मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू इ.पारंपरिक इंधन साठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे सध्याच्या मोठ्या प्रमाणात वीज वापराच्या परिस्थितीमध्ये पारंपरिक ऊर्जेच्या कमीत कमी वापराला प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर सौर ऊर्जा स्त्रोताचा वापर मानवाच्या दैंनदिन जीवनात वाढविणे गरजेचे झाले आहे. भारत हा उष्णकटीबंधातील देश असल्याने प्रतिदिन साधारणत: ४ ते ७ कि.वॅ. उष्णता भारतामध्ये उपलब्ध आहे. भारतात प्रतीवर्षी जवळपास ५०,००० दशलक्ष युनिट इतक्या प्रमाणात सौर ऊर्जा उपलब्ध आहे जी आपल्या देशाच्या एकूण ऊर्जा वापराच्या कितीतरी पटीने अधिक आहे.
सौर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सौर उर्जेचा वापर घरगुती, व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी तापविणे तसेच वाफ तयार करुन अन्न शिजविणे, विद्युत निर्मिती करणे इत्यादीसाठी होतो.
सौर ऊर्जा संयंत्रामध्ये सूर्याची किरणे सौर संकलकावर एकत्रित करुन त्यापासून औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. ही औष्णिक ऊर्जा पाण्याला दिली जाते. त्यामुळे पाण्याचे तापमान वाढते. तापलेले पाणी सर्व बाजूनी उष्णता रोधक केलेल्या भागामध्ये एकत्रित केले जाते, त्यामुळे औष्णिक ऊर्जेचा अपव्यय टाळता येतो.
सौर उष्णजल संयंत्राच्या संकलकाच्या वरील भागास काचेचे आवरण असते. संकलकामध्ये तांब्याच्या पत्र्यामध्ये तांब्याच्या नलिका बसविलेल्या असतात. या नलिकांना वरच्या (आकाशाकडील) पृष्ठभागास काळा रंग दिलेला असतो यामुळे उन्हाने पत्रा व नलिका तापतात व नलिकांमध्ये पाणीही तापते. पाणी तापल्यामुळे हलके होऊन वरील गरम पाण्याच्या टाकीमध्ये साठविले जाते व टाकीमध्ये खालचे गार पाणी नलिकांमध्ये येते. संयंत्र आस्थापित करीत असताना संकलकाचा पृष्ठभाग दक्षिणेकडे झुकलेला असावा.
सौर उष्णजल संयंत्र हे ३००० लि. प्रतीदिन क्षमतेपर्यंत नैसर्गिक अभिसरण (थर्मोसायफन) व ३०००० लि. प्रतीदिन क्षमतेपुढे बलपुर्वक अभिसरण (फोर्स सर्क्युलेशन) याप्रकारात उपलब्ध आहे. सौर उष्णजल संयंत्रामध्ये पाण्याचे तापमान ६० अंश ते ८० अंश सें. पर्यंत वाढविले जाते. अशा प्रकारचे संयंत्र घरगुती, व्यापारी क्षेत्र जसे की हॉटेल, दवाखाने, दुग्धशाळा इत्यादी ठिकाणी बसविता येते.
साधारणत: १०० लिटर्स, प्रतीदिन क्षमतेच्या संयंत्रापासून वर्षाला अंदाजे १५०० युनिट इतक्या विजेची बचत होते. संयंत्र आस्थापित करुन घेण्यासाठी नाबार्डच्या साहाय्याने विविध कमर्शियल व ग्रामीण बैंकांमार्फत कमी व्याजदराने वित्त पुरवठा केला जातो. तसेच केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयामार्फत प्रचलित पद्धतीने अनुदान उपलब्ध केले जाते.
घटक :- संकलक (Cu-cu Selectively) coated गरम पाणी साठवणुकीची इन्शुलेटेड टाकी व आवश्यक्तेनुसार पंप इ.
वैशिष्ट्ये :- उर्जेच्या खर्चात मोठी बचत, २४ तास गरम पाण्याचा पुरवठा, संपूर्ण सुरक्षित व अत्यल्प देखभाल, दीर्घायुषी आणि प्रदूषणविरहित.
सौर उष्णजल संयंत्राच्या प्रयत्नामुळे राज्यातील विविध महानगरपालिका व नगरपालिका यांनी नवीन गृहप्रकल्पांसाठी सौर उष्णजल संयंत्र आस्थापित करण्याचे अनिवार्य (बंधनकारक) केले असून १३ महापालिकांनी मिळकत करामध्ये १० टक्के पर्यंत सवलत दिली आहे.
राज्य शासनाच्या सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या गच्चीवर सौर साधने आस्थापित करण्यासाठी लागणारी जागा संस्थेच्या सदस्यास विनामुल्य उपलब्ध करुन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सौर उष्णता अन्न शिजविण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकेल यामुळे इंधनामध्ये बचत होते. घरगुती इंधनांच्या किंमती प्रती वर्षी वाढत असल्यामुळे गृहिणींसाठी सौरचुल वरदान ठरत आहे. सौरचुलीच्या वापराने अन्न शिजविण्यासाठी आवर्तीय खर्च होत नाही. तसेच अन्न पदार्थामधील प्रथिनांचे संरक्षण होते. दोन प्रकारच्या सौरचुली उपलब्ध आहेत.
सदर सौर चूल सर्वसाधारणपणे अॅल्युमिनियम पेटी सारखी दिसते. यामध्ये मुख्यत्वे बाहेरील पेटी, अन्न शिजविण्यासाठी आतील पेटी, आरसा व अॅल्युमिनीयमची भांडी इत्यादींचा समावेश असतो.
या संयंत्रामध्ये अर्धगोलाकार डिशद्वारे सूर्याची किरणे एकत्रित करुन उष्णता संग्राहकावर परावर्तित केली जातात. त्यामुळे संग्राहकाचे तापमान साधारणत: ५५० ते ६५० अंश सेल्सिअस पर्यंत पोहचते. या संग्राहकामधून पाण्याचे वहन करुन त्याची वाफ तयार करता येते ही वाफ वाहिनीद्वारे स्वयंपाकघरात अन्न्न शिजविण्यासाठी पाठविली जाते. श्री साई बाबा संस्थान, शिर्डी येथे अशा प्रकारचे १७,००० व्यक्तीसाठी अन्न शिजविण्यासाठी जगातील सर्वात मोठे संयंत्र आस्थापित करण्यात आले आहे. या संयंत्रामुळे प्रतिदिन २६४ कि.ग्रॅ. इतकी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसची बचत होत आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क :- महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), (महाराष्ट्र शासनाची संस्था) पुणे. दूरध्वनी क्रमांक 020- 26614393/ 26614403.
- नरोत्तम कोळी (तंत्रसहाय्यक), जिल्हा महिती कार्यालय, नाशिक.
स्त्रोत : बीड लाइव्ह
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 10/7/2020
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ ...
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...