डिप्नोई गणातील माशांना फुप्फुसमीन म्हणतात. त्यांना क्लोम (कल्ले) व फुप्फुसासारखे कार्य करणारा वायुकोश (हवेची पिशवी) असल्यामुळे ते पाण्यात व हवेतही श्वसन करू शकतात. नाकपुड्यांची एक जोडी तोंडात उघडते. स्थलचर (जमिनीवर राहणाऱ्या) पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांशी साधर्म्य दर्शविणाऱ्या यांच्या इतर संरचनांपैकी एक संरचना म्हणजे अंशतः विभागलेले अलिंद (हृदयातील अशुद्ध रक्ताचा कप्पा) हे होय.
आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिकेत फुप्फुसमीन आढळतात. आफ्रिकेतील व दक्षिण अमेरिकेतील फुप्फुसमिनांना अंस व श्रोणी पक्ष (छातीवरील व कटी प्रदेशावरील पर; पर म्हणजे हालचालीस व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची स्नायुमय घडी) असतात व ते गोल चाबकांप्रमाणे दिसतात. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) व पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) गुदपक्षांशी अखंड असतात. ऑस्ट्रेलियन फुप्फुसमिनांच्या परांच्या जोड्या असतात व ते वल्ह्यासारखे दिसतात.
फुप्फुसमीन प्रदूषित पाण्यात जगू शकतो. कारण तो पाण्याच्या पृष्ठभागावरील हवेचे श्वसन करू शकतो. ज्या माशांना श्वसनासाठी पाण्यातील ऑक्सिजनावर अवलंबून रहावे लागते, असे मासे प्रदूषित पाण्यात मरतात. उन्हाळ्यात तळी अटून गेल्यावरही हे मासे जगू शकतात. उन्हाळ्यात तळी आटू लागली म्हणजे ते आपल्या शरीराभोवती चिखलाचे कवच तयार करतात; हवा जाण्यासाठी या कवचाला छिद्र असते व या कवचाला कोश म्हणतात.
पुढचा पावसाळा येईपर्यंत ते त्यांत राहातात. ते कोशाला आतून आपल्या शरीरातील श्लेष्माचे (बुळबुळीत पदार्थाचे) अस्तर लावतात. शरीरात साठविलेल्या चरबीवर ते दिवस कंठतात. या अवस्थेला ग्रीष्मनिष्क्रियता किंवा उन्हाळ्यातील अर्धवट अथवा पूर्ण गुंगीची अवस्था म्हणतात.
आत फुप्फुसमीन असलेली कवचे विनासायास गोळा करून दूरवर पाठविली जातात. ही कवचे कोमट पाण्यात टाकल्यास चिखल मऊ होऊन फुप्फुसमीन बाहेर पडतात.
सेरॅटोडोंटिडी कुलात क्वीन्सलँडमधील (ऑस्ट्रेलिया) निओसेरॅटोडस (किंवा एपिसेरॅटोडस) फॉर्स्टेरी या एका जिवंत जातीचा समावेश होतो. या जातीचे मासे फक्त काही प्रसंगीच हवेत श्वसन करतात. ते सर्वभक्षक आहेत. त्यांची लांबी १·८ मी.पर्यंत असते. संबंधीत जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) जगाच्या विविध भागांत सापडले आहेत. त्यांचा अंतर्भाव सामान्यतः सेरॅटोडस या स्वतंत्र वंशात करावा, असे मत आहे.
माशांमध्ये फुप्फुसमिनांचे स्थान महत्त्वाचे आहे. संशोधनानंतर शास्त्रज्ञांच्या असे निदर्शनास आले आहे की, जमिनीवरील पृष्ठवंशी चतुष्पाद प्राणी व फुप्फुसमीन यांचे आप्तसंबंध असावेत.
लेखक - ज. वि. जमदाडे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अँग्विलिडी मत्स्यकुलातील अँग्विला वंशाचा मासा. या...
तिरंदाज माशाचा समावेश पर्किफॉर्मीस गणाच्या टॉक्झोट...
मासा हा नेहमी पाण्यात राहणारा प्राणी आहे. ग्रीस, इ...
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील...