.व्हो. विद्युत वाहिन्या, उपकेंद्रे व वितरण रोहित्रे यांचे जाळे असून ते राज्यातील ४१,०१५ गावे व ४५७ शहरांच्या सुमारे ३.०८ लाख चौ.कि.मी. क्षेत्रात व्यापले आहे. यात सुमारे ४९,००० एमव्हीए परिवर्तित क्षमता असलेली ३३ कि.व्हो.ची १,९४७ उपकेंद्रे, १०,३३४ उच्चदाब फिडर्स व हजारो सरर्किट कि.मी. उच्चदाब व लघुदाब वाहिन्या समाविष्ट आहेत.

मानव संसाधन विकास

महावितरणकडे सुमारे ७० हजार कर्मचा-यांचे मनुष्यबळ आहे. हे बळच महावितरणची खरी संपत्ती आहे. कंपनीने या संपत्तीच्या कल्याणाला व हिताला अग्रक्रम दिला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्याच्या ४ प्रशिक्षण केंद्रांशिवाय कंपनीने मंडळ पातळीवर नवीन २५ प्रशिक्षण केंद्रे सुरु केली असून यातून तांत्रिक कर्मचा-यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येकवर्षी सुमारे २० हजार कर्मचा-यांना उजळणी, व्यावसायिक व मानव संसाधन प्रशिक्षणाचा लाभ मिळवून दिला जातो. यात सुरेक्षेला विशेष महत्व देवून तांत्रिक कर्मचा-यांना त्यादृष्टीने नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. अभियंत्यानाही राज्याबाहेरील नामांकित प्रशिक्षण केंद्रात पाठवून एमडीपी मॉड्युल व युएसएआयडी या ड्रम प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी नियमितपणे पाठविले जाते.

सामाजिक बांधिलकी

गेल्या २ वर्षात सुमारे २००० मृत कर्मचा-यांच्या वारसांना नोक-या देण्यात आल्या. स्थानिक उमेदवारांना मदत करण्याच्या हेतूने वैजापूर (जि.औरंगाबाद) व कल्याण ही दोन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे दत्तक घेऊन तेथील प्रशिक्षणाच्या सुविधा वाढविण्यात आल्या.

महिला कर्मचा-यांचे सबलीकरण

महावितरणच्या मनुष्यबळात महिला अभियंत्यांची सतत भर पडत असल्याने त्यांचे सबलीकरण आवश्यक झाले आहे. त्यासाठी ‘ दामिनी पथक ’ नावाने एक नवीन संकल्पना राबविण्यात येत आहे. हे दामिनी पथक प्रत्येक मंडळात अधीक्षक अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून या पथकांच्या प्रमुख स्थानिक महिला अभियंता असून मदतीला २-३ बाह्य स्त्रोत महिला कर्मचारी देण्यात आले आहेत. या पथकासाठी एक डिजीटल कॅमेरा, गणवेशातील सुरक्षा रक्षक व वाहन पुरवण्यात आले आहे. या पथकावर त्यांच्या भागात घेण्यात आलेल्या फोटो मीटर रीडिंगच्या अचानक पुनर्रतपासणीचे काम सोपविण्यात आलेले आहे. या उपक्रमामागचा हेतू वीजग्राहकांच्या फोटोमीटर रीडिंगच्या तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविणे असा आहे. या पथकातील कर्मचारी घरी महिला उपलब्ध असतात तेव्हा म्हणजे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घरांना भेटी देतात. ही पथके समाधानकारकपणे काम करीत असून या उपक्रमाचे निष्कर्ष स्फूर्तीदायी आहेत.

महिला बचत गट

आपण घरगुती उत्पादनातून अर्थार्जन करून त्यावर गुजराण करणारे गरीब व गरजू महिलांना मदत करणारे महिला बचत गटासारखे महिलांचे स्वयंसहाय्यता गट पाहतो. महावितरणने त्यांना काही चांगल्या संधी देऊन मोठ्या प्रमाणातील महिला शक्तीचा उपयोग करून घेण्याचा विचार केला . त्यासाठी संपूर्ण राज्यात महिला बचत गटांना पुढे येऊन वीजबील वाटपाचे काम करण्याची संधी देण्यात आली आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे. त्यानुसार राज्यातील काही भागातील महिला बचत गटांनी काम सुरु केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कामात गुंतलेल्या महिलांच्या नियमित उत्पन्नात चांगली वाढ होईल, अशी अशा आहे.

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://www.mahadiscom.in/aboutus/abt-us-01_marathi.shtm

अंतिम सुधारित : 1/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate