অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉरपॉइज

पॉरपॉइज

पॉरपॉइज

(शिंशुक). हे नाव विशेषेकरून फोसीना वंशातील लहान, गोल तोंडाच्या, सदंत सागरी प्रण्याला देतात. त्यांचा समावेश फोसीफिडी कुलात होत असून ⇨डॉल्फिन, ⇨देवमासा व पॉरपॉइज यांचा मिळून सस्तन प्राणयांचा सीटॅसिया गण तयार होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधी व समशीतोष्ण कटिबंधी महासागरांत आहे.तसेच तो दक्षिण अमेरिका व आशियामधील अनेक मोठ्या नद्या-उपनद्यांत आढळतो. पॉरपॉइज व डॉल्फिन यांमध्ये स्पष्ट भेद पडेलअशी शास्त्रीय लक्षणे नहित; परंतू सामान्यत: पॉरपॉइज लहान असतो व त्याला डॉल्फिनाचे विशेषलक्षण असलेले चोचीसारखे नाक नसते.

वरकरणी माशासारखा दिसणारा पॉरपॉइज अधूनमधून पाण्याच्या पृष्टावर येऊन श्वासोच्छ्‌वास करतो, अपत्याला (पिलाला) जन्म देतो व त्याला अंगावर पाजतो. त्याचे पर सापेक्षत: लहान असले, तरी तो उत्तम पोहतो. तो समाज प्रिय प्राणी असून त्याच्या मेंदूचा उत्तम विकास झालेला असतो व एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी तो विशिष्ट वर्तनपध्दती व ध्वनी यांचा उपयोग करतो. तसेच त्याच्यातील उत्तम विकसित सोनार व्यूहाच्या [ पाण्यात बुडालेल्या एखाद्या वस्तूपासून निघणार्‍या वा तिच्यावरून परावर्तित होणार्‍या ध्वनितरंगांवरून त्या वस्तूचा ठावठिकाणा घेणार्‍या व्यूहाच्या; ⟶सोनार व सोफार] मदतिने तो पाण्यातील वस्तूंचा शोध घेऊ शकतो. त्याच्या अंगावर केस नसतात व सर्वसाधारणत: जाड गुळगुळीत त्वचेखाली उष्णता निरोधक चरबीचा थर असतो. तोंड रूंद असून ओठांची हालचाल होत नाही व खालचा जबडा थोडासा पुढे आलेला असतो. दातांची संख्या ८० ते १०० यांच्या दरम्यान असते. त्याचा रंग वरून काळा किंवा गर्द करडा व खालून पांढरा असतो.पर काळे असतात. तो हेरिंग, मॅकेरेल हे मासे, स्क्विड व इतर सागरी प्राणी असे विविध प्रकारचे सागरी जीव खातो. उन्हाळ्यात नर-मादीचा संयोग होतो व एक वर्षाच्या गर्भावधीनंतर सु. ९० सेंमी. लांबीचे एक पिल्लू जन्माला येते. पॉरपॉइज सु. ३० वर्षे जगत असावा.

सामान्य पॉरपॉइज (फोसीना फोसीना)सामान्य पॉरपॉइज (फोसीना फोसीना)हा सर्वांत लहान पॉरपॉइज असून तो १.२ -१.८ मी. लांब असतो. त्याचे वजन सु. ४५ किग्रॅ. असते. तो उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात तसेच भारताच्या सागरी किनार्‍यावर आढळतो. काळा परहिन पॉरपॉइज [ निओफोसिना (नियोमेरिस) फोसिनॉयडिस ] पॅसिफिक व हिंदी महासागरांत आणि चीनच्या पिवळ्या नदीत १,६०० किमी. आतपर्यंत आढळतो. त्याच्या सर्व सवयी सामान्य पॉरपॉइजसारख्या असतात. दक्षिण अमेरिकेतील नद्यांमधील पॉरपॉइज अंध असून पाण्यातून आपला मार्ग काढण्यासाठी त्याला त्याच्या सोनार व्यूहाचा चांगला उपयोग होतो.

पॉरपॉइजाचा अन्न् म्हणून उपयोग होतो. त्याचे मांस डुकराच्या मांसासारखे (पोर्कसारखे) असून त्याचा वास बहुतेकांना आवडत नाही.सामान्य पॉरपॉइजाच्या डोक्यापासून व जबड्यांपासून मिळिवलेल्या मऊ चरबीचा (तेलाचा) उपयोग घड्याळे व कठीण पोलादापासून बनविलेल्या इतर यंत्रांमध्ये वंगण म्हणून होतो. हे तेल ⇨ऑक्सिडीभवनाने चिकट व दाट होत नाहि, ते धातू खात नाही व अथी कमी (नीच) तापमानास गोठत नाही. पूर्वी ते दिव्यात जाळण्यासाठी वापरीत असत.

पॉरपॉइज, डॉल्फिन व देवमासे यांच्या बद्दलच्या विविध बाबींचाअभ्यास करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय आयोग नेमण्यात आला असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाय सुचविण्याची कामगिरी त्यावर सोपविण्यात आली आहे.

 

जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate