अभ्यास प्रकल्प
स. प. महाविद्यालय परिसरातील हरितगृहवायूंचे उत्सर्जन
डॉ. सुनील कुलकर्णी साहाय्यक प्राध्यापक बसवराज बबलेश्वर,
समीर सावंत विद्यार्थी सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
सर्व शैक्षणिक संस्थांकडून होणार्या हरितगृहवायू उत्सर्जनाचा एकत्रित विचार केला, तर एकूण कार्बन उत्सर्जनात या संस्थांचा सहभाग लक्षणीय असल्याचे स्पष्ट होते. म्हणून प्रत्येक संस्थेने आपआपल्या परिसरात होणार्या कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनाचे मापन करणे गरजेचे आहे. एका अभ्यास प्रकल्पाच्या माध्यमातून यासंदर्भात पुण्यातील स. प. महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. जाणून घेऊया या पथदर्शक अभ्यास प्रकल्पाविषयी...
कार्बन डाय-ऑक्साइड हा घातक अशा हरितगृहवायूंपैकी (ग्रीन हाऊस गॅसेस-GHGs) एक महत्त्वाचा वायू आहे. विविध मानवी आणि नैसर्गिक कृतींमधून त्याचे उत्सर्जन होत राहते. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण, जंगलतोड, शेतीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर, तसेच इंधन, कागद आणि इतर मानवनिर्मित स्रोतांचा अतिरेकी वापर या बाबींचा मानवी कृतींमध्ये समावेश होतो. तर ज्वालामुखींचा उद्रेक, जंगलांमध्ये भडकणारे वणवे, भूकंप इत्यादींचा समावेश नैसर्गिक कृतींमध्ये होतो. वातावरणात हरितगृहवायूंचे उत्सर्जन झाल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होते. तापमान वाढीमुळे मानवी जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम घडवून आणणारे अनेक वातावरणीय बदल होतात. टोकाचे कडक ऋतू, अवकाळी पाऊस, लांबलचक उन्हाळे, मानवी मृत्यूंना कारणीभूत ठरणारे महापूर, वनस्पती आणि प्राण्यांचा विनाश आणि या सर्वांमुळे होणारी प्रचंड आर्थिक हानी हे सगळे जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम आहेत.
नैसर्गिक स्रोतांपासून होणार्या हरितगृहवायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणणे फारसे शक्य नसते. मात्र, मानवी कृतींमुळे निर्माण होणारे हरितगृहवायूंचे उत्सर्जन कमी करता येऊ शकते. त्यासाठी हरितगृहवायूंचे मूल्यमापन करणे आणि त्यावर उपाययोजना आखणे या गोष्टी कराव्या लागतात. मानवी कृतींमुळे कार्बन डाय-ऑक्साइडच्या स्वरूपात उत्सर्जित होणार्या हरितगृहवायूच्या प्रमाणाचे मापन करणे म्हणजे कार्बन फूटप्रिंटिंग होय. मूल्यमापन करण्याच्या काळात उत्सर्जित झालेले कार्बन फूटप्रिंट्स कार्बन डाय-ऑक्साइड इक्विव्हॅलंट्स (CO2e) या वस्तूमानाच्या स्वरूपात मोजले जातात. या दृष्टीने विचार करता, मानवी वस्तीतील कार्बन फूटप्रिंट्सविषयी माहिती असणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यात घट करणे किंवा ते पूर्णपणे नष्ट करणे याविषयी विचार करणे शक्य होते. एखादा उद्योग, निवासी सोसायटी, उद्योगाचे कार्यालय किंवा एखादा अभियांत्रिकी उद्योग किंवा अगदी एखादी शैक्षणिक संस्था असो, तेथील कार्बन फूटप्रिंट्स मोजणे शक्य असते.
सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थांमध्ये विशेषतः भारताच्या पश्चिम भागात कार्बन फूटप्रिंट्सचे निश्चितीकरण होणे महत्त्वपूर्ण ठरते, कारण या परिसरात सुमारे 10 हजार महाविद्यालये आणि बरीच विद्यापीठे आहेत. या शैक्षणिक संस्थांमधून परिसरातील औद्योगिक वसाहतींना कुशल मानवी संसाधनांचा पुरवठा केला जातो. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था अनेक कार्यक्रम राबवितात, तसेच या संघटना पाणी, वीज, कागद आणि इंधन यांसारख्या महत्त्वपूर्ण स्रोतांचा वापर करतात. परिणामी कार्बनच्या उत्सर्जनात लक्षणीय वाढ होते आणि कार्बन फूटप्रिंट्समध्ये भर पडते. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांच्याकडून केला जाणारा संसाधनांचा वापर टाळता येणे शक्य नाही, कारण ही अव्वल दर्जाची विद्वत्ता केंद्रे असून, त्यांच्याकडून विकासासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा पुरवठा होत असतो. त्यामुळे राष्ट्र उभारणीच्या कामाचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
वैयक्तिकरीत्या विचार केला, तर एखाद्या शैक्षणिक संस्थेकडून होणारे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते; परंतु कित्येक संस्थांकडून होणार्या हरितगृहवायू उत्सर्जनाचा एकत्रित विचार केला, तर देशाच्या या भागातील एकूण कार्बन उत्सर्जनात या संस्थांचा सहभाग लक्षणीय असल्याचे स्पष्ट होते.
प्रस्तुत अभ्यास प्रकल्प ‘पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय परिसरातील हरितगृहवायूंचे होणारे उत्सर्जन’ यावर केंद्रित आहे. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय ही भारतातील एक अत्यंत जुनी शैक्षणिक संस्था आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील 25 एकरांत हे महाविद्यालय उभारण्यात आले आहे. या महाविद्यालयात आदर्श अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. येथे कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवस्थापन या विद्याशाखांचे एकूण 35 विभाग कार्यरत आहेत. बर्याच विभागांमध्ये पदव्युत्तर आणि पदव्युत्तर संशोधन (एम. फील. पीएच.डी.) शिक्षणाच्या सुविधाही आहेत. या पार्श्वभूमीवर कार्बन मापनाच्या (कार्बन फूटप्रिंटिंग) महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती वाढावी, अशीही अपेक्षा आहे. प्रस्तुत विषयावरील अभ्यास प्रकल्प महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शेठ यांचे सहकार्य आणि पाठबळ यामुळेच तडीस जाऊ शकला.
1. संशोधन पद्धती
हा अभ्यास प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला.
1. माहितीचे संकलन
2. माहितीचे विश्लेषण
3. विश्लेषणावर आधारित निष्कर्ष
1) शैक्षणिक वर्षाची निवड - या अभ्यासासाठी फेब्रुवारी 2013 ते जानेवारी 2014 अशा बारा महिन्यांच्या कालावधीची निवड करण्यात आली.
2) परिसराचे विभाजन - संपूर्ण परिसराचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आले. उदा. शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा संकुल, प्रशासकीय परिसर इत्यादी
3) प्रश्नावली तयार करणे - प्रत्येक विभागात वापरल्या जाणार्या संसाधनांनुसार माहिती संकलित करता यावी, या दृष्टीने प्रश्नावली तयार करण्यात आली. प्रत्येक विभागाकडून किंवा क्षेत्राकडून केल्या जाणार्या संसाधनांच्या वापरानुसार विभागनिहाय किंवा क्षेत्रनिहाय प्रश्न तयार करण्यात आले. योग्य आणि पुरेशी माहिती मिळावी, या दृष्टीने प्रश्नावलीत सर्वांगीण स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले.
यासाठी खालील कृती करण्यात आल्या.
कार्बनच्या प्रत्येक स्रोताची प्रचंड माहिती संकलित झाल्यामुळे यात आणखी सोपेपणा आणण्यासाठी सर्वच कार्बन स्रोतांचे अ) प्राथमिक स्रोत आणि ब) दुय्यम स्रोत असे दोन प्रकारात विभाजन करण्यात आले. इंधनाचे किंवा कोळशाचे ज्वलन यांसारख्या बाबींमधून वातावरणात थेट कार्बन डाय-ऑक्साइड सोडणार्या स्रोतांची व्याख्या प्राथमिक स्रोत अशी करण्यात आली. वीज, पाण्याचा वापर इत्यादींमुळे वातावरणात अप्रत्यक्षरित्या कार्बन डाय-ऑक्साइडचेे उत्सर्जन होते. म्हणून त्यांना दुय्यम स्रोत असे मानण्यात आले. कमाल प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणारे एकूण सात स्रोत ढोबळमानाने निश्चित करण्यात आले. प्राथमिक स्रोतांमध्ये मानवी घटक, वाहतूक आणि इंधन वापर यांचा समावेश करण्यात आला, तर दुय्यम स्रोतांमध्ये पाणी, कागद, घन कचरा आणि वीज यांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी वापरण्यात आलेली संशोधन पद्धती व माहिती संकलनाचा थोडक्यात गोषवारा आकृती 1 मध्ये नमूद केला आहे.
2) कार्बन मापनाचे (कार्बन फूटप्रिंट्सचे) विश्लेषण
भारतीय परिस्थितीत विविध घटकांपासून सर्वसामान्यपणे होणार्या कार्बन उत्सर्जनाचे निकष ठरविले आहेत, त्या आधारे कार्बन फूटप्रिंट्सच्या संख्येची मोजणी करण्यात आली आहे. त्या निकषाआधारित घटकांची यादी तक्ता क्र. 1 मध्ये देण्यात आली आहे. शक्य असेल तिथे भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून अशा घटकांची नोंद करण्यात आली आहे. कार्बन मापनावरून अखेरीस एकूण किती किलो कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित केला जातो, ते मोजण्यात आले आणि त्यावरून प्रतिवर्ष दरडोई किती किलो कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित केला जातो, ते काढण्यात आले.
तक्ता क्र. 2 ः एकूण कार्बन फूटप्रिंट्समधील प्रत्येक स्रोताच्या सहभागाचा गोषवारा |
|
कार्बन फूटप्रिंट्सचे स्रोत |
कार्बन डॉय-ऑक्साइडचे उत्सर्जन (कि. ग्रॅ.) |
मानवी घटक |
1663659 |
वाहतूक |
15841 |
पाणी |
4796 |
कागद |
24538 |
घन कचरा |
1490 |
वीज |
1,50,285 |
एलपीजी |
14,725 |
एकूण |
1890372 |
(1890.37 टन), दरडोई 0.2552832 टन प्रतिवर्ष दरडोई 255.28 कि. ग्रॅ. प्रतिवर्ष |
अ) मानवी घटक : विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांची एकूण संख्या सुमारे 6 हजार 400 होती. प्रत्येक व्यक्ती सर्वसाधारणपणे श्वसन क्रियेदरम्यान दररोज 1.14 किलो कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित करते. मानवी घटकांमुळे उत्सर्जित होणारा एकूण कार्बन डाय-ऑक्साइड मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे विद्यार्थी आणि प्राध्यापक सरासरी दररोज आठ तास याप्रमाणे वर्षातून नऊ महिने महाविद्यालयात असतात, असे गृहीत धरण्यात आले. कार्बन फूटप्रिंट्सच्या मापनातील त्रुटी कदाचित मोठीही असू शकेल, कारण आम्ही सकाळी आणि संध्याकाळी इथे फिरायला येणारे लोक, इतर संस्थांमधून येणारे खेळाडू आणि महाविद्यालयात येणारे इतर लोक यांची संख्या विचारात घेतलेली नाही. आमच्या मोजणीतून असे आढळून आले की, एकूण कार्बन फूटप्रिंट्समध्ये मानवी घटकांचा वाटा 88 टक्के इतका आहे. मानवी घटकामुळे प्रतिवर्ष 1 हजार 663 टन कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात उत्सर्जित होतो. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आणि वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये काही दुर्मीळ प्रजातींची झाडेही आहेत. परिसरात प्रवेश करणार्या माणसांनी उत्सर्जित केलेला कार्बन डाय-ऑक्साइड ही झाडे वापरत असतील, ही गोष्टही इथे लक्षात घेतली पाहिजे.
ब) वाहतूक ः विविध विभागांनी आयोजित केलेल्या अभ्यास सहली आणि महाविद्यालयात येणार्या अधिकृत पाहुण्यांची वाहतूक या गोष्टी कार्बन फूटप्रिंट्सच्या मोजणीसाठी लक्षात घेतल्या गेल्या. कार्यशाळा, अधिवेशने, चर्चासत्रे आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी प्राध्यापकांची (मानद प्राध्यापक इत्यादी) होत असलेली वाहतूक मात्र विचारात घेतली गेलेली नाही. कारण याविषयीची नेमकी माहिती उपलब्ध नाही. एकूण 15 हजार 841 किलो कार्बन डाय-ऑक्साइड इक्विव्हॅलंट्स (CO2e) एवढ्या कार्बन उत्सर्जनात या स्रोताचा सहभाग फक्त एक टक्का असल्याचे आढळून आले.
(तक्ता क्र. 3 मधील आकडेवारी संबंधित विभागप्रमुखांनी दिलेल्या माहितीतून ही आकडेवारी घेण्यात आली आणि त्यानुसार मोजणी करण्यात आली. महाविद्यालयाला भेट देणार्या लोकांच्या वाहनांतून होणार्या कार्बन उत्सर्जनाचा समावेश या माहितीत करण्यात आलेला नाही)
क) पाणीः पिण्यासाठी, तसेच प्रयोगशाळा आणि स्वच्छतागृहे इत्यादींच्या वापरासाठी मिळून महाविद्यालयाला वार्षिक 23 लाख 98 हजार 282 लीटर पाणी लागते, असे आढळले. पाण्यातून होणारे 0.002 किलो/लीटर कार्बन डाय-ऑक्साइडचेे उत्सर्जन होत असते. या माहितीत पाणी गळतीचा समावेश करण्यात आलेला नाही. वापरल्या जाणार्या पाण्यातून 4 हजार 796 किलो/लीटर कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन होत असल्याचे आढळले. याचा अर्थ महाविद्यालयात पाणी वापरातून अत्यल्प प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइडचेे उत्सर्जन होते.
ड) कागद : कागदाची मोजणी किलोमध्ये करण्यात आली. कागदाच्या एका रिमचे म्हणजे 500 पानांचे वजन सुमारे 1.5 किलो असते, असे गृहीत धरण्यात आले आहे. (यात काही दशांशांची चूक असू शकते.) फक्त कार्यालयीन कामासाठी आणि परीक्षांसाठी वापरल्या जाणार्या कागदाचाच यात विचार करण्यात आला आहे. (प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे कागद यात समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.) महाविद्यालय दरवर्षी 9 हजार 511 किलो कागदाचा वापर करते, असे दिसून आले. प्रतिकिलो कागदामधून 2.5 किलो कार्बन डाय-ऑक्साइड (CO2e) उत्सर्जित होतो. त्यावरून कागदांमुळे उत्सर्जित होणार्या एकूण वार्षिक कार्बन डाय-ऑक्साइडचेे प्रमाण (CO2e) 24 हजार 538 किलो असल्याचे स्पष्ट झाले. ते अंदाजे 1 टक्का आहे.
ई) घन कचरा : स्टेशनरी, फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचा कचरा या प्रकारात मोडतो. (त्यामुळे त्रुटीचे पॅरामीटर्स इथे अधिक असू शकतील; परंतु त्यांचा विचार इथे करण्यात आलेला नाही.) एकूण वार्षिक घन कचरा 1 हजार 318.4 किलो असल्याचे मोजणीत आढळून आले. घन कचर्यासाठीचा कार्बन उत्सर्जन घटक हा 0.125 किलो (CO2e/kg) असतो. त्यामुळे घन कचर्यापासून होणारे कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण 1 हजार 489 किलो (CO2e/kg) असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एकूण कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनातील घन कचर्याचा सहभाग अल्प आहे.
फ) एलपीजी : कार्बन फूटप्रिंट्सवर परिणाम करणारा हा एक प्रभावी घटक आहे. महाविद्यालयात वार्षिक 08 हजार 196 किलो एवढा एलपीजी वापरला जातो. (उपहारगृह, खाणावळ आणि प्रयोगशाळा यांचा विचार करण्यात आला आहे.) एलपीजीचा कार्बन उत्सर्जन घटक हा 1.5 किलो CO2e/kg आहे. त्यामुळे मोजणीनुसार, वार्षिक 14 हजार 725 किलो कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन होत असल्याचे दिसते. यात स्पिरीटच्या दिव्यांसारखे इतर घटक विचारात घेतलेले नाहीत. त्यामुळे इथेही त्रुटीचे घटक आहेत; परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. महाविद्यालयातील एकूण कार्बन उत्सर्जनात या घटकाचा वाटा 1.5 टक्के आहे.
ग) वीज ः विजेच्या वापराची उपलब्ध माहिती अचूक आहे. त्यामुळे यात त्रुटी आढळलीच तर ती नक्कीच नगण्य असेल. यावर्षी महाविद्यालयाने 1 लाख 44 हजार 544 युनिट्स विजेचा वापर केला. यात कनिष्ठ महाविद्यालयाकडून वापरण्यात आलेल्या विजेचा समावेश करण्यात आलेला नाही. महाविद्यालय दरमहा 13 हजार 560 युनिट वीज वापरल्याचे दिसून आले. (वर्षाची सर्वसाधारण सरासरी). ही मोजणी अचूक आहे. महाविद्यालय परिसरात होणार्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी विजेच्या वापरातून प्रतिवर्ष सुमारे 7 टक्के कार्बन उत्सर्जन होते. म्हणजेच प्रतिवर्ष 1 लाख 50 हजार 285 किलो कार्बन डाय-ऑक्साइडचेे उत्सर्जन होते.
4. निष्कषर्
परिसरातून उत्सर्जित होणारे एकूण कार्बन डाय-ऑक्साइडचेे उत्सर्जन (CO2e) हे वार्षिक 1 हजार 890.4 टन असल्याचे आढळले. याचा अर्थ प्रतिवर्ष दरडोई 255.3 किलोग्रॅम कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित होतो. आंतरराष्ट्रीय आणि नूतन भारतीय मानकांप्रमाणे शैक्षणिक संस्थेतील वार्षिक दरडोई कार्बन उत्सर्जन 950 किलोपेक्षा कमी असेल, तर ती संस्था ‘हरित’ समजली जाते. त्यामुळे असा निष्कर्ष काढता येतो की, सर परशुरामभाऊ महाविद्यालय हे आमच्या मापनानुसार ‘हरित’ आहे. मात्र, या मोजणीत कित्येक ढोबळ अंदाजही समाविष्ट करण्यात आले आहेत, ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे. याशिवाय या मोजणीचा कालावधीही तुलनात्मकदृष्ट्या कमी; म्हणजे फक्त एक शैक्षणिक वर्ष होता, तसेच सर्वसमावेशक, व्यापक स्वरूपाची माहिती संकलित करून त्यावर आधारित मोजणी करण्यात आली. यात प्रत्येक सूक्ष्म स्रोताचा समावेश करता आला असता. पुढील काळात प्रदूषणाच्या प्रत्येक घटकावर आधारित माहिती संकलित करण्याचे नियोजन असून, ते दीर्घ काळासाठी करावयाचे आहे.
5. कार्बन कमी करण्यासाठी शिफारशी
वाहतूक
वीज
घन कचरा
अन्नाचे उत्पादन आणि वापर
संपर्क ः 9552 5633 ५८
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 4/20/2020
ईस्ट इंडिया कंपनीकडून १८५० मध्ये राज्यकारभार राणीक...
निरनिराळ्या कारखान्यांतून आणि औद्योगिक वसाहतींतून ...
पर्यावरण व्यवस्थापन साधन भारतासारख्या देशाच्या व...
अखिल भारतीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. त्यांचा जन्...