অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गॅस आणि त्याचा वापर

गॅस आणि त्याचा वापर

 1. लिक्विडीफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि त्याचा वापर
  1. एलपीजी म्हणजे काय?
  2. एलपीजीचे उपयोग कोणते?
  3. बाजारात एलपीजी सिलेंडर कोणत्या वजनामध्ये उपलब्ध असतात?
  4. घरगुती वापराचे सिलेंडर्स मोटारवाहने, एलपीजीवर चालणारी इतर उपकरणे किंवा इतर कारणांसाठी वापरता येऊ शकतो का?
  5. भारतातील घरगुती एलपीजीच्या विपणनामध्ये कोणत्या कंपन्या समाविष्ट आहेत
  6. नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन मिळवण्याची पद्धत काय?
  7. घरगुती एलपीजी जोडणी स्थलांतरीत कशी करावी?
  8. एलपीजी जोडणी जोडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
  9. एलपीजी सिलेंडर वापरताना घ्यावयाची सर्वसामान्य काळजी कोणती?
  10. ग्राहकांसाठी सामान्य सुरक्षाविषयक सुचना कोणत्या?
  11. जर गॅसचा वास येऊ लागला तर काय करावे?

लिक्विडीफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि त्याचा वापर

एलपीजी म्हणजे काय?

लिक्विडीफाईड पेट्रोलियम गॅस हे कक्ष तापमानाला आणि दाबाला वायूवस्थेत असणारे हायड्रोकार्बन्सचे मिश्रण असते. मात्र हा वायू सहज साठवण, हाताळणी आणि वाहतुकीसाठी दाब देऊन द्रव अवस्थेत रुपांतरीत केला जातो आणि सिलिंडरमध्ये भरला जातो. हा वायू कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायूचे भंजन करुन मिळवला जातो. एलपीजीमधील हायड्रोकार्बन्समध्ये मुख्यत्वे ब्युटेन आणि प्रोपेन हे घटक असतात. त्यात अल्प प्रमाणात समाविष्ट असणा-या इतर घटकांपैकी काही पुढीलप्रमाणे: आयसोब्युटेन, ब्युटिलीन, एन-ब्युटेन, प्रोपिलीन, इ.

एलपीजीचे उपयोग कोणते?

एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणस्नेही आणि निरोगी इंधन मानले जाते. घरगुती वापराशिवाय इतरही विविध औद्योगिक आणि व्यापारी कारणांसाठी एलपीजी वापरला जातो.

बाजारात एलपीजी सिलेंडर कोणत्या वजनामध्ये उपलब्ध असतात?

सर्वसाधारणतः एलपीजी सिलेंडर्स ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागात हाताळण्यास सोप्या अशा ५ किग्रॅच्या सिलेंडरमध्ये मिळतात तर घरगुती वापरासाठी १४.२ किग्रॅ वजनामध्ये मिळतात. व्यापारी आणि औद्योगिक वापरासाठीचे सिलेंडर्स १९ आणि ४७.५ किग्रॅमध्ये उपलब्ध असतात. काही कंपन्या घरगुती वापरासाठी १२ किग्रॅचे सिलेंडर्सही विकतात.

घरगुती वापराचे सिलेंडर्स मोटारवाहने, एलपीजीवर चालणारी इतर उपकरणे किंवा इतर कारणांसाठी वापरता येऊ शकतो का?

नाही. एलपीजी नियमन आदेशान्वये, घरगुती एलपीजीचा वापर मोटारवाहने किंवा इतर कारणांसाठी वापरण्यास बंदी आहे.

भारतातील घरगुती एलपीजीच्या विपणनामध्ये कोणत्या कंपन्या समाविष्ट आहेत

 1. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि http://www.iocl.com
 2. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि http://www.ebharatgas.com
 3. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि http://www.hindustanpetroleum.com

नवीन घरगुती एलपीजी कनेक्शन मिळवण्याची पद्धत काय?

