किंकानेला (खब्बर, कांखीना; हिं. बहापिलू; सं. पिलू; लॅ. सॅल्व्हॅडोरा ओलिऑइड्स; कुल – सॅल्व्हॅडोरेसी). ⇨ मिरजोळीच्या वंशातील या लहान सदापर्णी वृक्षाचा प्रसार गुजरात, सिंध, बलुचिस्तान, पंजाब, राजस्थान, एडन इ. ठिकाणी आहे. याचे खोड लहान पिळवटलेले व वाकडे असून त्यावर अनेक कडक व सफेद फांद्या असतात. पाने साधी, पांढरट हिरवी, केशहीन, चिवट व पिकल्यानंतर थोडी मांसल, लांबट, गुळगुळीत, अस्पष्ट शिरांची असून टोकास बारीक काटा असतो. फुलोरा –परिमंजरी (→ पुष्पबंध); फुले हिरवट सफेद, लहान, बिनदेठाची असून कक्षास्थ (बगलेतील) परिमंजरीवरच्या कणिशात जानेवारी-मार्चमध्ये येतात. संवर्ताची दले चार, वाटोळी; पुष्पमुकुट त्यापेक्षा लांबट व प्रदले खाली अंशत: जुळलेली (→ फूल); फळ लहान, गोलसर, अश्मगर्भी (आठळीयुक्त) व जूनमध्ये पिकल्यावर पिवळे होते; ते आंबट गोड, खाद्य व वाजीकर (कामोत्तेजक) असते. पाने रेचक व कफनाशक; बियांचे फिकट हिरवे तेल संधिवातावर आणि बाळंतिणीस मर्दन करण्यास उपयुक्त; मुळांची साल लावल्यास फोड येतात. उंटांना उन्हाळ्याच्या प्रारंभी याची पाने खाण्यास फार आवडतात. लेखक: नवलकर, भो. सुं. स्त्रोत: मराठी विश्वकोश