देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही. पण ही संकल्पना फक्तदेवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढया पुरती न राहता अनेक पातळीवर ती वेगवेगळया अंगाने पाहिली जाते.
संशोधकच्या मते एक परिसंस्था असलेली ही देवराई मात्र गावाच्या दृष्टीने खूप वेगळी आहे.
गावाच्या दृष्टीने ती एक समाजव्यवस्थाच आहे. देवराई ची संकल्पना ही गावागावनुसार वेगळी आढळते. त्यामध्ये काही भागामध्ये देवराई ही अगदी जवळचा नैसर्गिक संसाधनाचा स्रोत असल्याने त्या गावाने किंवा समाजाने ती राखून ठेवली आहे. उदा. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पहूर गावची देवराई ही त्यापैकी एक. तर काही भागात नैसर्गिक घटकांची पूजा केली जावी किंवा त्या जंगलातील घटकांच्या भीतीपोटी ह्या देवराई राखल्या गेल्या आहेत. उदा. ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असणाऱ्या देवराया ह्या जंगलातल्या वाघाच्या भीतीपोटी ही राखलेल्या आढळतात. आघारकर संशोधन केंद्राच्या काही निरिक्षणानुसार काही देवराया मध्ये स्मशान ही आढळते. तिथे वेगवेगळ्या समाजाचे पुरण्याचे ठिकाण आहे त्या कारणासाठी देवराई सुद्धा जतन केलेल्या आहेत. जव्हार तालुक्यात असणारी हाडे गावाची देवराई ही सात गावांसाठी मिळून बनलेली आहे. सणासाठी एकत्र येऊन गावागातील एकोपा टिकावा व एकाच देवराईचा वापर हा ७ गावासाठी या उद्देशाने सुद्धा ही देवराई जतन केलेली आढळली.
देवराई ही विविध भागात विविध नावांनी ओळखली जाते.
महाराष्ट्रात- देवराई / देवरहाटी
कर्नाटक- देवराकाडू
तामिळनाडू- कोवील काडू
केरळ- काव्यू
मध्यप्रदेश/छत्तीसगड – सरना
उत्तराखंड- देवबन
देवराई संदर्भात खूप जणांनी अभ्यास केला आहे. त्यापैकी सुरवातीचे संशोधन हे पुणे येथील आघारकर संशोधन केले आहे. १९८२ पासून आजतागायत हा अभ्यास सुरु आहे. सुरुवातीला माधव गाडगीळ व वा. द. वर्तक यांनी हा अभ्यास सुरु केला. ह्या मध्ये त्यांनी महाराष्ट्रात असण्याऱ्या देवराईची सध्य स्थिती व त्यांची संख्या यांची नोंद यावर अभ्यास केला आहे. त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील २३३ देवरायाची नोंद केली होती. सी. पी. आर. चेन्नई यांनी सुद्धा देवराई भारतातील सध्या स्थिती व तिथल्या रुढी यावर अभ्यास केला आहे.
कैलास मल्होत्रा यांनी INSA (Indian National Science Academy) या संस्थेद्वारे भारतातील १३,७२० देवरायाची नोंद केली आहे. ह्या रिपोर्ट मध्ये देवराई आणि त्याचे विविध पैलूचा विचार केला गेला आहे.
ए.ई.आर.एफ. या संस्थेने सुद्धा या विषयावर काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत कोकणातील १२० देवरायाच्या सर्वेक्षणाचे काम केले आहे. त्यातील काही देवराया पुनरज्जीवनाचे काम ही त्यांनी केले आहेत. त्यामध्ये १०,००० झाडांची रोपवाटिका त्यांनी बनवली आहे.
ऑयकॅास या संस्थेने ठाणे जिल्ह्यातील १६ देवरायाचा सर्वे केला आहे. त्यामध्ये तिथली सद्यस्थिती व संवर्धनासाठी काय करता येईल या अंगाने हा सर्वे केला होता.
या सर्व संशोधनतुन खूप साऱ्या गोष्टीचा अभ्यास केला गेला आहे. उदा. सद्यस्थिती, तिथली जैवविविधता, धोके, समाज, रुढी, त्यासंबधी लोकांचा विश्वास, लोक व देवराई सहसंबंध
हे देवराईक्षेत्र कमी होण्याची काही कारणे थोडक्यात सांगायची म्हणली तर गुरांची अतिचराई, गावातील तरुण मुलांचा त्याकडे असणारा दृष्टीकोन, रस्तेबांधणी, धरणनिर्मिती ह्या कारणाने सुद्धा देवराईचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. पण ह्या सर्व गोष्टीचा विचार करता काही कळीचे मुद्दे म्हणजे क्षेत्र कमी होण्याची कारणे, देवराई आणि लोक सहसंबध समजून घेणे तितके महत्वाचे आहे.
देवराई आणि जैवविविधता या अंगाने विचार करायचा झाला तर देवराया ह्या जिवंत संग्रहायलया सारखे आहे. इतर ठिकाणी दुर्मिळ असलेली झाडे, मोठ्या वेली, पक्षी, कीटक, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी हे जास्तीकरून देवराईत बहुसंख्य वेळेस आढळतात. देवराया ह्या औषधी वनस्पतीचे खूप मोठे भांडार आहेत.
उदा. गारंबी किंवा रानचिंचोक्याचा वेल, हेदू, काकड, अंजन, अंबाडा, ओंबळवेल, वाघाटी, कळलावी, कुसुम अशी झाडे व वेली आणखी प्राण्याबद्दल बोलयच म्हणाल तर मलबारी धनेश, स्वर्गीय नर्तक, निळ्या पंखाचा माशीमार तर निळी भिरभिरी, मॅप बटरफ्लाय अशी फुलपाखरे तर दुर्मिळ असणारे कोळी, विणकर मुंग्या हे किडे येथे पहावयास मिळतात. सरीसृपामध्ये देवगांडूळ, विविध रंगाच्या पाली/सरडे, विषारी असणारे मण्यार, नाग व अजगर हे ही काही देवराईमध्ये आढळून आलेले आहेत. एका पालीचा शोधच मुळी कोल्हापूर जिल्ह्यातील देवराई मध्ये लागला.
घरासाठी जस अंगण तस गावासाठी देवराई या वाक्याचा अर्थ लक्षात घेतला असता देवराईचे समजासाठी असणारे महत्व लक्षात येते. वेगवेगळया गरजसाठी लोकांच्या मालकीची सामुदायिक जागा अर्थात ह्या गरजा धार्मिक किंवा दैनदिन ही असू शकतात. धार्मिक गरजा मध्ये कौल लावणे, काही सण, परंपरा, रुढी गावाने एकत्र येऊन करणे.
तर दैनदिन गरजामध्ये मान्सूनमध्ये येणाऱ्या भाज्या, उन्हाळ्यात किंवा वेगवेगळया ऋतुमध्ये येणारी फळे गोळा करणे. तसेच राबणी किंवा भाजावळ करण्यासाठी लागणारा पालापाचोळा गोळा करणे. गावात असणारे वैदू हे त्यांना लागणारी औषधे ह्या देवराईमधूनच गोळा करतात.
त्यामुळे लोकांसाठी देवराई ही फक्त देवासाठी राखलेले जंगल नसून त्यांच्या लेखी ती एक व्यवस्था आहे. आघारकरच्या शास्त्रज्ञ डॉ.अनुराधा उपाध्ये यांनी केलेल्या निरीक्षणानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील काही देवराया मध्ये स्मशान आहेत त्यामुळे गावातील समाजरचनेनुसार त्यांच्या पुराण्याच्या किंवा दहन करण्याच्या जागा ठरलेल्या आहेत.
ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यातील देवरायामध्ये पूर्वजांच्या स्मृतीसाठी वीरा किंवा वीरगळ ही ठेवलेल्या आढळतात. ही झाली देवराईची थोडक्यात माहिती पण देवराई वाचवण्यासाठी आपणकाय करू शकू? याचा जर विचार केला तर लोकांना त्याबद्दलची माहिती देऊन जनजागृती करणे तसेच त्यातून दुर्मिळ वनस्पतीच्या बिया गोळा करून त्याची रोपवाटिका बनवणे. स्थानिक लोकांची मदत घेऊन त्यातून देवराई वाचवण्याची उपाययोजना करणे
लेखक - श्रुती कुलकर्णी
अंतिम सुधारित : 8/22/2020
चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. ...
परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्या सजीवाकडे अन्नऊ...
या परिसंस्थेत त्या प्रदेशातील प्राकृतिक रचना, पीक...
पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही...