অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निवगूर

निवगूर

निवगूर

(मारांदी; हिं. हर्कुकांत, हरकुच काटा; क. होळेचुळ्ळी; सं. हरिकुस; इं. सी-हॉली; लॅ. ॲकँथस इलिसिफोलियस; कुल-ॲकँथेसी). हे सदापर्णी झुडूप समुद्रकिनारी खारट चिखलात वाढते. याचा प्रसार भारत, श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका इ. देशांत आहे. याची अनेक गोलसर जाड खोडे सरळ वाढतात. पाने ७·५-१५ X ५·८ सेंमी., संमुख (समोरासमोर), साधी, जाड, चिवट, गुळगुळीत, दातेरी, काटेरी, नागमोडी व काहीशी खंडित असतात; तळाशी दोन उपपर्णी काटे असतात.

फुले अवृंत (बिनदेठाची), मोठी, निळी, जोडीने समोरासमोर व एप्रिल ते मेमध्ये येतात. बोंड (फळ) २·५ सेंमी. लांब, पिंगट, लंबगोल, गुळगुळीत व चकचकीत असून बी चपटे, वाटोळे व बीजावरण सुटे असते. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲफँथेसी कुलात (वासक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. याची पाने संधिवात व तंत्रिकाशूलावर (मज्जातंतूच्या तीव्र वेदनांवर) शेकण्यास उपयुक्त; सूजेवर पाने वाटून बांधतात. काढा अग्निमांध्यावर (भूक मंद झाल्यावर) देतात. पानांचा रस कफप्रधान रोगात व दम्यात गुणकारी असतो. पाला गुरे, शेळ्या व मेंढ्या यांना खाऊ घालतात.

 

लेखक-नवलकर, भो. सुं.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate