অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बी हॉक मॉथ

बी हॉक मॉथ

आज जगात हॉक मॉथ या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात. मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या पतंगांचे मोठे डोके आणि बटबटीत डोळे प्रामुख्याने नजरेत भरतात. हे त्यांचे बटबटीत डोळे वेगवेगळे रंगसुद्धा ओळखू शकतात असे आता अभ्यासानंतर सिद्ध झाले आहे. यांचे पुढचे पंख त्रिकोणी आणि निमुळते असून मागचे पंख आकाराने लहान आणि पुढच्या पंखांखाली झाकले जाणारे असतात. हे जरी पंख निमुळते आणि लहान असले तरी तरी त्यांची उड्डाणशक्ती अतिशत जलद म्हणजे ताशी ५० कि.मी. असते. ह्यातील कित्येक जाती उडता उडता डावीकडे किंवा उजवीकडे जाऊ शकतात किंवा अगदी उडता उडताच फुलांतील मधुरस पीऊ शकतात. हे पतंग सहसा सुर्यास्तानंतर उडताना दिसतात. काही काही जाती तर अगदी मध्यरात्रीनंतर उडताना आढळतात तर काही जाती अपवादात्मक दिवसाच उडताना दिसतात.

या हॉक मॉथ मधेही उड्डाणासाठी खास ओळखले जाणारे बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ आपल्याला फक्त पावसाळ्यातच दिसतात. बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ यासारखे पतंग फुलांवर मधाकरता झेपावताना तब्बल ३०० वेळा प्रतिसेकंद पंख हलवतात आणि हवेतल्या हवेतच, उडता उडता आपली लांब सोंड फुलांत खुपसून मध प्राशन करतात. त्यांची ही हालचाल एवढी जलद असते की आपल्याला उडताना त्यांचे फक्त शरीरच दिसते आणि पंखांची हालचाल जाणवून येत नाही. यातील बऱ्याचशा जातींचे पंख पारदर्शक असतात किंवा त्यावर बारीक नक्षी असते. पण म्हणूनच यांचे शरीर हे अतिशय रंगीत असते आणि त्यावर अनेक रंगाची पखरण दिसून येते. या पतंगांची अजून एक खासियत म्हणजे त्यांची लांबलचक सोंड. शरीरापेक्षा कीतीतरी मोठी लांब असलेल्या ह्या सोंडेने ते घंटेसारख्या खोलगट फुलांतील मध सुद्धा सहज पीऊ शकतात. या करता यांची सोंड अगदी १० ईंचापर्यंतसुद्धा लांब असू शकते. याच कारणासाठी ऑर्किड, पपई अश्या कित्येक झाडांचे परागीभवन खास या पतंगाकडून केले जाते आणि त्यासाठी ते आपल्यासाठी अतिशय उपकारक ठरतात.

या पतंगाची मादी त्यांच्या अन्नझाडाच्या पानाखाली एकेकटे अंडे घालते मात्र ती मादी एका हंगामात १००च्या आसपास अंडी घालते. हिरवट रंगाची ही अंडी जातीप्रमाणे ३ ते १० दिवसात उबून त्यातून अळी बाहेर येते. ह्या अळ्याही मोठ्या, जाडजूड असतात. ह्या अळ्यांना ओळखायची सोपी खुण म्हणजे त्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागावर एक शेपटीसारखे शिंग असते. ही अळी दिसायला नितळ, गुळगुळीत पण जाडजूड आणि गुबगुबीत असते. ह्यांचे रंग अगदी उठावदार असतात. ह्यात प्रामुख्याने हिरवा, पिवळा रंग असतो. त्यांच्यावर पट्ट्या पट्टयांची किंवा डोळ्यांची नक्षी असते. ह्या डोळ्यांच्या किंवा पट्ट्यांच्या नक्षीमुळे त्यांचा अविर्भाव एखाद्या सापासारखा किंवा भयावह असा दिसतो. यात सुद्धा जर त्यांना डिवचले अथवा त्यांना धोका जाणवला तर त्या आपले डोके खाली घालून मान आणि शेपटीकडचा भाग उंचावतात. कोषावस्थेकरता त्या झाडाखाली उतरून पालापाचोळ्यामधे अथवा मातीमधे कोष करतात किंवा चक्क मातीच्या आत शिरून मातीचा घुमटाकार आकार बनवून आत कोष करतात.

या जलद उडणाऱ्या पतंगाचे हवेतल्या हवेत, उडतानाचे छायाचित्र मिळवणे तसे थोडेफार कठिणच काम असते. एकतर इतर पतंगांपेक्षा हे पतंग आकाराने एकदम लहान असतात आणि त्यांचे पंखसुद्धा रंगीत नसतात त्यामुळे ते जंगलात पटकन सापडत नाहीत. यांना शोधण्यासाठी आधी ज्या फुलांमधे मध जास्त आहे अशी झाडे शोधावी लागतात आणि त्या ठिकाणी चक्क त्यांची वाट बघत बसावे लागते. यावेळी आपल्याकडे कॅमेरा, फ्लॅश अशी साधने असावी लागतात आणि "प्रचंड" वेळ थांबण्याची तयारी, चिकाटी असावी लागते. असा सर्व जामानिमा केला तरी आपल्याला योग्य असे छायाचित्र मिळेलच याची खात्री नसते कारण हे पतंग इतके जलद उडत असतात की त्यांच्यावर लेन्सनी फोकसिंग करणे कठिण असते.

जर का फोकसिंग केले की तेवढ्यात त्यांचा त्या फुलातला मध पिऊन होतो आणि ते दुसऱ्याच फांदीवर वळतात. त्या फांदीकडे आपण लेन्स वळवली की ते आपल्या अगदी जवळच्या फांदीवरच्या फुलावर झेपावतात. आता ही फांदी आपल्या लेन्सच्या “minimum” फोकसिंग अंतराच्या आत असल्यामुळे आपण तिच्यावर फोकसिंग करू शकत नाही आणि तो पतंग अगदी जवळ असला तरी आपण त्याचे छायाचित्रण करू शकत नाही. आता चक्क तो आपल्या जवळून लांब जाण्याची वाट आपल्याला बघावी लागते पण कदाचीत त्याचा तिथल्या फुलातील “इंटरेस्ट” संपतो आणि तो तिकडून निघूनही जाउ शकतो. त्यामुळे स्वत:च्या “frustration level” ची पातळी कुठपर्यंत जाउ शकते हे बघायचे असेल तर या पतंगाच्या छायाचित्रणाचा अनुभव नक्की घ्यावा.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate