অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नसाखळी

अन्नसाखळी

अन्नसाखळी ( Food chain )

परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्‍याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. यामध्ये उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यांपर्यंत अन्नऊजेंचे क्रमवार ऊर्जांतरण होत असते. परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या आढळतात. परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात. प्रत्येक परिसंस्थेतील जैविक समाजाचे उत्पादक, भक्षक व अपघटक असे मुख्य तीन गट असतात. या प्रत्येक गटाचे आपापले विशिष्ट कार्य असते.

अन्नसाखळी हिरव्या वनस्पती किंवा स्वयंपोषित घटकांपासून सर्वोच्च भक्षकापर्यंत असते. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करताना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. यासाठी वनस्पतींकडून पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व हरितद्रव्यांचा (क्लोरोफिल) उपयोग केला जातो. यातून वनस्पती कर्बोदकांची (कार्बोहायड्रेटांची) निर्मिती करून अन्न म्हणून साठवून ठेवतात. म्हणजेच वनस्पती स्वयंनिर्मित अन्नावर जगतात व वाढतात. त्यामुळे वनस्पती उत्पादक ठरतात. तृणभक्षक प्राणी वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात व वनस्पतींमध्ये साठविलेली ऊर्जा ग्रहण करतात. हे तृणभक्षक प्राणी मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष्य असतात. म्हणजेच तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ऊर्जांतरण होते. यातच पुन्हा लहान मांसभक्षक प्राणी मोठ्या मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष्य बनतात. मानव मात्र वनस्पती व प्राणी यांवर जगतो. याचाच अर्थ वनस्पती, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी व मानव हे अन्नासाठी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. अशा अन्नसाखळीतून अन्नऊर्जा नेहमी निम्नपातळीवरील सजीवांकडून उच्च पातळीवरील सजीवांकडे संक्रमित होत जाते.

अन्नसाखळी

काही प्राणी (उदा., सहस्रपाद, भुंगेरे व माश्या यांच्या काही जाती, अनेक प्रकारचे कृमी) अपघटन होत असणार्‍या सेंद्रिय पदार्थाचे (गाळाचे) भक्षण करतात. त्यांना गाळभक्षी (डेट्रीव्होर) म्हणतात. काही प्राण्यांचे (उदा., गिधाडे, काही कीटक, रॅकून) अन्न हे मेलेल्या प्राण्यांचे शव असते. त्यांना अपमार्जक (स्कॅव्हेंजर) म्हणतात.

काही सूक्ष्मजीव (जीवाणू व कवके) हे वनस्पती आणि प्राणी यांच्या मृतपेशी आणि निर्जीव सेंद्रिय पदार्थ यांचे अपघटन करून आपले अन्न मिळवितात. या सूक्ष्मजीवांना अपघटक म्हणतात. यांनी गाळभक्षी आणि अपमार्जक यांनी मागे सोडलेल्या सेंद्रिय पदार्थांचेही अपघटन करतात. अपघटनातून कार्बन डाय-ऑक्साइड व पोषक द्रव्ये निर्माण होतात आणि निसर्गाला पुरविली जातात. गाळभक्षी, अपमार्जक आणि अपघटक या सजीवांच्या गटाचे कार्य परिसंस्था टिकून राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

अन्नसाखळीतील वेगवेगळ्या जैविक समाजांचे जे स्थान असते, त्याला पोषण पातळी म्हणतात. पहिली पोषण पातळी उत्पादक घटकांची म्हणजेच, हिरव्या वनस्पती व इतर स्वयंपोषी सजीवांची असते. त्यापुढील पोषण पातळी अनुक्रमे तृणभक्षक, मांसभक्षक प्राणी यांची असते. अन्नऊर्जा संक्रमणाच्या वेळी प्रत्येक पातळीवर ऊर्जा वापरली जात असल्यामुळे वरच्या पातळीकडे ऊर्जा कमीकमी होत जाते. अन्नसाखळीतील उच्च पातळीवरील भक्षकांची संख्याही घटते. एकाच सजीवाची वेगवेगळ्या अन्नसाखळीतील पोषण पातळी वेगवेगळी असू शकते.

प्रत्येक अन्नसाखळीतील दुव्यात भक्ष्य व एक भक्षक असे दोन घटक असतात. अन्नसाखळीत दोन, तीन किंवा अधिक वनस्पती किंवा प्राण्यांचे गट असू शकतात. वनस्पती किंवा प्राणी यांच्या गटानुसार अन्नसाखळी लघू किंवा दीर्घ म्हणून ओळखली जाते. लघू अन्नसाखळीत वनस्पती व प्राण्यांचे एक किंवा दोन गट आढळतात. उदा., गवत  हरिण सिंह या लघू अन्नसाखळ्या आहेत. जेव्हा एखाद्या अन्नसाखळीत उत्पादक प्राथमिक भक्षक द्वितीयक भक्षक तृतीयक भक्षक सर्वोच्च भक्षक असे सर्व गट आढळतात, तेव्हा त्या अन्नसाखळीला दीर्घ अन्नसाकळी म्हणतात. उदा., गवत नाकतोडा बेडूक साप ससाणा; जलवनस्पती सूक्ष्म जलचर लहान मासे मोठे मासे मानव या दीर्घ अन्नसाखळ्या आहेत.

स्थानांनुसार अन्नसाखळ्यांचे भूचर अन्नसाखळी व जल अन्नसाखळी असे दोन प्रकार पडतात. भूचर प्राण्यांची जमिनीवरील अन्नसाखळ्यांची उदाहरणे म्हणजे गवत हरिण सिंह; गवत ससा लांडगा सिंह. ज्या अन्नसाखळ्या जलाशयात आढळतात, त्यांना जल अन्नसाखळ्या म्हणतात. यामध्ये जलवनस्पती व जलचरांचा समावेश होतो. उदा., शैवाल कीटकांच्या अळ्या छोटे मासे मोठे मासे.

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate