(तांबट; हिं. कोंडाई; गु. लोद्री; क. मिरिदी; लॅ. फ्लॅकोर्टिया सेपिॲरिया; कुल—फ्लॅकोर्टिएसी). खूप फांद्या असलेल्या ह्या काटेरी झुडपाचा प्रसार कुमाऊँ, कोकणातील टेकड्यांच्या भागात, बंगाल, बिहार, ओरिसा, तमिळनाडू इ. ठिकाणी आहे. सामान्यत: काट्यावर पाने, फुले व फळे येतात. कोवळ्या फांद्यांवरची पाने एकाआड एक व जून फांद्यांवर ती झुबक्यांनी येतात. ती लहान, लांबट व देठाकडे निमुळती, गुळगुळीत व ताठर असतात. फुले द्विभक्तलिंगी, फार लहान, हिरवट व प्रदलहीन[फूल] असून पानांच्या बगलेत, एकाकी किंवा पानांपेक्षा आखूड झुबक्यांनी मार्चमध्ये येतात. फळ अश्मगर्भी (बाठायुक्त), लहान वाटाण्याएवढे, गोलसर, लालसर, गुळगुळीत, पांचट, पण खाद्य असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे फ्लॅकोर्टिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. साल तिळाच्या तेलात उगाळून संधिवातावर लावतात. कुंपणाच्या कडेने ही झाडे लावतात. पाने गुरेढोरे खातात. याचे फिकट लालसर व कठिण लाकूड नांगर, वासे, खांब, कोळसा इत्यादींकरिता उपयुक्त असते.
लेखक : ज. वि. जमदाडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 12/9/2019
लागवडी योग्य झाडांची माहिती.
कुंपणासाठी झाडांची समतल पद्धतीने लागवड करताना कमी ...
सजीव कुंपणासाठी घायपात, विलायती बाभूळ, निर्गुडी, क...