घरगुती एलपीजी कनेक्शन मिळवण्यासाठी घरगुती एलपीजीच्या विपणनामध्ये असणा-या एखाद्या कंपनीच्या डिलरशी संपर्क साधा. तुमच्या जवळच्या डिलरची माहिती मिळवण्यासाठी संबंधित कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.

नवीन जोडणीसाठी अर्ज करताना निवासाच पुरावा म्हणुन खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागते :
शिधापत्रिका, वीजबिल, दूरध्वनी बिल, पासपोर्ट, जेथे नोकरी करता त्याचे प्रमाणपत्र, फ्लॅटचे पझेशन लेटर, घरनोंदणी कागदपत्रे, एलआयसी पॉलिसी, मतदार ओळखपत्र, भाडेपावती, पॅनकार्ड किंवा वाहनचालक परवाना. काही राज्यांमध्ये नव्या जोडणीसाठी शिधापत्रिका सादर करणे बंधनकारक आहे.

सिलेंडर्स आणि रेग्युलेटरसाठी सुरक्षा अनामत म्हणुन काही रक्कम द्यावी लागते. या रकमेची तुम्हाला सबस्क्रिप्शन व्हाऊचर (एसव्ही) दिला जातो. हा सबस्क्रिप्शन व्हाऊचर जपून ठेवावा कारण तो भविष्यात जोडणीच्या स्थलांतर संदर्भात त्याची गरज भासते.

घरगुती एलपीजी जोडणी स्थलांतरीत कशी करावी?

 1. शहरामध्ये किंवा नजिकच्या शहरामध्ये स्थलांतरीत करणे
  • सद्य वितरक एसव्ही दाखविल्यावर स्थलांतरणाची कागदपत्रे तयार करेल.
  • एसव्ही स्थलांतरणाच्या कागदपत्रांसह नविन वितरकाला सादर करणे आवश्यक आहे. नविन वितरक मुळ एसव्हीला मंजुरी देईल आणि स्थलांतरणाला मान्यता देईल. स्थलांतरण कागदपत्रे आणि एसव्ही जपून ठेवावीत.
  • यावेळी सिलेंडर आणि रेग्युलेटर परत करण्याची गरज नाही.ते ग्राहकाने नवीन जागी नेणे अपेक्षित असते.

 2. दूरच्या ठिकाणी स्थलांतर करणे
  • मागणी पत्र आणि एसव्ही सादर केल्यानंतर सध्याच्या ठिकाणचा वितरक टर्मिनेशन व्हाऊचर (टीव्ही) देईल. उपकरणे (सिलेंडर्स किंवा/आणि रेग्युलेटर) परत केल्यावर तो/ती एसव्हीवर लिहिलेली सुरक्षा रक्कम तुम्हाला परत करेल.
  • टिव्हीमध्ये लिहिलेली सुरक्षा रक्कम पुन्हा नविन ठिकाणी भरुन तुम्हाला जोडणी परत मिळवता येईल. नवीन एसव्ही मिळवा आणि ती सुरक्षित ठेवा.

एलपीजी जोडणी जोडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

जेथे गॅसची जोडणी करणार आहात ती जागा खूप महत्त्वाची आहे. म्हणुनच खालील गोष्टींची काळजी घेतली तर अपघात टाळता येऊ शकतात.

 1. जेथे एलपीजी ठेवायचा आहे ती जागा हवेशीर असावी. तिला समोरासमोर वायुविजन होईल अशी रचना असावी. दारेखिडक्या बंद असणा-या खोलीत कधीही एलपीजी वापरू नये.
 2. सिलेंडर, रेग्युलेटरचे बटन आणि रबरी नळी हात पोहोचेल अशा पद्धतीने ठेवलेली असावीत.
 3. सिलेंडरचा वापर नेहमी जमिनीवरच करावा. तळघरात/ जमिनीखाली एलपीजी वापरू नये.
 4. सिलेंडर कपाटात बंद करुन ठेवणार असाल तर कपाटाच्या दाराला वरुन आणि खालुन अर्धा इंचाची फट असावी.
 5. शेगडी जमिनीवर मांडू नये. ती नेहमी टेबलावर किंवा ओट्यावर उभे राहुन जेवण बनविता येइल अशा पद्धतीने ठेवावी. लाकडी टेबल यासाठी वापरू नये. जर टेबल लाकडी असेल तर त्यावर ऍसबेस्टॉसची शीट ठेवा आणि त्यावर शेगडी ठेवा.
 6. उपकरण थेट खिडकीसमोर ठेवू नका. खिडकीतुन जोरदार हवा आल्यास बर्नरची ज्योत विझुन खोलीत गॅसची गळती होण्याची शक्यता असते.
 7. उपकरण एका बाजुने सरळ भिंत असणा-या टेबल किंवा ओट्यावर ठेवावीत. शेगडीची मागील बाजू भिंतीकडे असावी. या भिंतीवर कोणतीही मांडणी किंवा रॅक्स असू नयेत. या भिंतीवर ठेवलेली एखादी वस्तू काढण्याकरीता तुम्ही वाकाल आणि तुमचे कपडे बर्नरची आग पकडतील यासाठी ही सुचना आहे.
 8. एका खोलीत दोनपेक्षा जास्त सिलेंडर्स ठेवू नयेत. दोन सिलेंडर्स ठेवण्यासाठी स्वयंपाकघर किमान १० चौ. मी चे असावे.
 9. सिलेंडर नेहमी उभ्या स्थितीमध्ये ठेवावा. ते आडव्या किंवा इतर दुस-या स्थितीत ठेवल्यास त्यांच्यातील द्रवरूप एलपीजी उघड्या व्हॉल्व्हमधुन बाहेर येईल आणि घातक परीस्थिती निर्माण होईल.
 10. गॅस उपकरणांच्या अवतीभवती एक मीटरच्या अंतरामध्ये इलेक्ट्रिक ओव्हन, केरोसीन स्टोव्ह असे कोणतेही उष्णता निर्माण करणारे पदार्थ ठेवू नयेत.
 11. सिलेंडरला थेट उन, पाऊस मिळेल किंवा धूळ बसेल अशा ठिकाणी ठेवू नये.
 12. सिलेंडरच्यावर कोणतेही भांडे, फडके, इत्यादी ठेवू नयेत.
 13. सुरक्षाकॅप नेहमी सिलेंडरच्या तीन हातांपैकी एकाला बांधुन ठेवावी जेणेकरुन व्हॉल्व्हमधुन गळती झाल्यास ती व्हॉल्व्हला लावुन व्हॉल्व्ह बंद करता येईल.
 14. रिकामे किंवा भरलेले सिलेंडर्स सुरक्षाकॅप लावल्याशिवाय ठेवू नका.
 15. रेग्युलेटर वापरताना नेहमी त्यावर दिलेल्या सुचना पाळा.

एलपीजी सिलेंडर वापरताना घ्यावयाची सर्वसामान्य काळजी कोणती?

 1. रिकामा सिलेंडर रेग्युलेटरपासुन वेगळा करणे:स्वयंपाकघर आणि शेजारच्या सर्व खोल्यांतील अगरबत्त्या, मेणबत्त्या, पूजेचे दिवे यासह सर्व वाती आणि ज्योती बंद करा. शेगडीचे सर्व बर्नर बंद करा. रेग्युलेटरचे बटन बंद करा. रेग्युलेटर पकडा आणि त्याचे बुश (काळी प्लास्टिकची घट्ट बसणारी रिंग) वर खेचा आणि हलकसे गोलाकार फिरवुन रेग्युलेटर वर उचला. अशा पद्धतीने रेग्युलेटर सिलेंडरच्या व्हॉल्व्हपासुन वेगळे होईल. सिलेंडरची सुरक्षा कॅप त्या व्हॉल्व्हला लावा. एक विशिष्ट क्लिक असा आवाज येईस्तोवर ती कॅप खाली दाबा. आता रिकामा सिलेंडर बाजुला काढा.
 2. भरलेला सिलेंडर जोडताना : वरची सुरक्षाकॅप काढण्यासाठी तिला खाली दाबा, तिची दोरी खेचा आणि दोरी खेचलेल्या अवस्थेत असतानाच सिलेंडरची कॅप उचला.सिलेंडरच्या आतमध्ये सिलींग रिंग आहे की नाही हे तुमच्या बोटांनी तपासुन पाहा. जर ही रिंग नसेल तर सिलेंडर वापरू नका. त्याची सुरक्षा कॅप पुन्हा लावुन ठेवा आणि तुमच्या गॅसवितरकाशी संपर्क साधा व सिलेंडर बदलुन घ्या.
 3. भरलेल्या सिलेंडरवर रेग्युलेटर बसवण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा :रेग्युलेटरचे बटन बंद आहे हे तपासा. रेग्युलेटर पकडा आणि त्याचे प्लास्टिक ब्लश वर खेचा. रेग्युलेटर सिलेंडरच्या व्हॉल्व्हवर उभे ठेवा आणि त्याची कडा सिलेंडरच्या व्हॉल्व्हच्या षटकोनाला स्पर्श करेपर्यंत त्याला खाली हळूवार गोलाकार पद्धतीने दाबा. काळे प्लास्टिक बुश सोडुन द्या आणि त्याला खाली दाबा. (तुम्हाला कदाचित क्लिक असा हलकासा आवाज येईल). प्रेशर रेग्युलेटर आता तुमच्या सिलेंडरवर घट्ट बसले आहे.
 4. बर्नर पेटवताना : रेग्युलेटरचे बटन घड्याळयाच्या काट्याच्या उलट्या दिशेने चालू स्थितीत येईपर्यंत फिरवा.जळती काडेपेटी बर्नरच्या जवळ पकडा आणि त्याचे बटन चालू करा.
 5. इतर : जेवण तयार करताना नायलॉन किंवा तत्सम कपडे वापरू नका.जेवणाची भांडी, उपकरणे कोणाचीही देखरेख नसताना सोडुन जाऊ नका.कधीही गॅसच्या उपकरणांचा कोणताही भाग तुम्ही स्वतः दुरुस्त करू नका, तपासू नका किंवा त्याच्याशी कोणती ही छेडछाड करू नका किंवा इतर कोणत्याही खोट्या मेकॅनिकला तसे करू देऊ नका.जेवण बनवुन झाल्यानंतर किंवा रात्री झोपताना रेग्युलेटर कधीही चालू ठेऊ नका.शेगडी पेटवताना आधी नेहमी गॅसचा वास येत नाही ना हे तपासा.स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा जेणे करुन तिथे उंदीर, झुरळी होणार नाहीत.

ग्राहकांसाठी सामान्य सुरक्षाविषयक सुचना कोणत्या?

 1. रबरी ट्यूब आणि प्रेशर रेग्युलेटरविषयी लक्षात ठेवायच्या बाबी:
 2. या गोष्टी नेहमी प्रमाणित दर्जाच्या असाव्यात (आयएसआय/ बीआयएस). केवळ अधिक्रुत वितरकाकडुनच बीआयएस प्रमाणित रबरी ट्यूब आणि एलपीजी रेग्युलेटर वापरावेत. ती कमीत कमी लांबीची असावी. जास्तीत जास्त तिची लांबी १.५ मीटर असावी. तुमच्या शेगडीचे नोझल रेग्युलेटरच्या नोझलच्या आकाराचेच असल्याची खात्री करुन घ्या. रबरी नळीचा आकारदेखिल त्या नोझलला योग्य असा असावा. तुमचा वितरक तुम्हाला याबाबतीत मदत करेल. या गोष्टी हात पोहोचेल अशा अंतरावर ठेवाव्यात. उष्णता आणि आगीपासुन त्यांना दूर ठेवा. शेगडी आणि रेग्युलेटरची नोझल पूर्णपणे झाकली जातील अशा पद्धतीने नळी जोडा. नळी बर्नरच्या उष्णतेने गरम होणार नाही याची दक्षता घ्यावी किंवा तिला वळ्या पडणार नाहीत हे पाहावे. तिला स्वच्छ करण्यासाठी केवळ ओल्या कपड्याचा वापर करावा. नोझलवर नळी चढावी म्हणुन साबण वापरू नये. नळीला छिद्र, तडे गेले आहेत का किंवा ती नरम पडले आहे का हे तपासावे. किमान दर वर्षांनी नळी बदलावी. ही नळी इतर दुस-या कोणत्याही वस्तूने झाकू नये.प्रेशर रेग्युलेटरदेखिल अत्यंत महत्त्वाचे असते. ते सिलेंडरच्या व्हॉल्व्हशी जोडलेले असते. रेग्युलेटर सिलेंडरमधुन येणा-या गॅसचा दाब नियंत्रित करतो आणि शेगडीला स्थिर दाबाने पुरवितो.

 3. गॅस सिलेंडर घेतेवेळी घ्यावयाची काळजी:

  कंपनीच्या सिलेंडरचे झाकण आणि कंपनीचे सील बंद असलेल्या अवस्थेत आहे हे तपासा. त्याच्या वापराविषयी तुम्हाला खात्री नसल्यास गॅस आणुन देणा-या व्यक्तीला समजावुन द्यावयास सांगा. सिलेंडर नेहमी जमिनीवरच ठेवावा.

 4. गॅस सिलेंडर वापरण्यापूर्वी काय करावे?
 5. सिलेंडर वॉल्व्हमध्ये रबरी O रिंग आहे हे तपासा. डोळ्यांनी तपासुन, साबणाचे पाणी वापरून किंवा वास घेऊन गळतीचे ठिकाण शोधावे. गळती शोधण्यासाठी कधीही काडेपेटीचा वापर करू नये. सिलेंडर नेहमी सरळ स्थितीत हवेशीर जागी ठेवावा. एलपीजी सिलेंडर कपाटात बंद करुन ठेवू नये. गॅसची शेगडी नेहमी सिलेंडरपेक्षा जास्त उंचीच्या ओट्यावर ठेवावी. सिलेंडर नेहमी इतर उष्ण पदार्थांपासुन/ स्त्रोतांपासुन दूर ठेवावा.

 6. गॅस सिलेंडर वापरुन झाल्यावर काय करावे?
 7. गॅस जेव्हा वापरात नसेल तेव्हा रेग्युलेटर बंद करुन ठेवावे. रिकामे सिलेंडर सुरक्षा कॅप लावुन थंड व योग्य वायूविजन असलेल्या ठिकाणी ठेवावेत.

जर गॅसचा वास येऊ लागला तर काय करावे?

एलपीजी वायू अवस्थेत असताना त्याला रंगहीन असतो किंवा वासही नसतो. त्यामुळे त्यामध्ये एक विशिष्ट वास मिसळला जातो ज्यामुळे गळती झाल्यास तो लगेच ओळखता येऊ शकेल. खालच्या स्फोटक पातळी मर्यादेच्या १/५ एवढा वायू हवेत मिसळला असला तरी त्याचा वास येतो.

जर गॅसचा वास येऊ लागला तर:

 • घाबरू नका. कोणतेही वीजेचे उपकरण चालू करू नका. बाहेरुनच मुख्य वीजप्रवाह बंद करा. गॅसशेगडीची बटने बंद आहेत हे तपासा. काडेपेटी पेटवू नका, अगदी गळती शोधण्यासाठी देखिल नाही. सर्व ज्योती, वाती, पणत्या, अगरबत्त्या विझवा. गॅसचे रेग्युलेटर घड्याळाच्या दिशेने फिरवुन बंद करा. सर्व दारे खिडक्या ऊघडा. तरीही वास येत असेल तर तुमच्या गॅसवितरकाला तातडीने बोलवुन घ्या. त्याची कार्यालयीन वेळ संपली असेल तर जवळच्या आपत्कालीन कक्षाला फोन करा. अनुभवी माणसाने रेग्युलेटर काढुन ठेवायला हरकत नाही. त्यानंतर सिलेंडरला सुरक्षा कॅप लावुन तो बंद करावा.

स्त्रोत: तेलविपणन संस्थांच्या वेबसाईट्स

अंतिम सुधारित : 6/29/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate