आर्द्रभूमी परिसंस्थेत जैवविविधता असते. काही वनस्पती केवळ आर्द्रभूमी परिसंस्थेतच उगवतात व वाढतात. या वनस्पती जलपृष्ठावर आणि जलपृष्ठाखालीही वाढतात. ऑक्सिजन मिळविता यावा यासाठी वनस्पतींमध्ये अनुकूलन घडून आलेले असते. खारफुटी, शेवाळे, लव्हाळे, इतर गवतसदृश वनस्पती आर्द्रभूमीत वाढतात. काही मांसभक्षी वनस्पती गोड्या पाण्याच्या आर्द्रभूमीत वाढतात.
आर्द्रभूमी परिसंस्थेत जल-स्थलावरील प्राणी आढळतात. तसेच कासव, मगर, पाणघोडा, चिचुंद्री, झुरळे व विविध प्रकारचे पक्षीही आढळतात. भोवतालच्या प्रदेशातील प्राणीही या परिसंस्थेत येतात. काही नवजात मत्स्य प्रजातींचे हे निवासस्थान असते, तर काही मासे केवळ अंडी घालण्यासाठी येथे येतात किंवा पिलांना संरक्षण देण्यासाठी याचा उपयोग करतात. दीर्घकाळपर्यंत पाण्याबाहेर, खारफुटीच्या फांद्यांवर आणि झुडपांवर वावरणारा मडस्किपर मासा येथे आढळतो.
आर्द्रभूमी अनेक दृष्टींनी उपयुक्त असतात. परिसंस्थेतील सजीवांना त्या अत्यंत पोषक असतात. तसेच पूरनियंत्रण, जलसंस्करण, अवसादनातील घट, जलपुनर्भरण या दृष्टींनी या परिसंस्था महत्त्वाच्या असतात. पक्ष्याच्या आश्रयासाठी व प्रजननासाठी या अनुकूल असतात. काही मासे आणि पशुपक्षी यांच्या निवासासाठी या सोयीच्या असतात. तसेच सागरकिनारा व सागरजल अतिक्रमण, मृदाक्षारीकरण यांसाठी प्रतिबंधक असतात.
आद्रभूमी ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहे. मानवी हस्तक्षेपामुळे बहुतांशी परिसंस्था प्रदूषित झाल्या आहेत. रामसर करारानुसार या परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी १५० राष्ट्रे सहभागी झाली आहेत. विशेषत: अवक्षय होणार्या सजीवांच्या संधारणासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
भारतातील २४ राज्यांत ९४ आर्द्रभूमी निश्चित करण्यात आल्या असून त्यांसाठी ‘राष्ट्रीय आर्द्रभूमी संधारण कार्यक्रम’ अंमलात आणला जात आहे. कोकणातील किनारी भागात आर्द्रभूमी संधारण कार्यक्रम राबविला जात आहे.
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
जैवविविधता संवर्धन व दस्तऐवज बनविण्यासाठी माधव गाड...
संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश अस...
जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजी...
जैवविविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी ह...