অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅमोनॉइडिया

अ‍ॅमोनॉइडिया

सेफॅलोपोडा प्राणिवर्गातील एका व सर्वांत मोठ्या गणाचे नाव. या गणाचे प्राणी आता पृथ्वीवर नाहीत; पण प्राचीन समुद्रात ते प्रचंड संख्येने असत व त्यांच्या दहा हजारांहून अधिक जातींच्या जीवाश्मांची (अवशेषांची) वर्णने प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या सर्वांत जुन्या जाती पूर्व डेव्होनियन कल्पातल्या (सु. ४२ ते ४० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) आहेत. तेव्हापासून तो जुरासिक कल्पापर्यंत (सु.१८.५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत) या गणाचा उत्कर्ष होत गेला व क्रिटेशस कल्पात (सु. १४ ते ९ वर्षांपूर्वींच्या काळात) अपकर्ष (ऱ्हास) होऊन त्या कल्पाच्या अखेरीस तो गण एकाएकी निर्वंश झाला.खडकांचे वय व निरनिराळ्या श्रेत्रांतल्या खडकांचे परस्परसंबंध ठरविताना अ‍ॅमोनॉइडियांच्या जीवाश्मांचा पुरावा आदर्श गणला जातो.

अ‍ॅमोनॉइडिया. (१ व २) हार्पोसेरस, (३ व ४) फायलोसेरस, (५) मॉर्टनिसेरस, (६) क्रायोसेरस, (७) मॅक्रोस्क्रॅफाइट्स, (८) लायटोसेरॅटिना, (९) हॅमाइट्स, (१०) बॅक्युलाइट्स, (११) टरिलाइट्स, (१२) अ‍ॅमोनॉइडियांच्या सेवन्या : अ) अ‍ॅनार्सेस्टिस, आ) जेफ्युरोसेरस, इ) प्रोलेकॅनाइट्स, ई) पॅरासेरॅटाइट्स, उ) फायलोसेरस.

अ‍ॅमोनॉइडियांच्या शरीरांचे मऊ भाग मिळालेले नाहीत. त्यांची कवचे मात्र जीवाश्मरूपात आढळतात. ती कोष्ठित (कप्पे असलेली) व सारतःनॉटिलसाच्या कवचासारखी असतात. अ‍ॅमोनॉइडियांचे कवच सामान्यतः द्विपार्श्व सममित (एका पातळीने ज्याचे दोन समान भाग होतात असे) व एका पातळीत सर्पिल (नागमोडी) असते. पण सरळ, अंशतः सर्पिल किंवा मळसूत्राकार व असममित कवचेही आढळतात. अशी कवचे असणारी गोत्रे विशेषतः क्रिटेशस कल्पात होती. कित्येक कवचांची पृष्ठे गुळगुळीत किंवा सूक्ष्म वृद्धिरेखा (वाढ कशी होत गेली ते दाखविणाऱ्या रेषा) असलेली अशी असतात. पण  नॉटिलॉइडियांच्या मानाने अ‍ॅमोनॉइडियांच्या कवचांच्या पृष्ठावर सामान्यतः अधिक ठळक व बरीच नक्षी असते. कित्येक कवचांच्या पार्श्वीय (बाजूच्या) पृष्ठांवर सरळ किंवा वक्र, अरीय वरंबे, दांडारे किंवा गाठी व पुटकुळ्या, तर कधीकधी गाठी-पुटकुळ्यांच्या रांगा असतात. कवचाची बाहेरची कडा गुळगुळीत व गोलसर किंवा चापट असते किंवा तिच्या मध्यावर वळणास अनुसरून जाणारा कणा असतो किंवा खोबण असते किंवा काठाच्या मध्यास समांतर व सममित अशा दोन खोबणी असतात.

अ‍ॅमोनॉइडियांच्या कवचांच्या द्वारकांचे (छिद्रांचे) अनेक प्रकार आढळतात. कित्येक द्वारकांचे काठ साधे व जवळजवळ सरळ असतात, पण इतर कित्येकांच्या बाजूच्या काठांची पुढे वाढ होऊन झडपांसारखे पल्लव (पदर) तयार झालेले असतात. असे पल्लव विशेषेकरून जुरासिक कल्पातील गोत्रांच्या कवचांत आढळतात. द्वारकांच्या काठांची आतल्या दिशेकडे वाढ होऊन तयार झालेली आकुंचित द्वारकेही आढळतात. बऱ्याचशा नॉटिलॉइडियांच्या व पुराजीव महाकल्पातल्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) अ‍ॅमोनॉइडियांच्या द्वारकांच्या बाह्य काठाशी अधोनाली-कोटर (नरसाळ्याची पोकळी) असते. मध्यजीव महाकल्पातल्या (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) अ‍ॅमोनॉइडियांच्या द्वारकात तसे कोटर नसते. बाह्य काठ सरळ असतो किंवा त्याची पुढे वाढ होऊन चोचीसारखा किंवा सळईसारखा प्रवर्धक (पुढे आलेला भाग) तयार झालेला असतो. त्याला 'चंचू' म्हणतात. अशा चंचू विशेषतः जुरासिक व क्रिटेशस कल्पांतल्या गोत्रांत आढळतात.

नॉटिलॉइडियांच्या मानाने अ‍ॅमोनॉइडियांच्या सेवन्या (शिवणी) अधिक वक्र व अधिक नागमोडी वळणाच्या असतात व सेवनीच्या स्वरूपावरून त्या दोहोंत भेद केला जातो. अ‍ॅमोनॉइडियांची गोत्रे किंवा गट ओळखण्यासाठीही सेवन्यांचा उपयोग केला जातो. म्हणून सेवन्यांच्या साच्यांचे सूक्ष्म अध्ययन करण्यात आलेले आहे. एखाद्या सेवनीचे द्वारकाच्या दिशेने पुढे गेलेले जे वळण असते, त्याला 'पर्याण' (खोगिरासारखी रचना) व मागे गेलेले वळण असते, त्याला 'पाली' (पाळ) म्हणतात. काही गोत्रांच्या पर्याणांच्या व पालींच्या रेषा साध्या, तर काहींच्या दंतुर किंवा किचकट वळणांच्या असतात. अधिक जुन्या अ‍ॅमोनॉइडियांच्या सेवन्या साध्या असतात व त्यांच्या पर्याण-पालींची संख्या अल्प असते; पण उत्तरोत्तर कालातील गोत्रांच्या सेवन्या अधिक जटिल होत गेल्या व पर्याण-पालींची संख्या वाढत गेली, असे स्थूल मानाने म्हणता येते. जुरासिक कल्पातल्या बहुतेक व क्रिटेशस कल्पातल्या बऱ्याचशा गोत्रांच्या सेवन्या जटिल असलेल्या आढळतात. क्रिटेशस कल्पातल्या अगदी अलीकडील गोत्रांपैकी एक गोत्र इंडोसेरस याच्या सेवनीतील पर्याण-पालींची एकूण संख्या पंचाहत्तर भरते.

कवचांच्या स्वरूपभेदांवरून अ‍ॅमोनॉइडियांचे पुढील तीन गट केले जातात

(१) क्लायोमेनिड्स : यांची निनालिका (अंशतः कॅल्शियमयुक्त असणारी आणि कवचाच्या सगळ्या कप्प्यांमधून जाणारी त्वचेची मध्यस्थित बारीक नळी) आतल्या कडेशी व पटग्रीवा (निनालिकेला आधार देण्यासाठी वाढलेला विभाजक पडद्याचा नळीसारखा भाग) मागे वाढलेली असते.

(२) गोनियाटिटिड्स : निनालिका बाहेरच्या कडेशी व पटग्रीवा

सामान्यतः मागे, पण काहींचा मुख्यतः मागे पण अंशतः पुढेही किंवा सर्वस्वी पुढे वाढलेल्या असतात.

(३) अ‍ॅमोनाइट्स : निनालिका बाहेरच्या कडेशी व सुरुवातीचे थोडे कोष्ठ वगळले, तर इतर सर्वांतील पटग्रीवा पुढे वाढलेल्या असतात व वरील दोन गटांच्या मानाने यांच्या सेवन्या अधिक जटिल असतात.

कित्येक अ‍ॅमोनाइटांना व गोनियाटाइटांना आपल्या कवचाचे द्वारक चकतीसारख्या झाकणाने बंद करून घेता येत असे. ते झाकण कायटिनाचे व एकाच तुकड्याचे किंवा कॅल्शियम कार्बोनेटाचे व दोन सुट्या किंवा दोन एकत्र घट्ट चिकटलेल्या तुकड्यांचे असे. कित्येक अ‍ॅमोनाइटांच्या शरीरकोष्ठात कॅल्शियम कार्बोनेटाच्या तुकड्यांची सुटी जोडी आढळते. असे तुकडे कवचाहूनही टिकाऊ असतात व त्यांचे स्वतंत्र जीवाश्म कधीकधी मोठ्या संख्येनेही आढळतात. कायटिनी झाकणाच्या तुकड्यास अनॅप्टिकस, कॅल्शियम कार्बोनेटाच्या सुट्या तुकड्यांच्या जोडीस 'अ‍ॅप्टिकस' व दोन तुकडे जोडून तयार झालेल्या एका तुकड्याच्या झाकणास 'सिनॅप्टिकस' म्हणतता.

अ‍ॅमोनॉइडियांचे कवच सारतः नॉटिलसाच्या कवचासारखे असल्यामुळे त्यांची शरीररचना व राहणी नॉटिलसासारखी असावीत, अशी कल्पना आहे. अ‍ॅमोनॉइडियांचा उत्कर्ष वेगाने झाला व सु. १.२५ सेंमी. व्यासाच्या सिंबाइट्स गोत्राच्या कवचापासून तो दोन मी. इतक्या व्यासाच्या पॅचीडिस्कस गोत्राच्या कवचापर्यंत निरनिराळ्या आकारमानांची कवचे असणाऱ्या त्यांच्या गोत्रांच्या प्राणी पूर्वीच्या समुद्रांत प्रचंड संख्येने असत. पण ते लौकरच निर्वंश झाले.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate