हे इंग्रजी नाव काही फुलझाडांना उद्देशून वापरले जाते. शास्त्रीय दृष्ट्या त्यांचा अंतर्भाव भिन्न कुलांतील भिन्न वंशांत केलेला आढळतो: (१) इंग्लिश आयव्ही अथवा यूरोपियन आयव्ही (हेडेरा हेलिक्स, कुल - अॅरेलिएसी) ;(२) बोस्टन आयव्ही (पार्थेनोसिसस ट्रायकस्पिडॅटा ; कुल - व्हायटेसी) ;(३) जर्मन आयव्ही (हर्निअॅरिया ग्लॅब्रा ; कुल - कॅरिओफायलेसी) ;(४) ग्राउंड आयव्ही (नेपेटा ग्लेकोमा ; कुल - लॅबिएटी) ;(५) केनिलवर्थ आयव्ही (लिनॅरिया सिंबॅलॅरिया ; कुल- स्क्रोफ्यूलारिएसी) ;(६) पॉयझन आयव्ही (र्हस टॉक्सिकोडेंड्रॉन ; कुल- अॅनाकार्डिएसी) ;(७) इंडियन आयव्ही (फायकस प्युमिला; कुल - मोरेसी); (८) नेपाळ आयव्ही (हेडेरा नेपालेन्सिस ; कुल - अॅरेविएसी). सर्वसामान्यपणे व परंपरेने हेडेरा या नावाच्या वंशातील काही जाती व प्रकार यांनाच आयव्ही ही संज्ञा वापरात आहे.
वर उल्लेखिलेल्या सर्वच वनस्पतींना आयव्ही म्हणण्याचे कारण त्यांचे सामान्य स्वरूप व पाने यांतील हेडेराच्या काही जातींशी दिसणारे साम्य होय.
हेडेरा (कुल- अॅरेलिएसी; गण अंबेलेलीझ) या वंशात पाच (किंवा सहा) जाती असून त्यांपैकी काही काष्टमय व आगंतूक, वायवी मुळांनी चढणाऱ्या सदापर्णी वेली [ महालता] आहेत. त्यांचा नैसर्गिक प्रसार अमेरिकेखेरीज इतर देशांतील समशीतोष्ण प्रदेशांत आहे. यांची पाने साधी, एकाआड एक, अखंड किंवा कमी अधिक दातेरी किंवा खंडयुक्त व लांब देठांची काही जाती त्यांच्या पानांचा आकार व रंगवैचित्र्य यामुळे शोभिवंत दिसतात व त्यामुळे त्यांना उद्यानांत स्थान प्राप्त झाले आहे. यांची फुले लहान, पंचभागी, पूर्ण, बहुधा हिरवट किंवा पिवळट असून त्यांचे चवरीसारखे लहान फुलोरे मंजरी किंवा परिमंजरी यासारख्या [ पुष्पबंध] मोठ्या फुलोऱ्यावर फांद्यांच्या टोकांशी येतात. मृदुफळात ३-५ बिया असून नवीन लागवड कलमे किंवा बिया वापरून करतात. उत्तम सकस जमीन व सावली या जातींना मानवते. भिंतींचा पृष्ठभाग झाकण्याकरिता काही जातींची लागवड विशेषेकरून करतात. खडक, जाळीदार उभ्या चौकटी, पादपगृह (विशिष्ट प्रकारे काही वनस्पती वाढविण्याचे गृह), वृक्ष इत्यादींवर या वेली चढवून शोभा वाढविता येते. यूरोपियन (इंग्लिंश) आयव्हीचे अनेक प्रकार उद्यानांत लावले जातात.
नेपाळ आयव्ही: (हेडेरा नेपालेन्सिस, हे. हिमालइका; इं. टोब्लर नेपाल आयव्ही). ही मोठी वेल हिमालयात सु. ३००० मी. उंचीपर्यंत व आसामातील डोंगराळ भागात सु. १२००-१८०० मी. उंचीवर आढळते. हिचे खोड सु. ०.३ मी. व्यासाचे असून तिची पाने साधी, एकाआड एक व विविध आकाराची असतात; फुले पिवळट हिरवी, एकलिंगी व द्विलिंगी; मृदुफळे ०·३ सेंमी. व्यासाची, पिवळी किंवा लाल आणि बिया ३-५ व लंबगोल असतात. पाने व फळे उत्तेजक, ज्वरनाशी व विरेचक (तीव्र रेचक) असल्याचा उल्लेख आढळतो. ताजी पाने कडू असून त्यांना सुवासिक राळेसारखा वास येतो. कुलूमध्ये देशी मद्याला कडकपणा आणण्यास त्यांचा उपयोग करतात. केसांतील उवा मारण्यास पानांचा काढा लावतात. गुरे पाने खातात परंतु मनुष्यांना ती विषारी असतात असा समज आहे. संधिवातावर फळांचा रस देतात. खोडाच्या सालीतून पाझरणारा डिंक उत्तेजक व आर्तवजनक (विटाळ सुरू करणारा) असतो.
नेपाळ आयव्ही व इंग्लिश आयव्ही या दोन्ही वेली एकच असाव्या असा पूर्वी समज होता. परंतु त्या भिन्न आहेत. इं. आयव्हीची (हे. हेलिक्स) निलगिरीत लागवड केली आहे. हिच्या वर चढणाऱ्या खोडावर खंडयुक्त पाने व बाजूच्या फांद्यांवर साधी अखंड पाने व फुले असतात. पांढऱ्या शिरांनी भरलेल्या पानांचा एक प्रकार फार शोभिवंत दिसतो. इंग्लिश आयव्हीची पाने व काळी फळे विषारी असतात. त्यामुळे वांत्या व अतिसार होतो;पानांमुळे कातडीची आग होते;प्राण्यांना विषबाधा होते. या वनस्पत्तीत सॅपोनीन हे विषारी द्रव्य असते. या वेलीच्या आगंतुक मुळांच्या टोकास आधाराला चिकटणाऱ्या चकत्या असतात; बोस्टन आयव्हीलाही तशाच चकत्या प्रतानावर (तणाव्यावर) असतात.
इंडियन आयव्ही : (लॅ. फायकस प्युमिला;कुल-मोरेसी). दगडी किंवा लाकडी भिंतीवर अथवा मोठ्या वृक्षांवर आपल्या लहान आगंतुक मुळांच्या साहाय्याने चढणारी ही मोठी सदापर्णी वेल मूळची चीन व जपान ह्या देशांतून भारतात आणलेली असून आता तिचा प्रसार सर्वत्र झाला आहे;मात्र शोभेशिवाय तिचा दुसरा उपयोग नाही. बांधकाम झाकल्याने जेथे शोभा अधिक वाढते अशा ठिकाणी हिचा उपयोग करतात. पाने दोन प्रकारची (मोठी व लहान), सोपपर्ण (उपपर्णयुक्त), साधी, एकाआड एक, अंडाकृती, टोकदार, फुलोरा [कुंभासनी, पुष्पबंध] पानांच्या बगलेत, एकाकी;संयुक्त फळ ðअंजीर व उंबर यांसारखे [औदुंबरिक, फळ], ५ × ३ सेंमी. असून पिकल्यावर जांभळे होते. या वेलीच्या मुळ्यांतून येणाऱ्या चिकट द्रावाने ती मुळे आधारास चिकटतात. हिची नवीन लागवड कलमांनी करतात.
लेखक : वि. रा. ज्ञानसागर, शं. आ. परांडेकर,
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/2/2023
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे ख...
वनस्पती औषधी व क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...