অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिनार

चिनार

चिनार

(बना, बोनिन; इं. ओरिएंटल प्लेन, यूरोपियन प्लेन ट्री, ओरिएंटल सिकॅमूर लॅ. प्लँटॅनस ओरिएंटॉलिस; कुल-प्लँटॅनेसी). हा मोठा, सुंदर, सु. ३० मी. उंच व १२ मी. घेराचा पानझडी वृक्ष मूळचा पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून तेथून पूर्वेस त्याचा प्रसार झाला. वायव्य हिमालयात सतलजच्या पश्चिमेस १,२००-२,४०० मी. उंचीवर त्याची लागवड करतात या वृक्षाचा समावेश वनस्पतिविज्ञानात प्लँटॅनेसी कुलात (द्विदलिकित, आवृतबीज) करतात; या कुलामध्ये फुलात संदले व प्रदले ३-६ पुं.-पुष्पात संदलांइतकी केसरदले व तंतुहीन परागकोश; स्त्री-पुष्पात संदलांइतकी ऊर्ध्वस्थ मुक्त किंजदले व वंध्य केसरदले आणि प्रत्येक किंजपुटात एकच सरळ आणि लोंबते बीजक असते.[⟶ फूल]. बियांत पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) फारच कमी असतो.

चिनार वृक्षाचे खोड आखूड व पर्णसंभार डेरेदार व पसरट असतो.

साल फिकट करडी असून तिच्या मोठ्या ढलप्या निघतात. पाने साधी, सोपपर्ण (उपपर्णयुक्त) एकाआड एक व हस्ताकृती, ५-७ खंडयुक्त, १२-२० सेंमी. लांब व अधिक रूंद असतात. एकलिंगी फुले दाट, गोलसर स्तबकावर पण एकाच झाडावर येतात व फळांचा लोंबता गुच्छ सु. तीन सेंमी. व्यासाचा असून त्यात पुष्कळ, लहान, एकबीजी कृत्स्नफळे (एकबीजी, शुष्क व न फुटणारी फळे) असतात. पंजाबात व काश्मिरात शोभेचा वृक्ष म्हणून याला बरेच महत्त्व आहे.

मोठ्या उद्यानांत, कुंपनाच्या कडेने आणि रस्त्याच्या दुतर्फा मुद्दाम सावलीकरिता लावतात. त्याची क्वचित तोड करतात व खूप वाढू देतात. त्याला भारी, ओलसर व उत्तम निचऱ्याची जमीन लागते आणि ओढ्या-नाल्यांच्या काठांवर तो चांगला वाढतो. त्याला कडक थंडी बाधत नाही. प्रथम रोपे तयार करून छाट कलमे व दाब कमले करून त्याची अभिवृद्धी (लागवड) करतात; तो जलद वाढतो.

डोळे आल्यास ताजी पाने कुसकरून त्याचा लेप लावतात. साल शिरक्यात उकळून अतिसार, आमांश, अंतर्गळ (हार्निया) व दातदुखी यांवर देतात. सालीत रक्तपित्तव्याधी (क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येणारी अवस्था, स्कर्व्ही) रोधक व संधिवातरोधक गुणधर्म असतात. लाकूड पांढरे व त्याला पिवळी किंवा तांबूस छटा असते. ते सुबक मध्यम कठीण व वजनदार (दर घ. मी. चे वजन ६५७ किग्रॅ. असते, पण ते बळकट नसते. ते रापविताना वाकडेतिकडे होते, तथापि सावलीत चांगले टिकते; रंधून चांगले गुळगुळीत होते व त्याला उत्तम झिलई करता येते. काश्मिरात त्याचा उपयोग लहान पेट्या, भिन्न आकाराची तबके व तत्सम वस्तूंकरिता वापरतात; नंतर लाक्षारास व रंगलेप लावून त्या रंगवितात. आशियात व यूरोपात त्याचा उपयोग सजावटी सामान, कपाटे, पृष्ठावरणाचे तक्के, गाड्या, कोरीव व कातीव कामे, लगदा इत्यादींसाठी करतात.

सालीत १·५% प्लँटॅनीन, ५·९% टॅनीन व ७·३% टॅनीनेतर द्रव्ये असतात. प्ररोह (कोंब) व पाने यांमध्ये अ‍ॅलंटॉइन व मुळांत ६% फ्लोबॅफेन असते. या वृक्षाच्या रसात ९०% मॅनिटॉल असते. कळ्यांपासून जिबरेलिनासारखे वनस्पतिवृद्धिकारक द्रव्य वेगळे केले आहे. फळांशिवाय इतर सर्व भागांत प्लँटॅनोलिक अम्ल (ट्रायटर्पेन) आढळते.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate