फुलझाडांच्या [ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गात या कुलाचा समावेश असून बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरणपद्धतीप्रमाणे याला गणाचा दर्जा आहे व त्यात कॅनाबिनी, उल्मी, अर्टिकी, मोरी इ. सात उपगण अंतर्भूत आहेत. एंग्लर व प्रांट्ल यांच्या मते अर्टिकेलीझ या गणात अर्टिकेसी, उल्मेसी, मोरेसी व कॅनाबिनेसी या चार कुलांचा समावेश व्हावा; याला अनुसरून अर्टिकेसी कुलात सु. ४१ वंश व ४८० जाती आहेत. या वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांत आहे. यात चीक नसतो. पाने साधी, सोपपर्ण [पान] फुले लहान, एकलिंगी, नियमित व फुलोरे वल्लरी किंवा नतकणिश प्रकारचे [ पुष्पबंध]; परिदले ४ (बहुधा २ + २) क्वचित ५, सुटी किंवा जुळलेली, संदलासारखी; केसरदले तितकीच व परिदलसंमुख, कलिकावस्थेत आत वळलेली व पक्क झाल्यावर एकदम सरळ होऊन पराग उधळणारी. किंजपुट ऊर्ध्वस्थ; एकाच कप्प्यात एक ऊर्ध्वमुख बीजक असते. कुंचल्यासारखा किंजल्क एकाच किंजलावर असतो [फूल]. कृत्स्नफल (शुष्क व एकबीजी) बहुधा सतत राहणाऱ्या परिदलाने वेढलेले; बीजातील पुष्क (विकासावस्थेतील बीजाच्या पोषणास मदत करणारा एक भाग, बी) तैलयुक्त व गर्भ सरळ असतो. या कुलातील आग्या व मोठी खाजोटी या वनस्पतींना दाहक केस असतात. रॅमी व बनऱ्हीया ह्यांपासून उत्तम धागा मिळतो. पायलिया मायक्रोफिला ही वनस्पती बागेतील लोंबत्या कुंड्यांत शोभेकरिता लावतात.
लेखक : वि. रा. ज्ञानसागर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/25/2020
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
हे इंग्रजी नाव काही फुलझाडांना उद्देशून वापरले जात...