ऊर्जेला दिशा नसते. तिची राशी कार्याच्या (प्रेरणा X अंतर) परिमाणातच मोजतात. अभियांत्रिकीसारख्या व्यावहारिक विज्ञानात मीटर-किलोग्रॅम, मीटर-टन किंवा सेंमी.-टन यांसारखी (गुरुत्व पद्धतीची; या पद्धतीत अंतर, काल व प्रेरणा या मूलभूत राशी धरतात) परिमाणे ऊर्जेच्या मापनासाठी रूढ आहेत. भौतिकी व तत्सम शुद्ध विज्ञानांत अर्ग, मीटर-न्यूटन व ज्यूल (निरपेक्ष पद्धतीची; यात अंतर, काल व वस्तुमान मूलभूत धरतात) किंवा किलोवॉट-तास (विद्युतीय) वगैरे परिमाणे रूढ आहेत. ऊर्जेचे वैशिष्ट्य असे आहे की, ती आपणास उत्पन्न करता येत नाही किंवा तिचा नाशही करता येत नाही. आपणास फक्त तिचे रूप बदलता येते. या विधानालाच ऊर्जेच्या अक्षय्यतेचा सिद्धांत म्हणतात. यावरून एक निष्कर्ष काढता येतो, तो म्हणजे विश्वातील एकंदर ऊर्जेचे मूल्य कायम आहे. ऊर्जेचे तीन प्रकार आहेत : स्थितिज, गतिज (गतीमुळे प्राप्त झालेली) आणि अंतर्गत.
गतिज ऊर्जा रूळमार्गी गाडी वेगात असताना एंजिनाची चालक शक्ती बंद केली तरी, ती गाडी थांबेपर्यंत बरेच अंतर जाते. म्हणजे चालक शक्ती बंद असूनही कार्य होते. याचा अर्थ वेगातील रूळमार्गी गाडीत व त्याचप्रमाणे कोणत्याही गतिमान वस्तूत ऊर्जा असते. हिलाच गतिज ऊर्जा म्हणतात. वस्तू एका सरळ रेषेत जात असता तिच्या गतिज ऊर्जेचे मूल्य व X वे२ (गुरुत्व पद्धती) किंवा २ गु व X वे (निरपेक्ष पद्धती) असते.
२
येथे वे म्हणजे वस्तूचा सरळ रेषेतील वेग आहे. रूळमार्गी गाडी स्थिर वेगाने धावत असताना एंजिनाची सर्व शक्ती गाडीच्या गतीला होणारा विरोध सहन करून गाडीचा वेग कायम राखण्यात खर्च होत असते. रूळमार्गी गाडी किंवा इतर कोणतेही वाहन सुरू करताना त्याला वेग देण्यासाठी जी चालक शक्ती वापरली जाते त्यातील काही भाग गतिज ऊर्जेच्या स्वरूपात साठतो व चालक शक्ती बंद केल्यावर या साठलेल्या ऊर्जेने गाडी काही काळ वेळ गतिमान राहते. साठलेली ऊर्जा संपली म्हणजे गाडी थांबते. यामिकीतील (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रातील) सिद्धांतानुसार वस्तूमानाला वेग आला म्हणजे त्याला गतिज ऊर्जा प्राप्त होते.जेव्हा एखादी वस्तू किंवा संहती आपल्या स्थिर गुरुत्व अक्षाभोवती फिरत असते, उदा., एंजिनाचे प्रचक्र किंवा टरबाइनाचा घूर्णक (फिरणारा भाग), तेव्हा त्याची गतिज ऊर्जा नि X को२ असते. यामध्ये नि हे फिरणाऱ्या अक्षाच्या संदर्भाने घूर्णकाचे निरूढी परिबल (कोनीय प्रवेगाला वस्तूच्या होणाऱ्या रोधाचे मान) आहे आणि को हा घूर्णक फिरण्याचा कोनीय वेग आहे. जर वस्तू फिरत असून तिचा अक्ष पुढे जात असेल (उदा., रूळमार्गी गाडीचे चाक), तर त्या वस्तूची एकूण ऊर्जा पुढीलप्रमाणे असेल : एकूण ऊर्जा = स्थानांतरण ऊर्जा + परिभ्रमण ऊर्जा=व X वे२+नि X को२ (गुरूत्व पद्धती).२ गु
अंतर्गत ऊर्जा : संपीडित (दाब देऊन संकोचित केलेला) वायू किंवा वाफ अशा पदार्थातील ऊर्जेच्या अस्तित्वाला त्यामधील अणूंच्या व रेणूंच्या आपसातील प्रेरणा व गती कारण असतात. वस्तूच्या तपमानाने या ऊर्जेचा सहज प्रत्यय येतो. तपमानावर अवलंबून असलेली अंतर्गत ऊर्जा वस्तूच्या स्थितिज आणि गतिज ऊर्जेपेक्षा निराळी असते. समजा, एका उभ्या सिलिंडरामध्ये भारित दट्ट्याखाली काही वायू आहे. त्याला उष्णता पुरविली तर तो वायू प्रसरण पावून दट्ट्या वर सरकेल व त्याचे तपमानही वाढेल म्हणजे वायूच्या अंतर्गत ऊर्जेतही वाढ होईल. अशावेळी वायूतील अंतर्गत ऊर्जावाढ = उष्णता आदान- दट्ट्यावर झालेले कार्य (उष्णता एककांत).
आइन्स्टाइन यांच्या सिद्धांतानुसार वस्तुमान व ऊर्जा परस्परांत रूपांतरित होत असताना म्हणजे अणूंचे भंजन (फुटणे) किंवा संघटन (एकत्र येऊन संयोग होणे) होताना प्रचंड उष्णतेचे उत्सर्जन होते. अणुकेंद्रीय शक्ती-संयंत्रांत (शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्रसंचात) अशा उष्णतेचा उपयोग करून वाफेच्या साहाय्याने प्रथम यांत्रिक शक्ती व तिच्यापासून जनित्राच्या साहाय्याने विद्युत् शक्ती उत्पन्न करतात.
वर दिलेल्या काही उदाहरणांवरून व्यवहारात ऊर्जेचे रूपांतर कसे होते याची कल्पना येईल.
ओगले, कृ. ह.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2020
ऊर्जे विषयीच्या बातम्या
अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण...
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्य...
शरीरातले प्रत्येक काम पार पाडण्यासाठी कार्यशक्तीच...