पाणी व उर्जा ह्या मानवी जीवनाच्या अविभाज्य गरजा आहेत. त्याचा जपून व बचत सदृश्य उपयोगच मानव प्राण्यांना तारणार आहे. राज्याच्या महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा या संस्थेतर्फे जिल्ह्या-जिल्ह्यात उर्जा निर्मिती, उर्जा साधनांचा वापर व त्यासाठी अनुदान योजना, उर्जास्त्रोत निर्मितीच्या ठिकाणांचा शोध, निरीक्षण आदी योजना राबविल्या जातात.
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आश्रमशाळा, वसतीगृहे, ग्रामीण रुग्णालये इत्यादी ठिकाणी पवन व सौर सयंत्र आस्थापित करण्याची योजना महाऊर्जा मार्फत राबविली जाते. अशा ठिकाणी तांत्रिकदृष्टया सर्वेक्षण करुन ही योजना अनुदानावर राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्राबाहेरील शासकीय आश्रमशाळामध्ये सौर प्रकाशीय साधने अनुदानावर आस्थापित केली जातात.
राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपारिक पध्दतीने वीजेचा वापर करणे खर्चिक आहे किंवा भारनियमानामुळे वीजेचा पुरवठा खंडीत स्वरुपात उपलब्ध होतो अशा विविध ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सामुदायिक अभ्यासिका, समाज मंदीर, ग्रामपंचायती कार्यालये, ग्राममंदीर, शाळा याठिकाणी रात्रीच्यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने सौर घरगुती दीप योजना अनुदानावर राबविण्यात येत आहे.
ग्रामीण आदिवासी क्षेत्रात अद्याप वीज पोहोचली नाही किंवा 5 ते 7 वर्षापर्यंत पारंपारिक पध्दतीने वीज पुरवठा करणे शक्य नाही अशा गाव, वस्त्या, तांडयामध्ये सौर घरगुती दिवे व सौर पथदिवे आस्थापित करण्याचा उपक्रम महाऊर्जातर्फे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांकडे सौर घरगुती दिवे व प्रत्येकी दहा घरांच्या पाठीमागे एक सौर पथदिप आस्थापीत केले जात आहे. अपारंपरिक उर्जेद्वारे ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम राबविण्याची योजना सुरु आहे.
खाजगी कारखाने, शासन अंगीकृत उपकरणे, शासकीय निमशासकीय इमारती, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी उर्जा परिक्षण करुन घ्यावे असे निर्देश आहेत. या दृष्टीकोनातून महाऊर्जातर्फे उत्सूक घटकांसाठी उर्जाबचत कार्यक्रम राबविला जातो. यासाठी तांत्रिक व कमाल चाळीस हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
सर्वत्र भडक व जास्त वॅट खर्ची टाकणारे बल्ब वापरले जातात. साध्या 100 वॅट बल्बऐवजी 36 वॅटचा सीएफएल बल्बचा वापर केल्यास 64 टक्के वीजेची बचत होऊ शकते. उर्जा कार्यक्रम पथदिवे योजनेअंतर्गत 36 वॅटच्या सीएफएल बल्बवर आधारीत पथदिवे आस्थापित करण्यासाठी काही अंशी अर्थसहाय्य दिले जाते.
उद्योग युनीटसाठी निष्कासित उष्णतेचे पुर्नजीवन (वेस्ट हिट रिकव्हरी) योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत उद्योगांना निष्कासित उष्णतेच्या पुर्नजीवन आधारीत प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महाऊर्जा मार्फत तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य दिले जाते.
नगरपालिका, महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अखत्यारितीत पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांमध्ये उर्जाबचतीसाठी सयंत्रे बसविण्याची महाऊर्जाची योजना असून त्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. पथदिव्यांमध्ये उर्जाबचत सयंत्रे आस्थापित करण्यासाठी कमाल वीस लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य तसेच पाणी पुरवठा योजनांसाठी पाच लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य संबंधित यंत्रणांना दिले जाते.
महाउर्जातर्फे उर्जा वाचविणारी आणखी एक योजना म्हणजे शासकीय इमारतीमध्ये उर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प होय. याअंतर्गत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी एका वित्तीय वर्षात 25 लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर केले जाते.
विविध कारणांसाठी भरमसाठ वीजेचा उपयोग करण्यापेक्षा अपारंपरिक उर्जा साधनांचा वापर वाढविणे आणि वीजेचा काटसरीने वापर करणे हे तंतोतंत पाळल्यास उर्जा समस्या भेडसावणार नाही. सौर उष्णजल सयंत्र, सौर कंदील, सौर घरगुती दिवे, सौरपथदीप, सौरपंप, पवन-सौर संकरीत सयंत्र, बायोगॅस सयंत्र अशी साधने वापरुन उर्जा संवर्धन करता येईल. उर्जा बचत करता येईल.
- रामचंद्र देठे ,माहिती अधिकारी नांदेड
स्त्रोत : अभयारण्य
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 10/7/2020
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...
जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ ...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...