(गुंजन, पाथरफोडा; गु. मांज; हिं. गौली; क. मुल्लु-सिरू व्हन्ने; सं. सुविरक, महावीर; लॅ. ब्रायडेलिया रेट्यूजा; कुल—यूफोर्बिएसी). मध्यम आकाराचा हा पानझडी वृक्ष ९-१५ मी. उंच व १·५-१·८ मी. घेराचा असून भारतात सामान्यत: सर्वत्र तसेच श्रीलंका व पाकिस्तान येथे आढळतो. खोडावर करडी साल, कोवळेपणी फांद्यांवर काटे व इतर कोवळ्या भागांवर लव असते. पाने साधी, दीर्घवृत्ताकृती, साधारण चिवट, दातेरी, वरून गुळगुळीत व खालून थोडीफार लवदार; उपपर्णे लवकर गळतात; फुले हिरवट पिवळी, एकत्रलिंगी, कक्षास्थ (पानांच्या बगलेतील) गुच्छावर किंवा कणिशावर [पुष्पबंध] मे-ऑक्टोबरमध्ये येतात; पुं-पुष्पात प्रदलांना (पाकळ्यांना) लांब देठ व पंचखंडी बिंब असते; स्त्री-पुष्पातील प्रदले अर्धचमसाकृती (अर्धवट चमच्यासारखी); फळ रसाळ, गोल व वाटाण्याएवढे, पिकल्यावर काळे व खाद्य (ऑक्टोबर-जानेवारी). टॅनिनामुळे (१६-४०%) साल कातडी कमावण्यास उपयुक्त, मूळ व साल स्तंभक (आकुंचन करणारी); तिळाचे तेल व याची साल संधिवातावर चोळल्यास गुणकारी; लाकूड करडे, टिकाऊ, पाण्याचा दुष्परिणाम न होणारे व चांगली झिलई घेणारे असते. ते गाड्या, शेतीची अवजारे इत्यादींसाठी उपयुक्त. पाला गुरांना चारण्यास वापरतात. सामान्य शारीरिक लक्षणे यूफोर्जिएसी कुलाप्रमाणे.
लेखक : ज. वि. जमदाडे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/4/2020