অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वार्‍यापासून वीजनिर्मिती

वार्‍यापासून वीजनिर्मिती उर्फ पवनऊर्जा

सबंध जगातच वार्‍यापासून वीजनिर्मिती करण्याला विलक्षण महत्व आले आहे. ह्यामागचे तत्व अगदी साधे आहे - वार्‍यामुळे पंख्याची म्हणजे टर्बाइनची पाती फिरतात व पंख्याला जनरेटर जोडलेला असल्याने वीजनिर्मिती होते. पाती व जनरेटर उंच मनोर्‍यावर एका छोट्या खोक्यात बसवतात. ह्या खोक्याला नॅसल् म्हणतात.

तंत्रज्ञान

पवनचक्कीला साधारणपणे तीन पाती असतात व हा पंखा जनरेटरशी थेट किंवा एका गियरबॉक्सद्वारे जोडलेला असतो. ह्या पंख्याचा अक्ष क्षितिजसमांतर असतो व तो नॅसलमध्ये बसवलेल्या जनरेटरला जोडलेला असतो. ह्या नॅसलमध्ये आणखीही काही विजेची उपकरणे असतात तसेच वार्‍याच्या दिशेप्रमाणे पंखा वळवण्यासाठी एक यॉ मेकॅनिझमदेखील असतो. वार्‍याची दिशा जाणून घेणारे सेंसर्स बसवलेले असल्याने मनोर्‍याचा वरचा भाग योग्य दिशेने वळवता येतो.

जनरेटरद्वारे उत्पन्न केली जाणारी ऊर्जा वार्‍याच्या वेगानुसार आपोआप नियंत्रित केली जाते. पंख्याचा व्यास ३० मीटरपासून ९० मीटरपर्यंत असू शकतो तर मनोर्‍याची उंची २५ ते ८० मीटर असते.

वीजपुरवठ्याच्या स्थानिक जाळ्याला म्हणजे ग्रिडला पुरवण्याच्या दृष्टीने पवनऊर्जेचे नियंत्रण केले जाते. पवनऊर्जा जनित्रांची म्हणजे WEGची सध्याची निर्मितीक्षमता २२५ किलोवॅटपासून २ मेगावॅटपर्यंत असते आणि त्यांना फिरवण्यासाठी वार्‍याचा वेग सेकंदाला २.५ मीटर ते २५ मीटरच्या दरम्यान असावा लागतो.

पवनचक्क्यांची उभारणी

पवनचक्क्या उभारण्यासाठी योग्य ठिकाणांचा सुमारे १ ते २ वर्षे अभ्यास केला जातो. ह्यानंतर, एकमेकींत योग्य अंतर ठेवून, पवनचक्क्या उभारल्या जातात. ह्या उभारणीसाठी साधारण २-३ महिने लागतात. संबंधित संस्थांद्वारे उपकरणांची चाचणी घेऊन ते पूर्वनिश्चित मानके व नियमांनुसार ्सल्याचे व कार्यक्षमतेचे योग्यता-प्रमाणपत्र दिले जाते. ह्या यंत्रणेची देखभाल साधारणपणे उत्पादकच करतात.

पवनऊर्जा प्रकल्पांचा खर्च

पवनऊर्जेसाठी दर मेगावॅटमागे सुमारे ४ ते ५ कोटी रुपये खर्च येतो. हा खर्च मुख्यतः स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतो. यंत्रणेच्या देखभालीचा खर्च दर किलोवॅट-तासामागे २५ ते ६० पैसे असतो. प्रकल्पातली भांडवली गुंतवणूक सुमारे ५ ते ८ वर्षांत वसूल होते.

स्रोत: भारत सरकारच्या नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाचे पवनऊर्जेवरील पुस्तक

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate