অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंगलाला आग का लागते ?

जंगल हे फक्त वन्य प्राण्यांचे घर आणि वन्य जीवन नव्हे. ते तर धरोवर आहे देशाचे. वनात अनेक जीव, झाडे, पशु-पक्षी वास करतात. औषधी वनस्पती दुर्मिळ आढळतात. हे सर्व इथे एकत्रपणे राहतात आणि वाढतात. पण या शांततेला कधी कधी वणवा लागतो. उत्तर भारतात वणवा प्रकर्षाने जाणवतो. भारताच्या उत्तराखंड या राज्यात वणवा पेटणे ही नेहमीची बाब झाली आहे. अलिकडेच वणव्याच्या ८० घटना नोंदविण्यात आल्या.

वणव्याची लक्षणे आणि कारणे

फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या हफ्त्यानंतर ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत वणवा लागण्याची शक्यता असते. पाऊस पडेपर्यंत वणवा लागू शकतो. २०१६ साली पहिला वणवा ०२ फेब्रुवारीला लागला अशी बातमी मिळाली. म्हणजेच नेहमीपेक्षा थोडी लवकर सुरु झाली ही प्रक्रिया.वणवा हा तीव्र उष्णतेने लागू शकतो. सुकलेल्या पाल्या-पाचोळ्यावर जेव्हा तीव्र सूर्य किरण पडते तेव्हा ज्वलन प्रक्रियेने आग लागू शकते. ही आग हळूहळू पसरते आणि मग वाऱ्यामुळे विशाल रूप धारण करते. कधी तर या आगीचे रूप खूप भयानक असते आणि आग आटोक्यात आणताना वन विभागाची दमछाक उडते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे कोणाचा यावर ताबा राहत नाही किंवा ताबा ठेवता येत नाही. बऱ्याचदा वणवा मानवाच्या निष्काळजी वृत्तीमुळे सुद्धा लागतो.गृह मंत्रालयाच्या आधीन असलेले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आपत्ती व्यवस्थापनच्या अहवालाप्रमाणे वर्ष २०१२ मध्ये भारताच्या अर्ध्या जंगलामध्ये वणवा लागला होता. 95 टक्के वणवा हा मानवी हलगर्जीपणा आणि मानवाच्या चुकीच्या वृत्तीमुळे लागतो. उत्तराखंडमध्ये तीन लोकांना जंगलात सुकलेल्या पानांचा जाळ करताना पकडले. काही लोकं नवीन चांगले गवत उगवावे म्हणून शिवार आणि सुकलेल्या जमिनीचा काही पट्टा पेटवून देतात. यामुळेसुद्धा वणवा लागतो. मधाचे पोळे जाळताना आगीचा उपयोग सुद्धा वणव्याला निमंत्रण देते.

वन विभाग हे आव्हान कसे पेलवतात…

उत्तराखंड वन विभागाने एकूण ९००० कामगार वन देखरेखीसाठी तैनात केले आहेत. त्यातील ३५०० कामगार हे नियमित कार्यरत असतात व उरलेले रोजंदारीवर आहेत. गरजेप्रमाणे बोलवले जातात.राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नागरिक सुरक्षा आणि राज्य आपत्ती निवारण दल यांच्या तीन तुकड्याबरोबर हे सर्व लोक काम करतात. आग विझविण्यासाठी जुने उपाय नेहमीच कामी येतात. हिरव्या तुटलेल्या फांद्यांनी आग विझविता येते. पण ही एक वेळ घेणारी आणि मोठी प्रक्रिया आहे. शिवाय यात धोका आहे, कारण आग कधीही विक्राळ रूप घेऊ शकते.भारतीय वायू सेनेची मिग-१७ जातीची दोन विमाने पाण्याचा वर्षाव वणव्यावर करीत असतात. विमानाने पाणी श्रीनगरमधील भीमताल तलावावरून आणि गरवाल येथून पुरविले जाते. सरकार लोकांना वणव्याविषयी जागृत करीत असते. लोकांना जंगलात काडेपेटी आणि त्या जातीच्या गोष्टी नेण्यास मनाई केली गेली आहे.

किती आणि केवढे नुकसान

हिमाचल राज्याचे एकूण ५७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कुठलीही जीवितहानी आतापर्यंत नोंदविण्यात आलेली नाही. वृक्ष हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. खरे नुकसान तर खत, मातीचा दर्जा, पाणी, बी-बियाणे आणि निसर्गाचे झाले आहे. वनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. प्राणी आणि पक्ष्यांना आपले घरटे पुन्हा उभे करावयास लागणार आहे.आगीमुळे जास्त प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. धुराने पूर्ण आसमंत भरून गेले होते आणि त्याचे परिणाम हवेत राहणार आहेत. अनेकदा लोकांना व पशु-पक्ष्यांना श्वास घेताना त्रास होतो. श्वासाचे आजार यावेळी जाणवतात. वातावरण अंधुक आणि अस्वच्छ जाणवते. परंतु निसर्गापुढे मानवाची काय बिशात. आपण फक्त दक्ष राहिले पाहिजे.वणवा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे वनामधील अनावश्यक गोष्टी संपून जातात व नवीन अंकुर फुटण्यास मदत मिळते. वनाला एक नवीन रूप आणि आयुष वणव्यामुळे प्राप्त होते. मातीचा दर्जा सुधारतो आणि कीड संपण्यास मदत होते. यावरून हेच स्पष्ट होते कि आपण जर निसर्गाची काळजी घेतली तर ती आपली काळजी घेईल.

 

लेखिका - सुजाता चंद्रकांत.

स्त्रोत : महान्यूज

 

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate