मोरस : (१) पाने व फुले यांसह फांदी, (२) फूल, (३) फळ.
मोरस : (हिं. लुनक, छोटी लानी; गु. उशुकलानी, मोरस; इं. सीब्लाइट; लॅ. स्पीडा फ्रुटिकोजा; कुल-चिनोपोडिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति,आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या वनस्पतींच्या) वर्गातील सु. ६०–१२० सेमी. उंचीचे हे झुडूप बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), अर्धवट सरळ वाढणारे असून पंजाबपासून पूर्वेकडे, उ. प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट येथे विपुल प्रमाणात आढळते. मोरसच्या प्रजातीतील जाती सर्वसाधारणपणे खार जमिनीत व समुद्रकाठी वाढतात. एकूण १०० जातींपैकी भारतात फक्त तीन जाती आढळतात. मोरसचे खोड व फांद्या बारीक जांभळट असतात. पाने फार लहान देठाची, रसाळ व विविध आकारांची पण बहुधा काहीशी शूलाकृती (लांबट व टोकदार) आणि तळाशी अरुंद असतात. फुले लहान प्रथम हिरवी व नंतर लालसर, दुर्गंधी, सच्छद, द्विलिंगी, एकेकटी किंवा दोन-तीनच्या गटाने, पानांच्या बगलेत नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. परिदले व केसरदले प्रत्येकी पाच; किंजल्क त्रिभागी आणि किंजपुटात एकच बीजक असते [→ फूल]. फळ (क्लोम) शुष्क, सच्छिद्र, एकबीजी व परिदल वेष्टित असते. बीज सु.१ मिमी. लांब, तिरपे-लंबगोल, चंचुयुक्त, काळे आणि चकचकीत असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे. ⇨ चिनोपोडिएसी वा चाकवत कुलात वर्णन केल्याप्रमाणेअसतात.
पानांचे पोटीस नेत्रशोथावर (डोळ्यांच्या दाहयुक्त सुजीवर) आणि पानांचा फांट [विशिष्ट प्रकारे करण्यात आलेला काढा; → औषधिकल्प] ओकारी होण्याकरिता देतात. यकृताच्या विकारात कोवळ्या पानांची भाजी खातात. उंट व बोकड पाला खातात; परंतु त्याना त्यामुळे पाणी अधिक प्यावे लागते. शेळ्यांनी पाला खाल्ल्यास काळा अतिसार होऊन मृत्यू येतो. साधारणतः एरवी उंटाखेरीज इतर जनावरे पाल्याला तोंड लावीत नाहीत. पाणथळ व खाऱ्या जमिनींचा उद्धार करण्यास मोरसची झाडे जवळपास रेताड मातीच्या राशीवर लावतात. सुकी झाडे जळणास वापरतात. स्वीडा प्रजातीतील स्वी. मॅरिटिमा व स्वी. न्यूडिफ्लोरा या जातींनाही मोरस म्हणतात.
संदर्भ : 1. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials, Vol. X , New Delhi .1976.
2. Kirtikar, K. R.; Basu ,B.D. Indian Medicinal Plants,Vol.III, New Delhi, 1975.
लेखक - ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
एरिओकॉलॉन : (इं. पाइपवर्ट; कुल-एरिओकॉलेसी). एकदलिक...
औषधी व विषारी वनस्पती आहे.
ज्वर, पटकी, कुष्ठ, संधिवात इत्यादींवर हे गुणकारी अ...
फुलझाडांपैकी हे सु. १–१·२५ मी. उंच, झुबक्यासारखे, ...