অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बदक

बदक

बदक

हा पक्षी सगळ्यांना माहीत आहे. ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे. या उपकुलात सु, १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदेश सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात. बदक हा पाणपक्षी आहे. काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किंवा समुद्र-किनाऱ्यावर होते.

बदक हंसापेक्षा लहान आणि शरीराने स्थूल असते. मान आणि पाय आखूड असतात. पाय शरीराच्या बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते; पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुंद, चापट व पिवळी असते; ती पातळ त्वचेने झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची रंगव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रंग सामान्यपणे पांढरा असतो;पण काहींचा काळा किंवा तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते; काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात.

बदके जमिनीवर डुलत डुलत चालतात. ती उत्तम पोहणारी व बुड्या मारणारी आहेत. ती वेगाने उडू शकतात, काही जातींची बदके फार दूरवर उडत जातात. पाण्यातील व जमिनीवरचे लहान-सहान प्राणी व किडे, धान्य, बी आणि रसाळ मुळे हे यांचे भक्ष्य होय. यांची घरटीसामान्यतः जमिनीवर असतात परंतु काही जाती झाडाच्या ढोलीत घरटी करतात. मादी ५-१२ पांढरी अंडी घालते. पाळीव बदकांना खुराड्यात ठेवतात व त्यांची अंडी कोंबड्यांकडून उबवितात. सुमारे एक महिन्याने पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात.

कर्वे, ज. नी. बदक - पालन

कोंबड्याप्रमाणे अंडी व मांस यांच्या उत्पादनासाठी बदके जगामध्ये सर्वत्र पाळली जातात. तथापि व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर ती फारच कमी प्रमाणात पाळण्यात येतात. भारतामध्ये बदके मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळण्यात येतात. भारतात अमेरिका व युरोपमधील देशांप्रमाणे त्यांचे मांस खाणे फारसे पसंत केले जात नाही. इंडोनेशिया (२.२ कोटी), तैवान ( ६५.८ लाख) व आग्नेय आशियातील काही देशांमध्ये बदकांची संख्या बरीच आहे.

अमेरिकेतील ६० टक्के बदके लाँग आयलंड या भागामध्ये आहेत. भारतामध्ये कुक्कुटपालनामधील एकुण पक्ष्यांमध्ये बदकांची संख्या ९ टक्के असून बहुसंख्य बदके पूर्व व दक्षिण भारतामध्ये आहेत. १९६६ च्या पशुधन गणनेनुसार भारतातील बदकांची संख्या ९९ लाखाच्या आसपास होती. पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या सर्वात जास्त म्हणजे ५३ लाख ३० हजारांच्या आसपास होती व त्यानंतर आसाम, तमिलनाडू, आंध्रप्रदेश, केरळ बिहार व ओरिसा या राज्यांच्या क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील बदकांची संख्या ४२,८०० होती.

देशी कोंबडीच्या मानाने गावठी बदके प्रतिवर्षी ३० ते ४० जास्त अंडी देतात. शिवाय त्यांची देखभालही फारशी करावी लागत नाही;यामुळे खेड्यामध्ये ती पाळली जातात, असे दिसते. भारतामध्ये अंड्यांच्या एकूण उत्पादनापैकी १६ टक्के अंडी बदकांची (४०.१४ कोटी) असून प्रत्येक अंड्याचे वजनही कोंबडीच्या अंड्यापेक्षा १४ ते २१ ग्रॅम जास्त असते. बदकाच्या अंड्याचे पोषणमूल्य कोंबडीच्या अंड्याप्रमाणेच आहे. तथापि त्यांना मासळीसारखा वास येत असल्यामुळे बाजारात कमी दर मिळतो. छायाचित्रण, रंग इ. अनेक औद्योगिक क्षेत्रांत मगात्र त्यांचा वापर मोठ्या प्रमाणवर होतो.

पाळीव बदकांच्या १८ जाती आणि ३४ प्रकार असून ते सर्व दक्षिण अमेरिकेतील मस्कोव्ही व उत्तर गोलार्धातील मॅलार्ड या रानटी बदकांच्या दोन जातींपासून उत्पन्न झाले आहेत. पाळीव जातींमध्ये ‌ तऱ्हेतऱ्हेचे रंग दिसून येतात; शिवाय त्यांचे वजनही रानटी जातींपेक्षा तिप्पट असू शकते. बहुसंख्य जाती मॅलार्ड या जातीपासून निघालेल्या आहेत.

कँबेल जातीमधील खाकी कँबेल ही बदकाची जात अंड्याविषयी प्रसिद्ध असून तिच्यापासून सरासरीने वर्षाला ३६५ अंडी मिळालेली आहेत. कोंबड्यांची सरासरी क्वचितच ३०० अंड्यांपेक्षा अधिक असते. अंड्यांच्या बाबतीत खाकी कँबेलनंतर व्हाइट कँबेल, डार्क कँबेल व इंडियन (देशी) रनर या जातींचा क्रमांक लागतो. मस्कोव्ही, पेकिन व आयलेसबरी बया बदकांच्या जाती मांसोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.

अमेरिका व युरोपातील देशांमध्ये पहिल्या दोन जाती पाळल्या जातात, तर इंग्लंडमधिल लोक आयलेसबरी बदके पसंत करतात. या देशांमध्ये मांसोत्पादक बदकाच्या पिलांचे उत्पादन करणे हा एक संघटित व्यवसाय आहे. आयलेसबरी बदकांचे मांस पांढरे तर पेकिनचे पिवळे असते. आयलेसबरी बदकांची पिले ८ आठवड्यांची झाल्यावर (वजन ३.२ किग्रॅ.) तर पेकिन बदकांची पिले लहान असल्यामुळे ९ आठवड्यांची झाल्यावर खाण्यासाठी मारतात. वरील जातींच्या संकराने तयार केलेली पिले मांसोत्पदनात सरस असतात.

भारतामध्ये बदकांच्या पुढील जाती आहेत : इंडियन रनर, सिल्हेट मेटा व व्हाइट ब्रेस्टेड नागेश्वरी. इंडियन रनर बदके पांढऱ्या रंगाची असतात, तर सिल्हेट मेटा बदके तपकिरी रंगाची असून त्यांच्या पंखांची टोके काळी असतात व चोच पिवळी असते. नागेश्वरी जातीच्या बदकांचे शरीर काळ्या रंगाचे असते; पण छाती व गळा पांढरा असतो. वरील काही जातींच्या बदकांच्या माद्या व नर यांची सर्वसाधारण किलोग्रॅममधील वजने पुढीलप्रमाणे आहेत : इंडियन रनर १.५८ व १.८१, खाकी कँबेल २.०३ व २.२७, पेकिन ३.६ व ३.६, आयलेसबरी ४.०८ व ४.५४.


स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate