(गंधराज; हिं.बं.गु. सं. गंधराज; इं. केप जॅस्मिन; लॅ. गार्डेनिया फ्लोरिडा, कुल—रुबिएसी). बागेतील लोकप्रिय व अत्यंत समुधुर वासाच्या फुलांचे हे क्षुप (झुडूप) मूळचे चीन व जपान येथील आहे. शोभेकरिता, विशेषत: भरपूर पावसाच्या प्रदेशात, बागेत लावतात. उंची दोन मी. पर्यंत. साल काळी व खरबरीत; पाने समोरासमोर, साधी, लांबट, दीर्घवृत्ताकृती, गर्द हिरवी, चकचकीत, चिवट, जाडसर व आखूड देठाची; उपपर्णे पातळ, अंतर्वृंत्ती [पान] व जुळलेली; फुले एकाकी, मोठी, बहुधा फांद्यांच्या टोकास, आखूड देठावर, पांढरी, सुवासिक व दुहेरी पाकळ्यांची असतात; ती जुलै–सप्टेंबरमध्ये येतात. सर्वसाधारण शारीरिक लक्षणे रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. नारिंगी मृदुफळावर कंगोरे असून नारिंगी मगजात अनेक बिया असतात. फळ क्वचितच मिळत असल्याने नवीन लागवड छाट कलमांनी करतात. चिनी लोक चहाला फुलांचा वास व अन्नाला मगजाचा रंग देतात. कोकणात मुळांचा लेप डोकेदुखीवर लावतात. मज्जातंतुविकार, पाळीचा ताप, अग्निमांद्य इत्यादींवर मूळ गुणकारी असते. विरेचक, कृमिनाशक, आकडी बंद करणारे, जंतुनाशक इ. गुण या वनस्पतीत आहेत.
लागवडीकरिता निरोगी झाडांच्या तीनचार डोळ्यांच्या फांदीच्या छाट रेताड जमिनीत हिवाळ्यात लावतात. मुळ्या फुटल्यावर कुंडीत तीन भाग माती व एक भाग कुजलेले शेणखत घालून मे—जूनमध्ये त्यात भोवती माती चांगली दाबून लावतात. कुंडीत चांगली वाढ झाल्यावर कायम ठिकाणी लावून हाडांचा चुरा मिसळलेले शेणखत व पाणी देतात. झाडे वाढू लागल्यावर शेंडे खुडून मजबूत व पाचसहा फुले येणाऱ्या फांद्या देतात. पुष्कळ वर्षांपेक्षा वर्षभरच झाडे ठेवणे फायदेशीर असते. कळ्या आल्यावर खत दिल्यास फुले मोठी होतात.
लेखक : रा. मो. चौधरी कमला व श्री. हर्डीकर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कणखरपणामुळे गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते; मात...
गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल...
भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर, ...
ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कम...